ई-वाहनांना रोडबंदी!

    06-Dec-2022   
Total Views |
e vehicles


एकीकडे जगभरात इलेक्ट्रिक वाहनांकडे वाहनचालकांचा, सरकारचा कल वाढत असतानाच, एका देशात मात्र चक्क या वाहनांवर बंदीची शक्यता वर्तविली जात आहे. आता ई-वाहनांमुळे तर कुठलेही प्रदूषण होत नाही, ती तर पर्यावरणपूरक वाहने म्हणून ओळखली जातात. मग अशा या हरितवाहनांवर रोडबंदीचा निर्णय का बरं? त्याचे कारण म्हणजे ई-वाहनांसाठी लागणार्‍या इलेक्ट्रिसिटीची म्हणजेच विजेची टंचाई. यावरून कदाचित हे चित्र एखाद्या विकसित अथवा अविकसित देशातील आहे, असा आपला प्राथमिक समज होणे अगदी स्वाभाविक. कारण, या देशांमध्ये वीजटंचाई, लोडशेडिंग यांसारख्या समस्या तर वर्षानुवर्षे तशा पाचवीलाच पूजलेल्या. पण, ज्या देशात ई-वाहनांवर लवकरच रोडबंदी लादली जाऊ शकते तो देश म्हणजे युरोपचा स्वर्ग म्हणून ख्यातनाम स्वित्झर्लंड!


स्वित्झर्लंडमध्ये दिवसेंदिवस विजेचे संकट अधिकच गहिरे होताना दिसते. कारण, युरोपातील या 87 लाख लोकसंख्येच्या देशातील बहुतांश वीज ही आयात केली जाते. फ्रान्स आणि जर्मनी हे स्वित्झर्लंडला वीजपुरवठा करणारे दोन मोठे देश. परंतु, रशिया-युक्रेन युद्धामुळे केवळ स्वित्झर्लंडच नव्हे, तर अवघ्या युरोपात वीजटंचाईचे संकट घोंगावताना दिसते. कारण, वीजनिर्मितीसाठी आवश्यक असणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा युद्धामुळे खंडित झाला आणि परिणामी युरोपच्या काही भागांत बत्तीगुल व्हायची वेळ आली. स्वित्झर्लंडही त्याला अपवाद नाहीच. त्यातच स्वित्झर्लंडमधील 60 टक्के वीजनिर्मिती ही जलविद्युत स्रोतांतून होेते. पण, कडाक्याच्या थंडीमुळे या स्रोतांतून उत्पन्न होणार्‍या विजेवरही आपसुकच मर्यादा येतात. म्हणूनच यदाकदाचित वीजटंचाईची आपात्कालीन घोषणा करावी लागलीच, तर त्याचा फटका रस्त्यावरील ई-वाहनांना प्रामुख्याने बसू शकतो. म्हणजे 2022च्या आकडेवारीनुसार, स्वित्झर्लंडमधील नोंदणीकृत 1 लाख, 10 हजार, 700 ई-वाहनांना यामुळे एकाएकी ब्रेक लागू शकतो.

स्वित्झर्लंड सरकारने सरसकट ई-वाहनांवरील बंदीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. उपलब्ध वीजसाठा, विजेची गरज या निकषांवर येथील सरकारने वीजकपातीचे काही टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. त्यातील अगदी शेवटच्या टप्प्यात ई-वाहनांवर पूर्णपणे बंदी लादली जाऊ शकते. तत्पूर्वीच्या टप्प्यांत फक्त महत्त्वाच्या कामांसाठीच ई-वाहने नागरिकांना वापरता येतील, अशी तरतदू करण्यात आली आहे. म्हणजे, कामावर जाण्यासाठी, खरेदीसाठी, डॉक्टरच्या भेटींसाठी, धार्मिक कार्यक्रम, न्यायालयातील प्रकरणांसाठी हजेरीसाठीच ई-वाहनांचा स्वित्झर्लंडवासीयांना प्रामुख्याने वापर करता येईल. त्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी घराच्या गॅरेजमधून ई-वाहने रस्त्यावर उतरविता येणार नाहीत.

पण, केवळ ई-वाहनांवर बंदी लादून स्वित्झर्लंडची वीजसमस्या मिटणार आहे का? तर तसेही नाही. ई-वाहनांव्यतिरिक्त इतरही अनेक बाबतीत स्वित्झर्लंडवासीयांना प्रचंड मोठी काटकसर यंदाच्या हिवाळ्यात करावी लागेल. जसे की, बर्फ तयार करणार्‍या मशिन्सवर बंदी, एस्कलेटर्सवर बंदी, नाईट क्लब, जलतरण तलाव, मॉल्स, नाताळचे रोषणाई या सगळ्यांवर बंदी. दुकानांनाही दिवसातील किमान दोन तास लोडशेडिंग सहन करावे लागेल. तसेच एसी, हिटर, वॉशिंग मशीनच्या वापरावरही काही प्रमाणात मर्यादा येतील. म्हणजे एकूणच काय तर स्वित्झर्लंडमधील कडाक्याचा हिवाळा वीजटंचाईमुळे यंदा आणखीनच गोठवणारा ठरेल, असेच चित्र निर्माण झालेले दिसते.
 
 
स्वित्झर्लंडमध्ये जवळपास 58 दशलक्ष मेगावॅट विजेचा वापर केला जातो. त्यापैकी जवळपास 66 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून, 34 टक्के आण्विक ऊर्जा, एक टक्के जीवाश्म इंधनाच्या माध्यमातून उत्पादित केली जाते. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धामुळे प्रामुख्याने जीवाश्म इंधन आणि आण्विक विद्युतनिर्मितीवर नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याअभावी प्राथमिक परिणाम झाल्याचे चित्र स्वित्झर्लंडमध्ये पाहायला मिळते. एकटा स्वित्झर्लंडच नाही, तर युरोपातील सर्वच देशांना रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा तडाखा बसला आहे. म्हणूनच युक्रेनला युरोपचा पूर्ण पाठिंबा असला तरी रशियाशी 100 टक्के वितुष्ट घेणे हे कोणत्याही युरोपीय देशाला आजघडीला तरी परवडणारे नाही, हेच खरे. त्यामुळे यंदाचा हिवाळा हा एकट्या स्वित्झर्लंडसाठीच नाही, तर संपूर्ण युरोपची परीक्षा पाहणारा आहे. त्यामुळे लवकरात लवकर रशिया-युक्रेनमधील युद्धाचे संकट दूर होणे हे जागतिक हिताचे ठरावे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची