भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यास ब्राझीलचा पाठिंबा

    09-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवार ब्राझीलमध्ये अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - "द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस" प्रदान करण्यात आला आहे.

पंतप्रधान आणि राष्ट्रपती लूला यांनी मर्यादित आणि प्रतिनिधीमंडळ पातळीवर चर्चा केली आणि भारत आणि ब्राझीलमधील बहुआयामी धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. त्यांनी भारत-ब्राझीलमधील मैत्रीपूर्ण संबंधांना आधार देणाऱ्या सामायिक मूल्यांना पुन्हा एकदा अधोरेखित केले. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, आरोग्य आणि औषधनिर्माण, अवकाश, अक्षय ऊर्जा, शेती आणि अन्न प्रक्रिया, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा विकास, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि यूपीआय, पारंपारिक औषध, योग, क्रीडा, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रातील सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे आभार मानले. हे दोन्ही देशांच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेला अधोरेखित करते. दहशतवादा बाबत अजिबात सहनशीलता नसावी आणि अशा अमानवी कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. दहशतवादाशी लढण्यासाठी आणि त्याचा पराभव करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र आणि जागतिक समुदायासोबत काम केले पाहिजे यावर अध्यक्ष लूला यांनी सहमती दर्शवली.

भारत – ब्राझीलदरम्यान झालेले सामंजस्य करार

· आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधात सहकार्य करार

· डिजिटल परिवर्तनासाठी मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या डिजिटल उपायांच्या सामायिकरणासाठी सहकार्याबाबत सामंजस्य करार

· अक्षय ऊर्जेतील सहकार्याबाबत सामंजस्य करार.

· ब्राधील भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्यात कृषी संशोधनाबाबत सामंजस्य करार.

· वर्गीकृत माहितीच्या देवाणघेवाण आणि परस्पर संरक्षणासंबंधी करार.

· भारताच्या डीपीआयआयटी आणि ब्राझीलच्या एमडीआयसीच्या स्पर्धात्मकता आणि नियामक धोरण सचिवालय यांच्यात बौद्धिक संपदा क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार

पंतप्रधानांना ब्राझीलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - "द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस" प्रदान केला.

हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान केल्याबद्दल ब्राझीलचे राष्ट्रपती,सरकार आणि ब्राझीलच्या जनतेचे पंतप्रधानांनी मनापासून आभार मानले. हा सन्मान भारताच्या 140 कोटी जनतेला आणि भारत आणि ब्राझीलमधील मैत्रीच्या शाश्वत बंधांना आदरांजली आहे,असे हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी नमूद केले. राष्ट्रपती लूला हे भारत-ब्राझील धोरणात्मक सहकार्याचे शिल्पकार आहेत आणि हा पुरस्कार म्हणजे या द्विपक्षीय संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचाही सन्मान आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. हा पुरस्कार दोन्ही देशांच्या लोकांना त्यांचे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणा देईल,अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली.