‘समतोल’चे कार्य काहीसे दैवीशक्तीसारखे वाटते. शिवाय काम करणार्यांपैकी काही खास देवीसुद्धा हे विशेष काम करीत आहेत. ‘समतोल’च्या नवदुर्गांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. या लेखात आपण नऊ दुर्गांपैकी तीन दुर्गांचा कार्यपरिचय करून घेऊ.
जेव्हा ‘समतोल’ कार्याची सुरुवात झाली तेव्हा पहिली लक्ष्मी मुकादम या देवीचे आगमन झाले. या वीस वयाच्या तरुणीने हे ‘चॅलेंज’ स्वीकारले. स्टेशनवर दिवस रात्री उशिरापर्यंत फिरायचे. कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून काढावा, असे हे काम म्हणजे स्टेशनवर लोकांच्या गर्दीत हरवलेला, चुकलेला, घर सोडून आलेला किंवा आणलेला मुलगा किंवा मुलगी याचा शोध घेऊन त्याला आणून त्याची विचारपूस करून पुन्हा कुटुंबात जोडायचे, असे कठीण काम लक्ष्मी करीत आहे. विशेष म्हणजे, ती तेलुगू भाषिक असून हैदराबाद येथील आहे. वडिलांचे लहानपणी छत्र हरवलेले होते. मराठी शाळेत महानगरपालिकेमध्ये शालेय शिक्षण घेतले. वर्तकनगरमध्ये राहणारी ही मुलगी खूप बिनधास्त होती. शुद्ध मराठी, मुंबई हिंदी, स्वतः ची मातृभाषा तेलुगू, भोजपुरी, बिहारी आणि इतर अनेक भाषा स्पष्ट बोलते म्हणून ती अनेक मुलांशी सहजपणे संवाद साधून मुलांना आपलेसे करते. पाच हजारांपेक्षा जास्त मुलांशी तिने आपल्या शैलीत संवाद साधला.
वयात आल्यानंतर लग्नसुद्धा आपल्याच पसंतीने केले. मुंबई पुणे येथील ‘समतोल’चे कार्य तिने हिमतीने सांभाळले. पोलिसांना त्याच भाषेत उत्तर देत आपण सर्व बालकांचे रक्षक आहोत, भक्षक नाही, याची समज दिली. एकाच वेळी आठ मुलांना एकटीने उत्तर प्रदेश व बिहारमध्ये घेऊन जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबात जोडण्याचा तिचा विक्रम आजही ‘समतोल’मध्ये आणि संस्थांमध्ये कोणी तोडला नाही. सध्या हैदराबाद येथे आपला घर संसार सांभाळून ‘समतोल’चे कामसुद्धा करते. गेली 15 वर्षे ‘समतोल’च्या कार्यात तिचे योगदान खूप मोठे आहे व सातत्याने राहील ‘समतोल’ची नवदुर्गा आणखी एक नवदुर्गा आहे. आपण लक्ष्मी मुकादमबाबतची माहिती घेतली. पहिल्या देवीने ‘समतोल’चे फाऊंडेशन जणू खूप मजबूत केले होते. परंतु, फक्त मजबूत नव्हते, तर त्यामध्ये समता-ममता-बंधुता व एक प्रकारे लक्ष्य गाठायचे होते. परंतु, समतोल राखत हा प्रवास सुरु झाला होता. याच दरम्यान म्हणजे लता वानखेडे या दुसर्या देवीची साथ लाभली.
लता वानखेडे यांची खरंतर या प्रवासात स्वतः च एक अनुभवी व्यक्ती महत्त्व म्हणजे लता आहे. वयाच्या आठव्या वर्षी नागपूर येथून खेळताना तिला मुंबईमध्ये उचलून आणले. एका दृष्टीने पळवूनच आणले होते. सुरुवातीला लता सिग्नलवर फुगे विकण्याचे काम करीत होती. लहानपणापासून जीवनातील कठीण अनुभव दैनंदिन घेत होतीच. लहानपणापासून पैसे हातात आल्यानंतर अनेक वेदना सहन करण्यासाठी नशेची सवय आपोआपच लागली. ती पुढे इतकी वाढली की, लता नशेसाठी चोरी व वाट्टेल त्या गोष्टी करायला लागली. या दरम्यान वयात आल्याने खूप त्रास देणारे तिला अनेक जण भेटले. त्यामुळे व्यावहारिक जीवन जगताना अनुभवात तिची पीएच.डी झाली आहे.
लताला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सोशल मीडियावर मुलाखती घेतल्या आहेत. चॅनेलवर बोलावले आहे. त्यामुळे लता आता चांगली बोलते. खरंतर नशा करणार्या मुलांना बघितले की, लताला लहानपण आठवते. तिची नशा एका संस्थेमध्ये दाखल झाल्यावर सुटली. नंतर तिने याच मुलांना नशेपासून वाचवण्यासाठी आयुष्य खर्ची करायचे, असे ठरवले आहे. एक वेळेस ‘सीआयडी’च्या नजरेतून मुलगा स्टेशनवर सुटेल, पण लताच्या नजरेतून मुलगा सुटणार नाही. लता बाहेर राहून शाळा जरी शिकली नाही, तरी ती लिहिते आणि वाचतेसुद्धा. ‘समतोल’मध्ये रिपोर्ट लिहिल्याशिवाय पगार मिळत नाही. त्यामुळे पगार पाहिजे असेल, तर लिहायला शिकले पाहिजे, असे तिने जिद्द ठेवून ती शिकली. त्यामुळे ती एकलव्यसुद्धा आहे.
‘समतोल’मध्ये काम करण्यासाठी तिची अनेक वेळा आम्ही परीक्षा घेतल्या. परंतु, ती त्यामध्ये एक पाऊल पुढे करून दाखवून दिले. साधारण एक-दोन नव्हे तब्बल सहा-सात भाषा लता सहजपणे बोलते. ‘अॅक्टिंग’ करताना हुबेहूब करून अनेक मुलांना आपलेसे करून घेते. साफसफाई हा तिचा आवडता विषय आहे. कधी कधी आजारी पडते. कारण, लहानपणी शरीरात आवश्यक असणारे जीवनसत्त्वे मिळाली नाही. परंतु, लगेचच उठून कामाला लागते. शरीराचे लाड करायचे नाही, असे नेहमीच सांगते. मनुष्य जन्म हा दुसर्या साठीच आहे, असे आवर्जून भाषण करताना सांगते. ‘समतोल’ची सिंधुताई सपकाळ अशी वेगळी ओळख तिने ‘समतोल’मध्ये निर्माण केली आहे. किमान पाच हजारांपेक्षा जास्त मुलांना तिने घर पुन्हा मिळवून दिले आहे.
नैसर्गिक शक्ती असणार्या या देवीची समाजाला खूप गरज आहे, असे वाटते. ‘ट्राफिकिंग’ करून आलेल्या अनेक मुलींना लताने पुन्हा नवजीवन दिले आहे. पोलिसांनी खरंतर तिला गुप्तहेर म्हणून नोकरी दिली असती, तर लताने इतिहास घडवून आणला असता.
‘समतोल’मध्ये आल्यावर आपल्या जीवनात बदल करून संसार सुखाचा करीत आहे. संपूर्ण कुटुंब सांभाळून एक आदर्श निर्माण केला आहे. कधी कधी जुन्या आठवणी जाग्या झाल्या, तर हक्काने माझ्या जवळ रडते. ‘समतोल’ कार्य करीत आज 11 वर्षे पूर्ण झाली आहे. अशी ही लता ‘समतोल फाऊंडेशन’बदल कोणी वाईट बोलले, तर त्यावर वाघिणीसारखी तुटून पडते. खूप मनापासून समाजात काम करणार्या या देवींचा सत्कार सन्मान हा नेहमीच झाला पाहिजे, यासाठी ती नेहमीच दैवीशक्तीची उपासना करते आणि म्हणते अजूनही खूप अंधार पडला आहे. तू पुन्हा ये.
समतोल नवदुर्गा’मध्ये खास आणि विशेष रंग, रूप धारण करून काम करीत असलेली देवी म्हणजे सपना श्रीवास्तव होय. नावाप्रमाणेच एक स्वप्न उराशी बाळगून या देवीचा प्रवास सुरु झाला होता. मध्य प्रदेश राज्यामधील असल्यामुळे मराठी भाषेचा काही संबंध नव्हता. खरंतर तेथील परंपरा व रितीरिवाजप्रमाणे सपनाचे लग्न लवकरच झाले होते. आईवडिलांनी आपली जबाबदारी पार पाडली होती. परंतु, सपना काही जुन्या परंपरामध्ये वाढणारी नव्हती. त्यामध्ये नवरा सांगेन त्याप्रमाणे वागेल, असे तर तिच्या स्वभावातच नव्हते. घरातील काही कारणाने सपना पुन्हा आईवडिलांकडे आली. घरात भाऊ-बहीण सर्व परिवार होता. अनेक गोष्टी समजल्यावर सपनाने पुन्हा सासरी जायचे नाही, असे ठरवले. दिसायला सुंदर व टापटीप राहणारी सपना वयात आल्यावर अजूनच छान दिसत होती. त्यात तिला दिवस सुद्धा गेले होते. त्यामुळे ती अधिकच काळजीत होती. परंतु, आपल्याला नवीन काहीतरी करायचे आहे व सर्वांना करून दाखवायचे आहे, अशी तिच्या मनात जिद्द होती. तिने आपल्या मोठ्या बहिणीला विनंती केली आणि मुंबईमध्ये यायचे ठरवले.
खरंतर सपनाची मोठी बहीण मुंबईमध्ये होती, पण सपनाची परिस्थिती लक्षात घेऊन तिने अगोदर नकार दिला. परंतु, सपनाच्या भावोजींनी होकार देताच सपनासाठी राहण्याची व्यवस्था होऊन गेली तोपर्यंत सपनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. स्वतःचे बाळ, घरातील अडचणी, बाहेरील काम अशी तारेवरची कसरत सपना करीत होती. सपनासाठी मुंबई नवीन होती. परंतु, सपनाने मुंबईतच आपली एक वेगळी ओळख तयार व्हावी म्हणून प्रयत्न करीत होती. एक जाहिरात बघून नायर हॉस्पिटलमध्ये मुलांना मदत करण्यासाठी कार्यकर्ते पाहिजे, अशी माहिती दिला मिळाली आणि मुलांच्या हेल्पलाईन 1098 मध्ये तिचे काम सुरू झाले. रेल्वेमधील रोजचा प्रवास, लोकांच्या बरोबर चर्चा याचा आता चांगला अभ्यास सपनाने केला होता. कामाच्या वेळा व इतर कारणांमुळे सपनाने आता बहिणीकडे राहायचे नाही, असे ठरवले. स्वतः भाड्याने खोली घेऊन मुलगी व ती राहू लागली. छोट्या लहान मुलीला घरात एकटे सोडून काम करावे लागत होते, याची तिला खूप खंत वाटत होती. परंतु, मजबुरी होती. ‘समतोल’बद्दल सपनाला तिच्या मैत्रिणी कडून समजले आणि ‘समतोल’च्या या दैवीकार्यात या देवीचे आगमन झाले.
‘समतोल’चे काम तर अजूनच कठीण होते. रोज दिवस-रात्री स्टेशनवर फिरायला लागायचे. तेव्हा मुले सापडायची. त्यामध्ये तिला लक्ष्मी आणि लता याची साथ होती. त्या एकदम कडक होत्या. सपनाला आता खरी परीक्षा द्यावी लागणार होती. परंतु, नावातच स्वप्न असलेली सपना मागे वळून पाहणार्यांपैकी नव्हती. तिने आपल्या पद्धतीने काम कररण्यास सुरुवात केली. आता तीन देवी एकत्र येऊन या समस्येवर मात करीत होत्या. एकही मुलगा आता स्टेशनवर फसणार नाही, याची काळजी या घेत होत्या. खूप मुले संपर्कात येत होती. पोलीस यंत्रणा कंटाळून मुलांना आणू नका, असे म्हणायला लागली होती. परंतु पोलिसांना प्रेमाने भावनिक समज देत या देवी अनेक मुलांचे जे भवितव्य अंधारात जाणार होते, ते वाचवत होत्या. सपनासाठी हा विषय खूप परिणामकारक ठरला. याचदरम्यान ‘केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव’ यांनी आपल्या कार्याची दखल घेत पुरस्कार जाहीर केला. दोन्ही बाजू सावरत म्हणजे एकतर आनंद आणि तेवढीच वाढलेली जबाबदारी ‘समतोल’ने स्वीकारली आणि आम्ही पुरस्कार घेतला. परंतु, भुसावळ स्थानकावर कामसुद्धा सुरू झाले पाहिजे, असा निश्चित केला. यासाठी सहकार्य म्हणून ‘केशवस्मृती’ सोबत होती, पण काम कोण करणार? हे महत्त्वाचे होते. आता खरी संधी आहे, हे ओळखून सपनाने हे ‘चॅलेंज’ स्वीकारले.
सर्वेक्षण सुरु झाले. महिन्याला 70/80 मुलांना मदत होईल, एवढी मोठी संख्या जंक्शन स्टेशन होती. पोलिसांनी सहकार्य करण्याचे वचन दिले. सर्व काही जुळून आल्यानंतर 2015 मध्ये ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ संचालित ‘समतोल’ प्रकल्प भुसावळ स्थानकावर सुरू झाला. दैवीशक्ती असल्याशिवाय एक महिला दुसर्या नवीन जिल्ह्यात नवीन स्थानकावर लोकांच्या गर्दीत काम कसे करू शकेल? म्हणून या देवींचा जन्मच मुळात अशा कामासाठी झालेला असावा, असे मला नेहमी वाटते. स्वतःच्या मुलींची काळजी, नवीन जळगाव शहर याचा समतोल साधला पाहिजे, हे सपनाने ओळखले होते. एक वर्षे दुसर्याच्या हवाली मुलीला सोपवले, पण, जळगावचे काम सोडले नाही. केवढी ही हिंमत!
हळूहळू सपनाने स्टेशनवर आपली नवीन ओळख निर्माण केली. जळगाव जिल्ह्यात ‘समतोल’ प्रकल्प म्हणून ओळख तयार झाली. हळूहळू पडद्याआड मदत करणारे अनेक बालप्रेमी लोक सहकार्य करु लागले.
‘समतोल’ विश्वस्तांची यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका होती. परंतु, कधी पुढे आली नाही. ‘समतोल फाऊंडेशन’चे सध्याचे अध्यक्ष संजय केळकर, उद्योजक एस. हरीहरन, किशोर मोघे मी स्वतः तर होतोच, पण ही सर्व मोठी मंडळी लता, लक्ष्मी ,सपना यांना सहकार्य करीत होती. म्हणून तर सर्वांची हिम्मत वाढत होती. आज जळगावमध्ये ‘समतोल’ प्रकल्पाला सात वर्षे पूर्ण झाली. सातत्याने सपनाने काम करीत फक्त भुसावळ स्थानकावर नाही, तर जळगावमध्येसुद्धा काम मोठ्या प्रमाणात उभे केले. तिच्या स्वप्नात असलेले हे कार्य खूप काही सांगून जाते. संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच रेल्वे स्थानकावर उभे राहिलेले बाल साहाय्यता केंद्र हे सपनाने उभे केलेले बूथ आहे. अशा प्रकारे अनेक स्थानकावरबाल साहाय्यता केंद्र उभे करण्यासाठी तिचा प्रयत्न सुरू आहे. जळगाव-भुसावळमध्ये अनेक समस्यांना तोंड देत सपना उभी राहिली आहे. स्वतःचे एक छान घर तिने खरेदी केले आहे.
तिच्याबरोबर तिला साथ देणारी तिची मुलगी बाली आता महाविद्यालयामध्ये शिकत आहे, तरीही कधी-कधी अनेक समस्यांना तोंड देणारी ही लोक थकत नाही. जिद्दीने जगत असतात. म्हणून देवही संकटे देत परीक्षा घेत असतो. त्यामुळे कधी मानसिक, तर कधी शारीरिक त्रास होत असतो.‘समतोल’ प्रकल्प सुरू झाल्यानंतर किमान तीन हजारांपेक्षा जास्त मुलांना कुटुंबाशी जोडण्याचे कार्य सपनाच्या हातून घडले आहे. अशा या देवीबरोबर चर्चा करताना कितीही संकटे जीवनात आली, तरीही आम्ही सामाजिक कार्य करीत राहू, बदल घडवून आणू, बालप्रेमी समाज बनण्यासाठी झटत राहू म्हणून आम्ही देवीला साकडे घालत असतो आणि सांगतो अजून खूप काम करायची गरज आहे पण या साठी ताकद शक्ती कमी पडू देऊ नको. देवी माता तू सोबतच राहा. चल सोबतीला...