‘गोवर’च्या साथीच्या निमित्ताने...

    21-Nov-2022
Total Views |
govar


ताप येऊन तापाच्या पाचव्या दिवशी अंगावर दाट पुरळ दिसू लागते. गोवरचे निदान कळण्यासाठी रुग्णाची व्यवस्थित ‘हिस्ट्री’ घेणे, आजूबाजूला ‘गोवर’चा रुग्ण आहे का, याची चौकशी करणे महत्त्वाचे ठरते. ‘गोवर’च्या साथीच्या दिवसात अंगावर पुरळ दिसण्याच्या आधी ‘गोवर’चे निदान करणे शक्य आहे. तेव्हा, आज आपण ‘गोवर’च्या साथीला पुन्हा तोंड देत आहोत. त्यानिमित्ताने गोवरच्या आजाराचा आढावा घेऊ व लसीकरणाच्या कार्यक्रमाचा ऊहापोह करूया.


गोवरच्या साथीच्या निमित्ताने 40 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. 1980 मध्ये ‘वाडिया चिल्ड्रेन हॉस्पिटल’मध्ये निवासी डॉक्टर होतो. तेथे 50 खाटांचा प्रशस्त विभाग असायचा. अनेक प्रकारचे बालरुग्ण तेथे भरती असायचे. अचानक एखाद्या रुग्णाच्या अंगावर पुरळ दिसू लागायचे. त्याचे निदान ‘गोवर’ झाल्यास अशा रुग्णास ‘कस्तुरबा रुग्णालया’त पाठविले जायचे. कारण, हा साथीचा आजार इतर रुग्णांमध्ये पसरु शकतो. ‘गोवर’ची साथ झपाट्याने पसरत असे व त्यात गुंतागुंतीचे व मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त असे.
 
पुढे दाट वस्तीच्या औद्योगिक वसाहतीत ‘प्रॅक्टिस’ करताना ‘गोवर’चे अनेक रुग्ण बघण्यात आले. घरातील एका लहान मुलास ‘गोवर’ झाल्यास तो घरातील इतर लहान मुलांना व्हायचा. मग चाळीतील बर्‍याचशा मुलांना व्हायचा. यातील कुपोषित मुलांमध्ये गुंतागुंतीचे प्रमाण जास्त असायचे. ‘न्यूमोनिया’, ’ब्रोकोन्यूमोनिया’, ‘एनसेफेलायटिस’ यामुळे काही रुग्णांना भरती करावे लागत होते. 80च्या दशकात ‘गोवर’ची लस भारतात उपलब्ध झाली. काही वर्षांतच ती सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध झाली. ही लस एवढी प्रभावी होती की, गेल्या 30 वर्षांत ‘गोवर’चे प्रमाण एकदम कमी होत चालले होते. पुढे ’एमएमआर’ (मिसल्स, मम्प्स, रुबेला) ही लस 15व्या महिन्यात देण्यात येऊ लागली. यामुळेदेखील ‘गोवर’च्या आजाराचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले.

आज आपण ‘गोवर’च्या साथीला पुन्हा तोंड देत आहोत. यानिमित्ताने गोवरच्या आजाराचा आढावा घेऊ व लसीकरणाच्या कार्यक्रमाचा ऊहापोह करूया.‘गोवर’ हा ‘पॅरामिक्सोमा’ व्हायरसमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार तीन ते पाच वर्षांच्या मुलांमध्ये अधिक आढळतो. लस दिलेली नसल्यास हा आजार होण्याची शक्यता वाढते.

‘गोवर’चे निदान


ताप येऊन तापाच्या पाचव्या दिवशी अंगावर दाट पुरळ दिसू लागते. गोवरचे निदान कळण्यासाठी रुग्णाची व्यवस्थित ‘हिस्ट्री’ घेणे, आजूबाजूला ’गोवर’चा रुग्ण आहे का, याची चौकशी करणे महत्त्वाचे ठरते. ‘गोवर’च्या साथीच्या दिवसात अंगावर पुरळ दिसण्याच्या आधी ‘गोवर’चे निदान करणे शक्य आहे. डोळे लाल होणे, डोळ्याखाली सूज येणे, नाक गळत राहणे व तोंडामध्ये दाढेच्या बाजूला साबुदाण्यासारखे पुरळ उठणे (कॉप्लिक स्पॉट) ही सर्व लक्षणे तापाच्या रुग्णात दिसल्यास ’गोवर’चे निदान लवकर करता येते व अशा रुग्णांना वेगळे ठेवता येते. वस्तीमध्ये सर्व्हे करुन तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांचे ‘गोवर’ लसीकरण तपासणे गरजेचे आहे.

‘गोवर’ लसीकरण काही कारणांनी राहिले असल्यास ते लवकरात लवकर आयोजित करणे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ‘गोवर’ची लस ही प्रभावी आहे. नवव्या महिन्यात ’गोवर’ची लस दिली जाते. 15व्या महिन्यात ‘एमएमआर’ची लस दिली जाते, जी ‘बूस्टर डोस’ म्हणून उपयोगात येते. प्राथमिक लसीकरण झाले असल्यास जन्मभर ‘गोवर’पासून संरक्षण मिळते. या सर्वांमुळे गेल्या तीन दशकात गोवरच्या रुग्णांची संख्या एकदम कमी होऊ लागली आहे. लस सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध असल्यामुळे ती व्यापक प्रमाणात दिली गेली. अगदी दाट वस्तीच्या झोपडपट्टीत आणि दुर्गम ग्रामीण भागातदेखील ‘गोवर’ची लस पोहोचली. असे असताना मुंबईत अनेक रुग्णांना ‘गोवर’ होणे ही बाब चिंताजनक आहे.

कोरोना ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्व जनजीवनच ठप्प झाले होते. लहान मुलांचे प्राथमिक लसीकरणदेखील लांबले होते. बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आधी त्याला सुमारे सात ते आठ आजारांविरुद्ध प्रतिबंधक लसी सरकारी दवाखान्यात मोफत दिल्या जातात. कोरोना काळात हे बंद झाले होते. कदाचित त्यामुळे ही ’गोवर’ची साथ पुन्हा डोके वर काढत आहे.’कोरोनानंतर काय?’ या लेखात मुलांच्या प्राथमिक लसीकरणाबद्दल लिहिले होते. लहान मुलांच्या लसीकरणाचा सर्व्हे करुन कोरोना काळात राहून गेलेल्या लसी अग्रक्रमाने देणे आवश्यक होते. त्याबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता होती. पण, प्रशासकीय पातळीवर आम्ही कमी पडलो. आजही कुठली लस कधी घ्यायची, याबद्दल सामान्य पालकांच्या मनात संभ्रम आहे. याला कारणीभूत आहेत. आमच्याकडे अस्तित्वात असलेले दोन लसीकरण कार्यक्रम.

 
 
1) राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम : या कार्यक्रमाद्वारे ‘बीसीजी’, ‘पोलिओ’, ‘पंचगुणी’, ‘गोवर’, ‘एमएमआर’ या लसी मोफत दिल्या जातात. 2014 नंतर त्रिगुणी लसीमध्ये आणखी दोन लसींची भर घालून ही ‘पंचगुणी’ लस मोफत देण्यात येऊ लागली. तोपर्यंत ‘हिपेटायटिस बी’ आणि ‘हिब टायटर’ लस ही खासगी डॉक्टरांमार्फत व बालरोगतज्ज्ञांमार्फत भरमसाठ किमतीत दिली जात होती.ती लस केंद्र सरकारने मोफत उपलब्ध करुन दिली. ज्या लसी सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहेत, त्या तिथे घ्याव्या व उरलेल्या ऐच्छिक लसी आपल्या ‘बजेट’नुसार खासगी डॉक्टरकडून घ्याव्या, असे धोरण असायला पाहिजे होते. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम हा मुख्य कार्यक्रम राहावा व तो एकमेव राहावा. पण पालकांच्या मनात गोंधळ निर्माण करणारा दुसरा एक लसीकरण कार्यक्रम आम्ही अस्तित्वात आणला.

2) इंडियन अकॅडमी ऑफ पीडिअ‍ॅट्रिक्स लसीकरण कार्यक्रम : ‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडिअ‍ॅट्रिक्स’ (आयएपी) ही देशव्यापी बालरोगतज्ज्ञांची संघटना आहे. या संघटनेने आपला वेगळा लसीकरणाचा कार्यक्रम दिला आहे. यात अनेक नवीन व महागड्या लसींचा समावेश आहे. या लसींबद्दल लोकशिक्षणही व्यवस्थित झालेले नसल्याने पालकांच्या मनात याबद्दल संभ्रम आहे. काही लसीच्या किमती पाच हजार रुपयांच्या घरात आहे. सामान्य नागरिकांना ते परवडण्यासारखे नाही. या सर्व लसी ऐच्छिक म्हणून घोषित कराव्यात. ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे, तेही लस घेतील, पण उरलेल्या पालकांना वेठीस धरू नये.

‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडिअ‍ॅट्रिक्स’ ही संस्था देशातील बालआरोग्याची काळजी घेते, असे चित्र रंगविण्यात येते. परंतु, तशी वस्तुस्थिती नाही. सरकारी रुग्णालये, महानगरपालिका दवाखाने, ‘बीएएमएस’, ‘एमबीबीएस’, ‘होमियोपॅथी फॅमिली डॉक्टर’ हे सर्वच राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत सहभागी असतात. ‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडिअ‍ॅट्रिक्स’चा लसीकरणातील वाटा हा छोटा आहे. महागड्या लसी या उच्चभ्रू वस्तीतील मुलांना दिल्या जातात. लसी जोपर्यंत दाट लोकवस्तीत व ग्रामीण भागात पोहोचत नाहीत, तोपर्यंत त्यांचा आजार कमी करण्यासाठी उपयोग होणार नाही. ‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडिअ‍ॅट्रिक्स’चा लसीकरण कार्यक्रम रद्द करावा व फक्त एकच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम राबविला जावा. ‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडिअ‍ॅट्रिक्स’ची भूमिका ही फक्त सल्लागाराची असावी. उरलेल्या सर्व महागड्या लसी बालरोगतज्ज्ञांनी त्यांच्या खासगी क्लिनिकमध्ये खुशाल द्याव्यात, पण त्यांनी सामान्य जनतेस वेठीस धरू नये.

लसीकरणाबद्दल पालकांच्या मनामध्ये असलेले संभ्रम, भीती, अपराधीपणाची भावना हे सर्व बघून 2013 साली ‘लसीकरण-पालकांचे गाईड’ हे पुस्तक प्रकाशित केले. लसीकरणाचा इतिहास, लसीकरण का करावे व कुठे करावे याबद्दल त्यात मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य लोकशिक्षणाचा तो एक प्रयत्न होता. सर्व लसींची सखोल माहिती देण्यात आली होती. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम व ‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडिअ‍ॅट्रिक्स’ लसीकरण कार्यक्रम यांचा तक्तादेखील देण्यात आला होता. ज्यांना खासगी डॉक्टरकडून लसीकरण करणे शक्य आहे ते त्यांनी अवश्य करावे, पण सामान्य नागरिकांनी सरकारी रुग्णालयातील मोफत लसीकरणाचा फायदा घ्यावा. उरलेल्या लसी आपल्या सवडीप्रमाणे घ्याव्या.एखादे महागडे लसीकरण राहिल्यास काय होईल? असा प्रश्न पालकांकडून विचारला जातो. मी त्यांना उत्तर देतो - “आंधळ्याच्या गाई देव राखी.” ज्याने आपल्याला कोरोनाच्या साथीतून वाचविले तो आपल्याला ‘गोवर’च्या साथीतून पण वाचवेल.

’गोवर’ची साथ आटोक्यात आणण्यासाठीचे उपाय


1) ‘गोवर’च्या रुग्णांचे लवकर निदान व ‘आयसोलेशन.’

2) ‘गोवर’ प्रभावित वस्तीमधील ‘गोवर’ लसीकरणाचा सर्व्हे करणे.

3) लसीकरण न झालेल्या मुलांना लवकरात लवकर ‘गोवर’ व ‘एमएमआर’ची लस देणे.

4) एकच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम राबविला जावा. उरलेल्या महागड्या लसी या ऐच्छिक घोषित कराव्या.
’गोवर’ची साथ लवकर आटोक्यात येवो, ही सदिच्छा!
-डॉ. मिलिंद शेजवळआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.