मुंबई : “उंच झेप घेण्यासाठी संधीचे सोने करा आणि विविध कौशल्ये आत्मसात करा. मोबाइलचा वापर सोशल मीडियापेक्षा शासकीय योजनांसाठी अधिक करा. नकारात्मकतेवर मात करून स्वतःला विकसित करा,” असे प्रेरणादायी उद्गार मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवार, दि. ९ जुलै रोजी काढले.
श्रीमती मणिबेन एम.पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘झेप: एक पाऊल कौशल्याकडे’ या उपक्रमात विद्यार्थिनींना संबोधित करताना त्या बोलत होत्या. ‘जागतिक युवा कौशल्य दिना’निमित्त बॅचरल ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पत्की यांनी सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीची माहिती दिली आणि प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी आंचल गोयल, सन्माननीय पाहुणे जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत, उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक विश्राम बापट, कार्यालयीन अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमात चार कौशल्याधिष्ठित विद्यार्थिनी - हिरल परमार, फैझा खान, प्रियंका जोगदंड आणि सिद्धी गीते यांचा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मार्गदर्शक विश्राम बापट यांनी शासकीय कौशल्य उपक्रमांची माहिती देताना श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ‘गुरूसूत्र’ ॲपविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मान्यवरांशी प्रश्नोत्तर स्वरूपात संवाद साधला. बॅचरल ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरणावर आधारित नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. रश्मी शेट्ये-तुपे यांनी, तर आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे यांनी केले.