कष्टाळू - चंद्रभागाबाई सुपे

    03-Oct-2022
Total Views | 58

Chandrabhagabai Supe
 
 
पुणे जिल्ह्यात वाडाजवळ सुपेवाडी – भगतवाडी येथे चंद्रभागाबाई राहतात. पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या चंद्रभागाबाई आरोग्यरक्षिका आहेत. जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून त्यांना आरोग्य रक्षिका म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेतात काम करत, लांबून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पेंड आणायला तीन डोंगर चढून उतरून डोक्यावर आणणाऱ्या ताई अत्यंत कष्टाळू आणि काटक आहेत.
 
 
अनुभवांची शिदोरी
 
 
कोरोनाची साथ आली तेव्हा आरोग्य रक्षिका म्हणून काम करताना त्या दररोज दवाखान्यात जात होत्या, बाहेर पडत होत्या तसेच जनजातीच्या कार्यकर्त्यानी आणून दिलेली औषधे सर्वत्र वाटप करत होत्या. समाजाचे आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांच्या वाडीत आणि आसपासच्या गावात त्या धडपडत होत्या. पण दुसरीकडे नागरिकांना कोरोनाच्या संकटाची भीती होती. कोणी त्यांच्याशी, त्यांच्या कुटुंबियांशी बोलत नव्हते. मुलांना खेळायला येऊ देत नव्हते, एकमेकांत मिसळत नव्हते, मोठा कठीण काळ होता तो... जणू त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकल्यासारखे झाले होते. चंद्र्भागाताई भरभरून सांगत होत्या. मुलाबाळांची काळजी वाटत होती. स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. सर्व काही देवावर भरवसा टाकून तो वर बसलाय ना, मग झाले! त्यानेच हे काम करण्याची उर्जा दिली आहे तर का नाही करायचेॽ हा विचार मनात कायम ठेऊन त्या काम करत राहिल्या.
 
 
कुटुंबाचे सहकार्य
 
 
या कामासाठी घरातून सासूबाई, पती व चारही मुलींनी सहकार्य केले. औषध मात्रा मुलींनी समजून घेतली. दवाखान्यात गेल्या असताना कुटुंबाने रुग्णांना तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी असलेली औषधे देण्यासाठी मोलाची मदत केली. त्यामुळे एकही माणूस औषधाशिवाय परत गेला नाही, याचे समाधान आहे. जनजाती आश्रमाचे कार्यकर्ते वेळोवेळी येऊन आवश्यक ती औषधे देत असल्याने सुदैवाने सुपेवाडी- भगतवाडी येथे एकही रुग्ण कोरोनाचा सापडला नाही हीच कामाची पावती.
आता सर्वजण येतात, चांगले काम केले सांगतात, कौतुक करतात पण कसोटीच्या क्षणी सगळे कसे वागले, जवळचे नातेवाईक गेले असताना कोणी जवळ जायला तयार नसताना, चंद्रभागा बाई स्वतः पुढे झाल्या आणि कुटुंबियांना आवश्यक ती मदत करत दिलासा दिला. आज मागे वळून पाहताना कोरोना काळ आठवला तरी अंगावर काटा येतो, पण देवीच्या कृपेने आम्ही व्यवस्थित आहोत. तिनेच करवून घेतले असे वाटते, असा विश्वास चंद्रभागाबाई यांनी व्यक्त केला.
 
 
सांस्कृतिक परंपरा जोपासना
 
 
जनजाती समाजातील त्यांचे कुलदैवत असलेल्या अंदाजे ४०० वर्षांपूर्वीचे गडदू देवीचे मंदिर डोंगरावर आहे. निसर्गाच्या सानिध्यात डोंगरात वसलेले गडदूदेवी आणि कळमजाई देवीचे मंदिर जागृत देवस्थान आहे. देवीच्या समोर वाघ आणि नंदी आहेत. अत्यंत गारवा आणि आल्हाददायक वातावरणात मंदिरात साडेतीन शक्तिपीठांचे आपल्याला दर्शन घडते. चंद्रभागाबाई यांचे सासरे पुजारी आहेत. नवरात्रीचा उत्सव खूप उत्साहाने त्या साजरा करतात. वर्षानुवर्षे देवीची पूजा करतात.
 
 
नवसाला पावणारी ही देवी महादेव कोळी जनजाती समाजाची कुलदेवता आहे. गेल्या चार पिढ्या आम्ही ६ घरात पुजारी आहोत. रंगपंचमी, नवरात्र असे दोन तीन मोठे उत्सव करतो. सर्वांना महाप्रसाद करतो. आसपासच्या गावातून वाड्या-वस्त्यातून येणाऱ्या भाविकांना विजयादशमीच्या दिवशी महाप्रसाद असतो. चंद्रभागाबाई सांगत होत्या, रात्रभर त्या सहा घरांतील महिला पोळ्या करतात आणि सर्वांसाठी प्रसाद बनवितात. कधीही प्रसाद कमी पडला नाही, हे आवर्जून सांगतात. श्रद्धा आणि भक्तिभावाने त्या सर्व करत आहेत हे जाणवते.
 
 
कल्याण आश्रमाविषयी कृतज्ञता
 
 
गेली १० वर्षे त्या जनजाती कल्याण आश्रमाचे काम करत आहेत. होतकरू नागरिकांसाठी काम करण्याची इच्छा होती. तुकाराम सुरकुले या जनजाती कार्यकर्त्यांनी या कामासाठी मला प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाने काम करू शकले.
 
 
बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करत आहोत. प्रत्येकीची आलेली आर्थिक अडचणीची वेळ निघून जाण्यासाठी मदत करतो. स्वतःला कुटुंबियांना आजारी पडल्यावर तसेच आसपासच्या नागरिकांना कुटुंब सावरायला जनजाती कल्याण आश्रमाच्या विविध योजनांचा उपयोग होतो आहे.
 
 
कोरोना काळात सावरायला कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी धीर दिला. त्यामुळे आधार वाटला, हिमतीने उभे राहायला मदत झाली. दवाखान्यात जाऊनसुद्धा औषधे मिळत नव्हती पण कल्याण आश्रम आमच्या पाठीशी उभा आहे कायम...
पाचवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या चंद्रभागाबाई बऱ्या-वाईट अनुभवांची शिदोरी घेऊन काम करत आहेत. पण कामासाठी कष्ट घेण्यासाठी चिकाटीने रात्रंदिन तयार आहेत सांस्कृतिक परंपरा जपत आहेत. त्याचे जतन करण्यासाठी पुढील पिढीलासुद्धा प्रेरणा देत आहेत. प्रत्येक गोष्टीत सुवर्णमध्य काढत, आनंदाने काम करत निसर्गाच्या सानिध्यात आरोग्यसंपन्न राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
 
-अंजली तागडे
संपादक
विश्व संवाद केंद्र पुणे
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121