मुंबई : एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ‘संस्कृता बंध’ या विशेष उपक्रमांतर्गत भारतीय सीमारेषेवरील फिरोजपूर येथे तैनात असलेल्या वीर जवानांना ७ हजार राख्या पाठविण्यात आल्या.‘शैक्षणिक अभिमान-रक्षकांना सलाम’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विद्यापीठाच्या राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक सहभागाचे दर्शन झाले..
एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, लेखा व वित्त अधिकारी विकास देसाई, चर्चगेट कॅम्पस संचालक डॉ. संजय फड आणि दीर्घकालीन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, कर्मचाऱ्यांच्या संघटना, विभागीय प्रतिनिधी आणि विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या उपक्रमातून भारतीय सैनिकांच्या समर्पणाला मानवंदना देण्यासह विद्यापीठातील विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्यात आली.