“कुठल्याही क्षेत्रात करिअर करताना ठरावीक काळ आणि संयम आवश्यक असतो, तसेच शास्त्रीय कथ्थक नृत्यातही तुम्ही झोेकून देऊन विद्यार्जन करा, ‘रियाझ’ करा यश तुमचेच आहे,” असे विद्या देशपांडे आपल्या शिष्यांना सांगतात. नृत्य हे ‘नोबल करिअर’ आहे. नृत्यातून केवळ पैसाच नव्हे तर जागतिक कीर्ती, अनेक रसिकांचा आदर, गौरव, सन्मान आणि मुख्य म्हणजे ईशसाधनेची आध्यात्मिक संतुष्टीही मिळते, असे सांगणार्या विद्या देशपांडे म्हणतात की, “नृत्य माझा श्वास आहे आणि तीच ईश्वराला प्राप्त करण्याची साधना आहे.”
विद्या देशपांडे यांच्या घराण्यात कोणी कधीही शास्त्रीय नृत्य शिकलेले नव्हते. जे ज्ञान आपल्याला शिकता आले नाही ते पुढील पिढीने आत्मसात करावे, असे त्यांच्या आईला वाटे. म्हणूनच विद्या देशपांडे यांच्या आईने त्यांच्या मोठ्या मुलीला म्हणजे, विद्या देशपांडे यांच्या भगिनीला नृत्याचे शिक्षण देण्यासाठी नाशिकमधील कथ्थक शिकवणारे एकमेव गुरू उस्ताद हैदर शेख यांच्याकडे नृत्य शिकण्यासाठी पाठवत. तेव्हा मोठ्या ताईसोबत लहानग्या विद्याही नृत्य पाहण्यासाठी जात असे. मात्र, नृत्य शिकण्यासाठी वय कमी असल्याने नृत्याच्या वर्गात शिकण्यासाठी अधिकृत प्रवेश नसे. मात्र, ताईचे नृत्य पाहून विद्या देशपांडे यांनाही बालपणीच नृत्यांचे आकर्षण निर्माण झाले. तेव्हा नाशिकमध्ये शास्त्रीय कलेचे आतासारखे वातावरण नव्हते.
दरम्यान, विद्याताई शिक्षण घेत असताना ‘स्वरसाधना’ संस्थेतर्फे होणार्या नृत्यस्पर्धेत विद्या देशपांडे यांना नृत्य करण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांना कळाले की, नृत्याचे विश्व अत्यंत व्यापक, नानाविध पैलूंनी सजलेले आहे. तिथे विद्या यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. शालेय जीवनातील हा अनुभव विद्या यांच्या नृत्यविषयक जाणीवा समृद्ध करणारा ठरला. त्यानंतर नृत्यातच करिअर करायचे, असे त्यांनी ठरवले.
पुढे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्या देशपांडे यांना करिअर करण्याविषयी विचारणा करण्यात आली तेव्हा “नृत्य मला आवडते आणि त्यातच मी पुढे जाऊ शकते,” असे त्यांनी आई-वडिलांना सांगितले. त्यांच्या वडिलांना विद्या यांनी वकिली करावी, असे वाटे. मात्र, वकिलीचा पेशा माझ्यासाठी नाही मला नृत्यातच करिअर करायचे, असे विद्या देशपांडे यांनी त्यावेळी ठरवले आणि त्याही वयात विज्ञान शाखेला प्रवेश न घेता वाणिज्य शाखा निवडून नृत्य शिक्षणात स्वत:ला झोकून दिले.
पुढे उस्ताद हैदर खान यांनी विद्या यांची नृत्याची गती ओळखून त्यांना पुढील शिक्षणासाठी नृत्यातील नावाजलेले नाव सीतारादेवी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. परंतु, काही कारणांनी ते शक्य झाले नाही.
दरम्यान, विद्या यांचा विवाह गायक आणि रंगभूमी कलाकार, दिग्दर्शक सुनील देशपांडे यांच्याशी झाला. त्यांनी विद्या देशपांडे यांच्या कलेला अधिक पुढे नेण्यासाठी नृत्याचे पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि पंडिता रोहिणी भाटे या नृत्यगुरूंकडे त्यांचे शिक्षण सुुरू झाले. त्याकाळी विद्या यांनी आठवड्यातून एकदा नाशिक-पुणे असा प्रवास करुन नृत्याचे धडे गिरवले. त्यानंतर विद्या देशपांडेंना पं. बिरजू महाराज यांच्या नृत्यकार्य शाळेबद्दल समजले. ती मुंबईत होेणार होती. त्यात प्रवेश घेऊन विद्या यांनी दुसर्या गुरूजींचेही नृत्य बारकावे शिकून घेतले. तब्बल 25 वर्षे सलग विद्या यांनी पं. बिरजू महाराजांच्या कार्यशाळेत सहभाग घेतला.
आता नृत्यात प्रावीण्य मिळत होते. त्यानंतर तालयोगी तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांच्या कार्यशाळेत त्यांनी भाग घेतला. नृत्यात लयकारीला विलक्षण महत्त्व असते. अभिनयासह लयकारी असणे गरजेचेच असते. त्याचे ज्ञान विद्या यांनी पं. तळवलकरांकडून घेतले.
कथ्थक नृत्याचे ज्ञान आणि त्यात प्रावीण्य मिळवत असतानाच हे ज्ञान नाशिकच्या नवीन पिढीला कळावे यासाठी विद्या यांनी नाशिकमध्ये कथ्थकचे वर्ग सुरू केले. विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर जागा घेऊन अनेक समस्यांवर मात करुन नृत्यसाधनेसह नृत्य अध्यापनही सुरूच ठेवले.
दरम्यान, विद्या देशपांडेंनी रंगमंच कलाही सुरू ठेवली. अभिनय आणि नृत्य यांचे गुरू त्यांना मिळत गेले. नृत्यात अभिनय असतो, तर अभिनयात ताल, लयही असतो. त्यामुळे त्यांनी अनेक नाटकांमध्येही उत्तम अभिनय आणि नृत्याचे सादरीकरण करुन दोेन्ही कला फुलवल्या. पं. बिरजू महाराज यांच्यासह ‘विश्वरुपम्’ सिनेमासाठी विद्या यांनी नृत्यदिग्दर्शन केले. त्याचे खूप कौतुक झाले.
‘रोटरी क्लब’तर्फे अमेरिकेतील टेक्सासमध्ये मंचीय नृत्याविष्कार सादर केल्यानंतर विद्याताईंना ‘रेनडान्स’साठी विचारणा करण्यात आली. भारतात शास्त्रीय नृत्यातून मेघाला आवाहन केले जाते विद्या यांनी सांगितले. तिथे मेघ, पर्जन्य असे विषय घेऊन रेन डान्स केला आणि त्या भागात तब्बल तीन वर्षानंतर पाऊस पडला. हा योगायोग होेता. मात्र, त्यानंतर ‘रेनडान्स वुमन’ म्हणून त्यांना अमेरिकेत विचारणा होऊ लागली तेव्हा यातून चुकीचा संदेश जात असल्याचे लक्षात येताच विद्या यांनी अभिजात नृत्य, संगीत परंपरेचे सुरेख भाष्य तेथील लोकांसमोर ठेवले.
आज त्यांच्या वर्गातून नृत्य शिकणारे विद्यार्थी मोठे यश मिळवत आहेत. नृत्यातून उत्तम अर्थाजन होईल का असा प्रश्न नवीन मुली त्यांना विचारताच तेव्हा त्यांचे उत्तर असते. “कुठल्याही क्षेत्रात करिअर करताना ठराविक काळ आणि संयम आवश्यक असतो तसेच शास्त्रीय कथ्थक नृत्यातही तूम्ही झोकून देऊन विद्यार्जन करा, रियाझ करा, मग यश तुमचेच आहे,” असे विद्या देशपांडे आपल्या शिष्यांना सांगतात. “नृत्य हे ‘नोबल करिअर’ आहे. नृत्यातून केवळ पैसाच नव्हे, तर जागतिक कीर्ती, अनेक रसिकांचा आदर, गौरव, सन्मान आणि मुख्य म्हणजे ईशसाधनेची आध्यात्मिक संतुष्टीही नृत्यातून मिळते,” असे सांगणार्या विद्या देशपांडे म्हणतात की, “नृत्य माझा श्वास आहे आणि तीच ईश्वराला प्राप्त करण्याची साधना आहे.”
- निल कुलकर्णी