नवरात्री म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन आनंदोत्सव करण्याचा सोहळा. नवरात्राला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. नवरात्रात कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती किंवा महादुर्गा अशा विविध रुपांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या देशालाही भारतमातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. मात्र समाजात दुर्लक्षित राहिलेल्या, न्यूनगंडामुळे पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहून इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या स्वयंप्रेरित ‘वनदुर्गां‘ची आपणास माहिती नसते. नवरात्रीच्या निमित्ताने अशाच काही वनदुर्गांचा परिचय.
अष्टावधानी - दुर्गा नांगरे
▪️खेड तालुक्यातील मोरोशी इथे राहणाऱ्या जनजाती समाजातील दुर्गाताई नांगरे यांना लहानपणापासून समाजातील आपल्या बांधवासाठी काहीतरी करण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहावी, सक्षम बनावी, तिला काहीतरी हाताला काम मिळावे, रोजगार उपलब्ध व्हावा असे मनात वाटत होते. अत्यंत उत्साही, चपळ, आनंदी आणि सहकारी वृत्तीच्या दुर्गा ताई यांना जनजाती कल्याण आश्रमाचे बोंद्रे दादा भेटले आणि दुर्गाताईंना आपल्या कार्याचा सूर सापडला. त्यांची तीव्र इच्छा कृतीत उतरली.
▪️निसर्गरम्य मोरोशी इथे दुर्गा ताई वनधन योजनेच्या अध्यक्ष आहेत.बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग चालवितात. जनजाती कल्याण आश्रामाच्या कामात सक्रीय असून आरोग्य रक्षिका आहेत. कल्याण आश्रमाने गावागावात वाड्या वस्त्यांपर्यंत आरोग्य पेटी पोहोचवली आहे. त्याचे प्रशिक्षण महिलांना दिले आहे. अनेक वेळा प्रथमोपचार आवश्यक असतात त्यावेळी सक्षमपणे त्या घरोघरी आवश्यकता आहे तिथे जाऊन काम करतात.
▪️घरातून समाजकार्याचा वसा ▪️
घरातूनच त्यांना समाज कार्याचा वारसा लाभला. वडिलांचा संपर्क, माणसे जोडण्याची हातोटी, भजने, अभंग यातून परंपरा जोपासना सोबतच स्वतः आणि समाजाला आनंद देण्याची वृत्ती दुर्गा ताई यांना लहान पणापासूनच साद घालत होती. कितीही कठीण प्रसंग आला तरी जीवनाची घडी विस्कटू द्यायची नाही, तर पुढे बघायचे हा वडिलांचा आशावाद त्या कायम अमलात आणतात. काम करतोय तर अडचणी येणारच, पण त्याची सहजता स्वीकारली कि झाले असा कामाचा उत्साह त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होता. जिद्दीने कामात उतरल्यावर पतींनी सुद्धा उत्तम साथ दिली. त्यांनी आणि कुटुंबियांनी कायम विश्वास दाखवल्याने आज काहीतरी करून दाखवू शकले. स्वतःला त्यात समाधान आहे. विश्वासाची गुरुकिल्ली पुढे जायला बळ देते असा दुर्दम्य आशावाद त्यांच्या बोण्यातून जाणवला.
▪️वन धन योजना▪️
केंद्र शासनाची वनधन योजना त्या मोरोशी इथे राबवितात. त्याच्या त्या अध्यक्ष आहेत. वनातून धन असा त्याचा ढोबळमानाने अर्थ. पण त्याचे सोने कसे करायचे,. त्या योजनेचे व्यवस्थापन त्या उत्तम पार पाडतात. पंचायत समितीच्या सीआर पी म्हणूनही त्या कार्यरत आहेत. वन धन योजनेला त्यांना २०१९ मध्ये परवानगी मिळाली. वनाच्या माध्यमातून मिळणारे साहित्य हिरडा, भेरडा विविध वनस्पती, वनौषधी त्यातून रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. कल्याण आश्रमाच्या मदतीचा उपयोग करत त्यांनी १५ समुह एकत्र करत आसपासच्या गावातून वाड्या वस्त्यातून त्याबाबत जागृती करत योजनेचे ३०० सभासद केले आहेत.
▪️बचत गट▪️
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोक्ती अभियानामार्फत त्यांनी बचत गट स्थापन केला आहे. १०० महिला त्याच्या सदस्य आहेत. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पंचायत समिती कल्याण आश्रम अशा संस्थांच्या मदतीने प्रशिक्षणे आयोजित करतात. स्वतः प्रशिक्षण घेत गावातील महिलांना प्रोत्साहित करतात.
त्याद्वारे अगरबत्ती, मेणबत्ती व्यवसाय २०१९ पासून सुरु असून आत्ता ८ महिला व्यवसायात सहभागी आहेत.
▪️महिला सक्षमीकरण ▪️
शबरी महामंडळ यांच्याकडून वेळोवेळी त्यांना प्रशिक्षण मिळाले असून त्याचे सोने करण्यासाठी दुर्गा ताई सातत्याने प्रयत्न करत आहेत. कल्याण आश्रमकडून शिलाई मशीन मिळाल्यावर १५ महिलांनी स्वत:चा हाताला काम मिळतंय याचा सदुपयोग करून छोटे छोटे कामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आता निदान मशीनची ओळख झाली. थोडाफार प्रमाणात स्वतः काही करू लागल्या आहेत.
▪️रोजगाराच्या संधी▪️
वनात जे मध शिकेकाई, हळद त्यांना पॅकिंग करून विक्री प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे. भोरगिरी , मोरुशी, धामणगाव येथून त्यांनी हिरडा खरेदी केली असून त्यावर प्रक्रिया करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. बचत गटाच्या माध्यमातून कमी व्याजदराने महिलांना कर्ज देतात. महिला सक्षम होण्यासाठी पोषक आहाराबद्दलसुद्धा त्या सर्वत्र जनजागृती करतात.
▪️संवाद होतोय ▪️
महिलाच्या विविध समस्या, काही नाजूक प्रश्न, आरोग्याच्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करतांना आता महिला एकत्र आल्या कि त्यांच्यातील परकेपणाची भावना दूर होऊन आपलेपणा वाढला आणि महिला आपापसात बोलू लागल्या आहेत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दुर्गाबाई तळमळीने सांगत होत्या.
महिलांमधील लहानात लहान समस्येला संवाद होऊन प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. १०० महिला बचत गटात आहेत एकमेकींशी बोलणे स्वत:चे प्रश्न मांडणे यातून महिला बोलक्या झाल्या. ग्राम सभेत आता जाऊ लागल्या, प्रश्न , मागण्या सांगू लागल्या आहेत. घराच्या पलीकडचे जग आता त्यांना दिसू लागले आहे. आपण सर्वजणी एकाच रेषेत आहोत हा विश्वास एकमेकींना आलाय. त्यामुळे एका हाकेत सर्वजणी एकमेकींसाठी सर्व प्रसंगाला हजर होत आहेत. असेच कायम राहिलो तर सक्षम महिला होण्यासाठी घडी बसत आहे याचा विश्वास दुणावतो आहे.
जगाच्या पाठीवर सर्वत्र महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडतात पण आपल्या करिअर संसार याच्या पलीकडे काही आहे... ते म्हणजे आत्मिक आनंद आणि आत्मसमाधान. शेवटच्या श्वास घेताना स्वतःच्या जीवाला समाधानाची झोप लागायला मदत होईल असे काम केले तरच स्त्री जन्माचे सार्थक होईल असे मला वाटते.
▪️ग्रामीण भागात राहून बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या जनजाती समाजच्या दुर्गा ताई आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगून जातात, अष्टावधानी दुर्गाताई म्हणजे साक्षात दुर्गादेवी भेटल्याचा आनंद त्यांना भेटल्यावर होतो.
-अंजली तागडे
संपादक
विश्व संवाद केंद्र, पुणे