पूजा वनदुर्गांची

    04-Oct-2022
Total Views |

जिजाबाई कोकणे
 
 
 
नवरात्री म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन आनंदोत्सव करण्याचा सोहळा. नवरात्राला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. नवरात्रात कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती किंवा महादुर्गा अशा विविध रुपांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या देशालाही भारतमातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. मात्र समाजात दुर्लक्षित राहिलेल्या, न्यूनगंडामुळे पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहून इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या स्वयंप्रेरित ‘वनदुर्गां‘ची आपणास माहिती नसते. नवरात्रीच्या निमित्ताने अशाच काही वनदुर्गांचा परिचय.
 
 
परंपरा जोपासणाऱ्या सरपंच -
 
सामाजिक कार्याची त्यांना उपजतच आवड आणि त्याचबरोबर अध्यात्माची वडिलांकडून मिळालेली देणगी. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना याचा त्यांना उपयोग होतो. महिलांमध्ये केवळ प्रश्नांची जाणीव निर्माण होऊन फायदा नाही तर त्या सोडविण्याची ताकदही निर्माण झाली पाहिजे, ही त्यांची धारणा. परंपरा जोपासत कार्य करणाऱ्या जिजाबाई कोकणे या यासाठी अविरत मेहनत घेत आहेत.
 
जिजाबाई कोकणे या शेंदुर्ली-खामकरवाडी (ता. खेड) येथे राहतात. त्या २०१९ पासून सरपंच आहेत. गेली पाच वर्षे कल्याण आश्रमाच्या आरोग्यरक्षिका आहेत. धार्मिक वृत्तीच्या जिजाबाई आपल्या बैठकांमध्ये व्यग्र असताना वेळात वेळ काढून पाहुण्यांचे अगत्य करतात. महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असणाऱ्या मर्यादा आणि अनुभव सहज सांगत ग्रामीण भागात महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी जनजागृती अभियान राबविण्याचा त्यांचा मानस आहे.
 
 
जिजाबाई यांनी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे काम केले आहे. रात्र शाळेत सातवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले आहे. आळंदी येथे साक्षरता प्रशिक्षण झाले होते त्यावेळी आसपासच्या २६ गावांचे प्रत्येकी २ जण त्याला उपस्थित होते. जीवनात प्रथमच गाव सोडून मोठे शहर त्यांनी त्यावेळी पाहिले. इतकी नवीन माणसे भेटली. त्याचे अप्रूप वाटले. त्यातून समाजात मिसळत समाजकाम करण्याची प्रेरणा मिळाली. दिलखुलास गप्पा मारत जिजाबाई सांगत होत्या.
 
कल्याण आश्रमाचे दिशादर्शन
 
 
कोरोना काळात आरोग्य रक्षिका म्हणून त्यांनी काम केले. स्वच्छता नियम पाळण्यासाठी नागरिकांमध्ये जाऊन त्यांना आवाहन करणे, घरोघरी औषधे पोहोच करणे, वेळ प्रसंगी रुग्णांना दवाखाना उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. कल्याण आश्रमाचे विशालजी भुरुक आणि अरुणजी काठे यांच्या नियमित प्रवासातून, मार्गदर्शनातून आम्ही हे आरोग्यरक्षिकेचे काम स्वीकारले, घरातून सहकार्य होतेच परंतु कल्याण आश्रम आमच्या पाठीशी सक्षमपणे उभा होता. वेळोवेळी गावासाठी मिळणारी औषधे कामासाठी प्रेरणा आणि दिशादर्शन यामुळे आमच्यात एक विश्वास निर्माण झाला. जनजाती कल्याण आश्रमाच्या कामाच्या माध्यमातून प्रेरणा देत गावात काम करण्याची संधी मिळते. त्याविषयी मी कृतज्ञ असून पुढे काम असेच सुरु रहावे अशी इच्छा जिजाबाई व्यक्त करतात.
 
 
सामाजिक समस्यांची जाण
 
 
लोकप्रतिनिधी म्हणून अर्थात सरपंच म्हणून काम करताना गावात व आसपासच्या वाड्या वस्त्यात मुलभूत सुविधांचा वाणवा असल्याचे त्या सांगतात. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. गावात येताना धरण आणि पाणी भरपूर दिसते परंतु ते घरापर्यंत येत नाही. डोंगरातून लांबून डोक्यावर हंडे घेऊन दिवसातून चार पाच वेळा महिला पाणी आणतात. हे दृश्य बदलायला पाहिजे. गावात दळणवळण सुविधा नाहीत. रस्ते नीट नाहीत. आपल्या समस्या मांडायला महिला सक्षम नाहीत. महिला अजून खूप मागे आहेत. गावात सर्वत्र पाणी, लाईट, रस्ता आवश्यक आहेत पश्चिम पट्ट्यात ते अजून उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रे लांब ९/१० किमी अंतरावर आहेत. त्यामुळे अनेक वेळा गैरसोय होते. हे प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
महिलांमध्ये आपल्याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अजून जनजागृती व्हायला पाहिजे. अनेक वेळा होणाऱ्या ग्रामसभा, मिटींगला महिला उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचत नाही. समस्यांची चर्चा होत नाही. योजना येते इतकीच त्रोटक माहिती मिळते, वीज, रस्ता, पाणी जागेचे नियम, बक्षीसपत्र करणे, जागा उपलब्ध करणे यात समाज कमी पडतो याला शासन आणि लोकप्रतिनिधी दोघेही जबाबदार आहेत. वेळोवेळी माहिती योग्य ठिकाणी पोहोचायला हवी. समाजाच्या तळागाळापर्यंत सर्व योजना पोहोचायला हव्यात त्यासाठी मोठ्या जनजागृती अभियानाची गरज असल्याचे जिजाबाई यांनी अधोरेखित केले.
 
 
परंपरेची जोपासना
 
 
सध्याच्या पिढीला शिमगा, नागपंचमीसारखे सण त्यातील परंपरा माहिती नाहीत. त्यांना हे सर्व शिकवायला लागते, हे संपत चालेल आहे. आपली परंपरा आपणच जोपासली नाही तर कसे होणार? यासाठी पुढील पिढीला एकत्र करत स्वतःच्या मुलींपासून समाजातील सर्व महिला एकत्र करते. त्यांना विविध पारंपारिक गाणी, फेर धरणे, त्यातील आनंद, एकत्र येण्यातील मजा, शरीराचा त्यातून होणारा व्यायाम, मनाची मशागत, आपल्या समस्या, विचार, म्हणणे याची देवाण घेवाण, फुगडीचे प्रकार शिकविते. माझे शेकडो गाणी तोंड पाठ आहेत पुढील पिढीने त्यातील दहा टक्के तरी जतन करावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिजाबाई पोट तिडकीने सांगत होत्या.
 
 
वारकरी परंपरा
 
 
वारकरी संप्रदायाचा वारसा वडिलांकडून मिळालेला आहे. चौथीत शिकत असल्यापासून त्या वडिलांसोबत असत. त्या पेटीवर गायच्या. वडील पखवाज वाजवायचे आणि काका पेटी मास्तर होते. त्यांनी २००७ पासून चरित्र वाचायला सुरुवात केली. रामविजय, हरिविजय अशी १७ वर्षे त्या कथा लावत आहेत. कथा हे एक साधन असते ज्ञानाची प्राप्ती असेल तर समाजकार्य करण्यासाठी कथा माध्यम खूप उपयोगी आहे. त्याने संयम शिकवला. समाजात ओळख मिळाली. कथेतून समाजात मिसळायला, त्यांच्या समस्या जाणून घेण्यास मदत झाली शिक्षण कमी आहे पण सभाधीटपणा त्यातून आला असेही जिजाबाई आवर्जून सांगतात.
 
 
विज्ञान फार पुढे गेले असले तरी आजही पूर्वी निश्चित केलेल्या गोष्टींच्या आधार धरुनच आपण पुढे चाललो आहे. कृष्णलीलामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यात जो संवाद झाला त्याचा आजही काम करतांना प्रत्यय येतो. धार्मिक वृत्तीच्या जिजाबाई सहज अनेक भजनं अभंग म्हणतात. समाजाचे जागरण करण्याचे काम आपल्या सर्व संत महंतांनी केले आपण तेच कार्य पुढे चालू ठेवत मार्गक्रमणा करायची असा त्यांचा मनोदय आहे.
 
 
 
-अंजली तागडे
 
संपादक
 
विश्व संवाद केंद्र, पुणे