बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहतोय! अजितदादांसारखी कठोरता शिंदे साहेब दाखवणार? रोहित पवारांचा सवाल
25-Jul-2025
Total Views | 15
मुंबई : राज्यभरात सध्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता असून बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहतोय, असे विधान केले आहे. त्यांच्याबाबतीत एकनाथ शिंदे कठोरता दाखवतील का? असा सवालही त्यांनी केला.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशातच कोकाटेंशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
यावर रोहित पवार यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत शिंदे साहेब कधी दाखवणार?" असा सवाल त्यांनी केला आहे.
पावसाळी अधिवेशन काळात मंत्री संजय शिरसाट यांचादेखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांच्या बेडरुममध्ये बसलेले दिसत असून त्याच रुममध्ये आणखी एक पैशांच्या नोटांनी भरलेली बॅग दिसत होती. यावरून त्यांच्यावरही प्रचंड टीकाटिपण्णी करण्यात आली. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय शिरसाटांचा राजीनामा घेणार का? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.