२७ फेब्रुवारी - ‘मराठी राजभाषा दिन.’ संस्कृत ज्याप्रमाणे अनेक भाषांची जननी आहे, तशीच मराठीही विविध भाषांची बहीण आहे. आज ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त भाषा, मराठीचा जन्म आणि इतर भाषांशी तिचे असणारे सहसंबंध आपण या लेखातून थोडक्यात जाणून घेऊया...
प्रथमत: ‘भाषा’ ही अखंड प्रवाहीस्वरूप असते. एक भाषा अनेक युगे, तसेच कालपरत्वे विविध राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक घटना-परिस्थितीतून संक्रमित होत वाहत असते. मूळ बांधा अबाधित ठेवून इतर सर्व घटकांनी प्रभावित होत कालानुरूप स्वरूप ती प्राप्त करून घेते. प्रमाण भाषा आणि इतर बोली भाषा, त्यातही प्रमाण भाषा श्रेष्ठ आणि इतर भाषा कनिष्ठ, भाषेवरून होणारे वाद किंवा भाषेचे शास्त्रीय अंगाने विचार करणे कदाचित चूक आणि सामाजिक परिस्थितीचे नीट आकलन न होण्याचे कारण आहे. कारण, भौगोलिक पर्यावरणातील भाषेचे स्वरूप तेथील सामाजिक व्यवहारातून ठरते. त्यामुळे, भाषिक वैशिष्ट्ये हीच त्या त्या परिसराची सामाजिक वैशिष्ट्ये ठरतात.
मराठी भाषेचा उदय
महाराष्ट्रात बहुतांशी लोकांची भाषा मराठी आहे. मराठी भाषेच्या मूळ आणि पुरातनतेबद्दल विद्वानांमध्ये कोणतीही एकमत नाही. १२व्या शतकापासून इ. स. १०० पर्यंत मराठीची परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. १२व्या शतकात मुकुंदराज यांनी लिहिलेला ‘विवेकसिंधू’ हा आद्य मराठी काव्यग्रंथ मानला जातो. त्यानंतर इ. स. १२३८ मध्ये माहिमभट यांनी ‘लीळाचरित्र’ नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यानंतर इ. स. १२९० साली संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘भावार्थ दीपिका’ (ज्ञानेश्वरी) हा ग्रंथ लिहिला. अभ्यासकांना मराठीमधील पहिला शिलालेख सापडला तो म्हणजे, उनकेश्वराचा शिलालेख इ. स. १२८९ मध्ये. त्याहीपेक्षा मागे जात श्रवणबेळगोळचा शिलालेख इ. स. ९८३ ला. त्याही मागे अनेक मराठीचे उल्लेख इतर काही शिलालेख सापडतात. अगदी इ. स. ६८०च्या ताम्रपटात ’पन्नास’ आणि ‘प्रिथवी’ हे शब्द आहेत, म्हणून ती मराठीची सुरुवात आहे, असे मानणारेही अभ्यासक आहेत. पण, भाषातज्ज्ञांचे त्यावर एकमत होत नाही. त्याचबरोबर ’धर्मोपदेशमाला’ (इ. स. ८५९) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. मराठी भाषा कशी आहे, हे त्या दोन ओळीत सांगितले आहे.
सललयि-पय-संचारा पयडियमाणा सुवण्णरयणेल्ला! मरहठ्य भासा कामिणी य अडवीय रेहंती!
मराठी भाषा सुंदर कामिनीप्रमाणे असून, ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने भरलेली आणि चांगल्या वर्णाची आहे, असे मराठी भाषेचे कौतुक केलेले आहे. 'कुवलमाला' या ग्रंथाचे लेखक उद्योतनसुरी यांच्या ग्रंथात १८ भाषांचा उल्लेख येतो. ही १८ भाषा बोलणारी माणसे कशी आहेत, त्याचा उल्लेख त्यात येतो. पण, केवळ ’मराठा’ या उल्लेखाने ‘मराठा म्हणजे मराठी बोलणारे’ असे म्हणणे पुराव्यांअभावी धारिष्ट्याचे होईल. महाराष्ट्रात सातवाहनांच्या काळात (म्हणजेच इ. पू. १ ले शतक) महाराष्ट्री प्राकृत भाषा वापरली जात होती. या भाषेत अनेक शिलालेख आणि ग्रंथ लिहिलेले आहेत. या प्राकृत भाषेतील अत्यंत प्राचीन शिलालेख पुणे जिल्ह्यातील नाणेघाट येथे आहेत. त्याचा कालावधी इ. पू. १०० आहे. या भाषेचा सर्वात जुना ग्रंथ म्हणजे गाथा सप्तशती (इ. स. १००). हा सातवाहन राजा हाल यांचा लोककवितांचा संग्रह आहे, पण यावरतीही अनेक वाद आहेत.
मराठी भाषेवर झालेले भाषिक, सामाजिक आणि राजकीय परिणाम
संस्कृत व प्राकृत भाषा भारताच्या गौरवस्थानी आहेत. संस्कृत भाषा जेव्हा मध्य आशियावरून भारतात आली तेव्हा त्यासोबतच काही बोलीभाषाही आल्या, ज्या संस्कृतचे सुलभरूप होत्या. यालाच आपण ‘प्राकृत’ म्हणून ओळखतो. काही प्राकृतचे प्रकार आहेत : ‘मागधी’, ‘शौरसेनी’, ‘पैशाची’, ‘महाराष्ट्री’, ‘अर्धमागधी’, ‘अपभ्रंश’, ‘पाली.’ यातील ‘महाराष्ट्री’ प्राकृतवरून आलेली आपली मराठी भाषा आहे. ‘महाराष्ट्री’ प्राकृत ही प्राचीन व मध्ययुगीन भारतातील एक प्राकृत भाषा होती. तिची व्युत्पत्ती संस्कृतमधून झाल्याचे सांगितले जाते. मराठी व कोकणी या भाषा ‘महाराष्ट्री’पासून उद्भवल्या आहेत. ही भाषा उत्तरेतील माळवा प्रदेशापासून दक्षिणेतील कृष्णा, तुंगभद्रेपर्यंतच्या परिसरात बोलली जात असे. काही विद्वानांच्या मते, राजशेखर या इ.स.च्यादहाव्या शतकातील ‘कर्पूरमंजरी’ हे नाटक ‘महाराष्ट्री’ प्राकृतात लिहिले आहे. प्राकृत भाषांमध्ये विपुल प्रमाणात जैन साहित्य उपलब्ध आहे. म्हणून या भाषेला ‘जैन महाराष्ट्री’ असेही म्हणतात. ‘महाराष्ट्री’ प्राकृत भाषा उत्क्रांत होत असताना बर्याच वेगवेगळ्या भाषांचा त्यावर प्रभाव पडत गेला. कानडी व तेलुगू भाषा तीन हजार-पाच हजार वर्षे प्राचीन आहेत. अशाच द्राविडी भाषांचा ‘महाराष्ट्री’ प्राकृतवर प्रभाव पडत गेला. मराठी भाषा अनंतकाळापासून कानडी व तेलुगूसारख्या द्राविडी भाषांसोबत शेजारधर्म पाळत आलेली आहे. तसेच, महाराष्ट्र राज्यातदेखील ‘गोंडी’ (गोंडिया, महाराष्ट्र) व ‘कोलमी’ यासारख्याच काही अल्पसंख्याक द्राविडी भाषांचे अस्तित्व आहे. द्राविडी भाषांचे मुख्य योगदान मराठी व कोकणी भाषांना शब्दसमृद्ध करण्यात आहे. संस्कृतचा प्रभाव द्राविडी भाषांवर अधिक आहेच, पण मराठीत विशेषतः द्राविडी व्याकरणाचाही एक मोठा प्रभाव होताच. उदा. मराठी भाषेत इतर द्राविडी भाषांसारखेच जोडाक्षर/कूटाक्षर वाढत गेले. हिंदीत - उन (लोगों) के लिए भी। मराठीत - ‘त्यांच्यासाठीही’ असेच काही द्राविडी शब्द थोडेफार बदल करून मराठीत आले. त्यापैकी इकडे, तिकडे, कडे, पैकी, उजवं, काळजी, माहिती, करपले, कोरडे इत्यादी.
मराठी भाषेत फारसी शब्दांचा प्रवेशही झालेला आपल्याला दिसतो. मुघल, आदिलशाही, कुतुबशाही व निजामशाही यांच्या शासनाच्या परिणामस्वरूपात मराठी भाषेत दिवसेंदिवस फारसी शब्द शिरत गेले. महाराष्ट्राच्या मातीत अशा अनेक साम्राज्यं येऊन गेली, पण त्यांची छाप मात्र मराठी भाषेवर राहून गेली. अनेक उर्दू शब्दही मराठीमध्ये समाविष्ट झालेले दिसतात. उदा : दस्तावेज, हुकूम, बरखास्त, नेस्तनाबूत, अर्ज, लायक, माजी, गुन्हेगार, फायदा, बरबाद, नुकसान, मदत, तुफान, बक्षीस, बर्फ, तारीख, शाबूत, अंदाज, खुर्ची, खूप, वगैरे इ. मराठी भाषेवर हिंदीचा बराच परिणाम झालेला दिसतो. कारण, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, हे ठसवलं गेलं. तिला महत्त्व देण्याच्या नादात बरेच हिंदी शब्द मराठीत आले. मराठी वाक्यांचे ‘हिंदीकरण’ करण्यात आले. याचा सर्वाधिक प्रभाव मुंबई आणि नागपूरमध्ये दिसतो. ज्यादा, बिलकुल, चावी, परिवार हे शब्द हिंदीतून मराठीत आलेले आहेत. ‘करून राहिले’ या प्रकारच्या वैदर्भी वाक्यरचनांवर हिंदीचा प्रभाव आहे. इंग्रजी भाषेच्या प्रभावाखाली मराठी भाषा आलेली दिसते. ‘मिंग्लिश’ची निर्मिती त्यातूनच झालेली आहेत. जगातील सगळ्याच भाषांमध्ये अगदी संस्कृतमध्येही इंग्रजी शब्द शिरलेले आहेत, मराठीही त्याला अपवाद नाही.
बोलीभाषेत इंग्रजी शब्दांचा वापर जास्तीत जास्त केला जातो. कितीतरी वेळा मराठी शब्द वापरण्याऐवजी इंग्रजी शब्द वापरण्यास प्राधान्य दिले जाते. उदा. ऑफीस, फाईल, पेन, टाईम, कप, प्लीज, सॉरी, मोबाईल, गेट इ. मराठी भाषा घडताना अन्य भाषा जशा प्रभाव करतात त्याचप्रमाणे सामाजिक आणि राजकीय परिणामही भाषांवर झालेले आहे. येथे चालुक्य (राजभाषा-कन्नड व तेलुगू), यादव (राजभाषा-संस्कृत), कदंब (राजभाषा-कन्नड व अपरांतक किंवा प्राचीन कोकणी), बहामनी (राजभाषा-फारसी व उर्दू), आदिलशाही (राजभाषा-उर्दू व दखनी) आणि मोगल (राजभाषा-फारसी) व ब्रिटिश (राजभाषा-इंग्रजी) असा राजकीय सत्तांचा कालक्रमानुसार आलेख दिसतो. या विविध राजभाषा असलेल्या सत्तांचा प्रभाव मराठीचा अभ्यास करताना विचारात घ्यावा लागतो. म्हणजे कोकणी, कन्नड, उर्दू, फारसी आणि इंग्रजी या भाषांचा प्रामुख्याने प्रभाव आणि तिचे परंपरेने चालत आलेल्या प्राचीन मराठीशी झालेले आदानप्रदान, यातून परिसरातील भाषेचे व्याकरण व व्यवहार, शिवाय उच्चारांची पद्धतही अभ्यासता येईल.
कुठलीही भाषा केवळ व्याकरण व शब्दांच्या आदानप्रदानातून विकसित होत नाही, तर त्या परिसराची भौगोलिकता आणि त्यातून तयार होणारी उत्पादन व श्रमव्यवस्थाही तितकीच कारणीभूत असते. या राजकीय सत्तांबरोबरच या प्रदेशात जन्म घेतलेला लिंगायत, जैन धर्म, शिवाय काश्मिरी आणि दक्षिणी ब्राह्मणी शैव परंपरा या सगळ्याच गोष्टी या भाषेवर सांस्कृतिक परिणाम घडविणार्या आहेत. सीमाभागांमध्ये कन्नड भाषिकांचा, हिंदी, गुजराती भाषिकांचा प्रभाव येथील मराठीवर दिसतो. तसेच, मराठीचा प्रभावही कन्नड आणि गुजरातीवर दिसतो. उदा. कन्नड व्याकरणात स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी ही तीन लिंगवचने कटाक्षाने वापरली जातात. त्यानुसार, वस्तूंचा किंवा व्यक्तींचा उल्लेख केला जातो. सीमाभागांमधील मराठीत एरवी मराठीने ‘प्रमाण भाषा’ म्हणून ठरवलेल्या मराठीच्या निकषानुसार विनोदी किंवा हास्यास्पद, असे भाषिकांचे उच्चारण दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते तसे नाही. त्यामुळे मराठीत ज्याला पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी उच्चारण आहे, ते येथील मराठीत नपुसकलिंगी पद्धतीनेही उच्चारले जाऊ शकते. उदा. मराठीत ‘तो शर्ट’ म्हटला जाईल, पण इथे ‘ते शर्ट’ असे सहज म्हटले जाईल किंवा ‘फळ’ हा शब्द दोन्ही भाषांत नपुसकलिंगी आहे. पण, कन्नड भाषेत कुठेही फळ हे नपुसकलिंगीच उच्चारले जाईल. मराठीत मात्र विशिष्ट फळ पुल्लिंग घेऊन येते. उदा. मराठीत ‘तो आंबा’ म्हटले जाईल; पण कन्नडमध्ये ‘ते आंबा’ असे सहज म्हटले जाऊ शकते.
शब्द जसेच्या तसे एका भाषेतून दुसर्या भाषेत जाणे ही तर भाषेच्या आदानप्रदानात सहज घडणारी गोष्ट आहे. पण शब्दांची मोडतोडही होऊ शकते. उदा. परिसरातील कन्नड भाषिक ढगाला ‘मोड’ म्हणतात, तर मराठी भाषिक ‘माड’ म्हणतील. ‘माज’ (मला), तुज (तुला), कास (कशाला), निंबार (उन्हं), जाऊस न्हास (जायला नाहीस), कास जात्यास (कशाला जातोस) यासारखे शब्द किंवा त्यांना लागलेले प्रत्यय थेट कन्नड प्रभावित आहेत, तर तिया (तू), मिया (मी), तन्न (तेव्हा), कन्न (केव्हा) यांसारखे शब्द फारसीचा प्रभाव जाणवून देतात. मारल्यानं (मारले), खाल्ल्यानं (खाल्ले), परतोर (परतून), खट्टे (कुठे) हे शब्द कोकणी प्रभावाची ओळख करून देतात. यल्लो (आलो होतो), गेल्लो (गेलो होतो) यासारखे शब्द तेलुगू आणि कन्नड यांच्या मिश्र प्रभावाने इथल्या मराठीत अवतरलेले आहेत आणि त्यांचा अर्थ असा आहे हे प्रमाण भाषेच्या अभिमान्यांना सांगावे लागते, इतकी जवळीक कन्नड आणि उर्दूशी आहे. मराठी भाषेत आलेले अन्य भाषिक शब्दांना पर्यायी शब्द देण्याचे कार्य स्वा. वि. दा. सावरकरांनी केले. आजकाल अनेक भाषातज्ज्ञांचे मत असते की, भाषा जीवंत ठेवण्यासाठी वा समृद्ध करण्यासाठी इतर भाषेतील शब्द घेणे गैर नाही. कदाचित हे खरंही असेल. परंतु, यामध्ये मूळ भाषेचा लोप होऊ न देणे महत्त्वाचे आहे. आज ‘मराठी राजभाषा दिना’च्या निमित्ताने मराठी भाषा व्यवहारात ‘प्रथम भाषा’ ठेवून तिच्या संशोधन आणि संवर्धनास सहकार्य करणे, उचित ठरेल.
- वसुमती करंदीकर