तुर्की-सीरियात ऐलान-ए-जंग?

    23-Nov-2022   
Total Views |
ajaz


तुर्की समर्थित लढाऊ सैनिकांच्या ताब्यात असलेल्या उत्तर-पश्चिम सीरियातील अजाज शहरात मंगळवारी झालेल्या रॉकेट हल्ल्यात पाच नागरिक ठार आणि पाच जण जखमी झाले. यात एका बालकाचादेखील समावेश आहे. यापूर्वी रविवारीसुद्धा तुर्कीने सीरिया आणि इराकमधील काही भागांवर हवाई हल्ले केले होते. या हवाई हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. या हवाई हल्ल्यानंतर सीरिया आणि इराकमधील जवळपास 89 सैन्य ठिकाणे उद्ध्वस्त करण्याबरोबरच ‘YPG/PKK’च्या 184 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तुर्की आणि सीरियामध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. तुर्कस्तान सातत्याने सीरियन कुर्दीश सैनिकांवर ड्रोन आणि युद्ध विमानांच्या साहाय्याने हल्ले करत आहे. यानंतर सीरियानेही तुर्कीला प्रत्युत्तर देत हल्ले केले आहे.


दरम्यान, आठवडाभरापूर्वी तुर्कीतील इस्तंबूल येथे आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये सहा जण ठार, तर 80 हून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांचा बदला घेण्यासाठीच हवाई हल्ले केल्याचे तुर्कीने सांगितले आहे. तुर्कस्तानने या हल्ल्यासाठी सीरियन कुर्दीश सैनिकांना जबाबदार धरले. तुर्कीच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत सीरियानेदेखील तुर्कीवर रॉकेट हल्ला केला, ज्यामध्ये या हल्ल्यात तुर्कीचा एक सैनिक आणि विशेष सुरक्षा दलाचे दोन अधिकारी गंभीर जखमी झाले. नुकतेच तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले असून, आम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचे सांगितले आहे.


यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या ‘कलम 51’चा दाखला दिला आहे. याअंतर्गतच सीरियाच्या उत्तरेकडील भागात आणि इराकच्या काही भागात दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचे तुर्कीने सांगितले. विशेष म्हणजे, हल्लेखोरांचा हिशोब चुकता करण्याची वेळ आल्याचा इशाराही तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. दरम्यान, तुर्की आणि अमेरिका हे दोन्ही देश ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ (घथॠ)लादहशतवादी गट मानतात. पण, ‘इसिस’या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील मोहिमेमुळे अमेरिका त्यांना सीरियन-कुर्दीश सेना मानण्यास नकार देत आहे. 1984 पासून ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’च्या सशस्त्र बंडखोरीमुळे आतापर्यंत तब्बल दहा हजारांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या संघर्षामुळे नेमका सीरिया आणि तुर्कीचा वाद काय आहे, असा प्रश्न पडणे साहजिकच.


तुर्कस्तान आणि सीरियाच्या सीमेवर ‘कुर्दिस्तान वर्क्स पार्टी’चे कुर्दिश सैनिक तैनात आहेत. सीमेवर स्थायिक झालेल्या या कुर्दिश सैनिकांना स्वत:चा स्वतंत्र असा कुर्दिस्तान देश हवा आहे. त्यासाठी ते गेल्या अनेक दशकांपासून संघर्षही करत आहेत. हे कुर्द सैनिक केवळ तुर्की नाही, तर बर्‍यापैकी इराक, सीरिया आणि इराणमध्येही पसरलेले आहेत. कुर्द त्यांच्या काही प्रभावक्षेत्रांना मिळून स्वतंत्र कुर्दिस्तान देश बनवण्याची स्वप्ने पाहत आहे. मात्र, तुर्कस्तानने नेहमीच कुर्दिस्तानच्या मागणीला तीव्र विरोध केला असून, ‘कुर्दी’ संघटनेला तुर्कस्तान नेहमीच दहशतवादी संघटना मानत आला आहे. विशेष म्हणजे, कुर्द मजबूत आणि शक्तिशाली होण्यामागे अमेरिकेचा सर्वाधिक वाटा आहे.


‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने अमेरिका नेहमीच कुर्दींना समर्थन देत आला आहे. परिणामी, कुर्द पूर्वीपेक्षा आणखी मजबूत झाला आणि आता त्याचे परिणामी तुर्कस्तानला आणि सीरियाला भोगावे लागत आहे. त्यामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये अनेकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. हे कुर्दी सीमाभागावर स्थायिक असल्याने वादाला आणखी फोडणी मिळते. त्यामुळे युक्रेनप्रमाणेच कुर्दांनाही छुपा पाठिंबा देऊन तुर्कस्तान आणि सीरियात संघर्ष पेटवण्यात अमेरिका यशस्वी झाला. अफगाणिस्तानध्येही अमेरिकेने तेच केले.


आधी अफगाणिस्तानचे भले करण्याचा कांगावा करून आणि दहशतवादाचा बिमोड करू असे सांगत जम बसवला आणि अंगाशी आल्यानंतर तिथून पळ काढला. भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीतही अमेरिकेने दोन्ही देशांतील संबंध सुरळीत कसे होतील, यापेक्षा ते मुद्दे आणखी कसे पेटत राहतील यासाठीच प्रयत्न केले. परंतु, भारताने अमेरिकेचेच दात घशात घातले. त्यामुळे तुर्तास तरी अमेरिका भारताच्या वाट्याला जाऊ पाहत नाही. एकूणच काय तर अमेरिकेच्या या कुरापतखोर स्वभावामुळे छोट्या छोट्या देशांवर आपआपसांतच लढण्याची वेळ येते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.