नानांनी ‘त्यांंना’ही विचारले असते का?

    13-Oct-2022   
Total Views |

 interview Of shinde and fadanvis 
 
 
 
परवा एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रोखठोक मुलाखत घेतली. रोखठोक याचसाठी की, नानांनी आपल्या नैसर्गिक शैलीत शिंदे आणि फडणवीसांवर राजकारणापासून ते शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपर्यंत प्रश्नांचे थेट बाण सोडले. कुठलेही आढेवेढे न घेता आणि अगदी थेटपणे नानांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पण, नानांच्या एकाही प्रश्नाला तुसडेपणाने प्रत्युत्तर न देता, टोमण्यांनी त्यांना अपमानित न करता, फडणवीस-शिंदे यांनी शांतपणे, आपापल्या शैलीत नानांच्या सगळ्या प्रश्नांची अगदी मनमोकळपणाने उत्तर दिली.
 
 
खरंतर नाना पाटेकर हे तिखट प्रश्न मुळी समोर फडणवीस आणि शिंदे असल्यामुळेच विचारू शकले, हे ध्यानात घ्यायला हवे. कारण, फडणवीस आणि शिंदेंच्या स्वभावाशी नाना सुपरिचित आहेत. म्हणूनच नानाही मुलाखतीत अगदी वाहवत गेले आणि “तुमच्याकडून अपेक्षा नाही, तर खात्री आहे,” असे म्हणत फडणवीस-शिंदेंवर त्यांनी तितकाच विश्वासही दाखवला. फडणवीस-शिंदे सरकारला सत्तेत येऊन नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले. पण, या 100 दिवसांतही आपण काय केले आणि भविष्यात काय करणार आहोत, याचा आराखडाच शिंदे आणि फडणवीसांनी आपल्या उत्तरांतून अवघ्या महाराष्ट्रासमोर सादर केला. त्यामुळे ज्या सहजतेने नाना या दोघांना प्रश्न विचारत होते, तसे चित्र गेल्या अडीच वर्षांत एकदा तरी दिसून आले का? तेव्हा ‘सेट’ केलेल्या मुलाखती घेणारे राऊत आणि ठाकरेच काय ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले.
 
 
पण, तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्तपणे असे मुलाखतीचे किती धाडस दाखवले? म्हणूनच फडणवीसांंवर ‘प्रती मुख्यमंत्री’ असा आरोप करणार्‍यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारतर्फे किल्ला कोण लढवित होते, त्याचीही जरी माहिती घ्यावी की, उत्तर आपसुकच समोर येईल. त्यामुळे मुद्दा हाच की, समोर फडणवीस-शिंदेेंसारखी पारदर्शक मंडळी असल्यामुळेच नानांनी ‘आपले माणूस’ मानून अगदी हक्काने आपल्या प्रश्नांची धार टोकदार ठेवली. अशाच स्वरुपाचे टोकदार प्रश्न नानांनी उद्धव ठाकरे आणि अजितदादांना जाहीरपणे विचारले असते का? शेतकरी आत्महत्या, सिंचन, समान नागरी कायदा, कुटुंब नियोजन यांसारख्या नानांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी किती गंभीरतेने उत्तरं दिली असती? मग तेव्हाही खिंड अजितदादांनाच लढवावी लागली असती, नाही का?
 
 
महाराष्ट्रहितैषी फडणवीस-शिंदे
 
 
 
या मुलाखती दरम्यान नानांच्या प्रत्येक प्रश्नांतून त्यांची महाराष्ट्राप्रती, येथील नागरिकांप्रतीची तळमळ अगदी सहजपणे जाणवत होती. शिवसेना विभागली गेल्यामुळे घरापासून ते गावापर्यंत दोन गट पडले, त्याचे काय करायचे, असा एक भावनिक प्रश्नही यावेळी नानांनी उपस्थित केला. त्यावरही शिंदे यांनी हा निर्णय घेणे त्यांच्यासाठी प्रत्यक्षात मानसिक आणि राजकीयदृष्ट्याही किती आव्हानात्मक होते, तेही स्पष्ट केले. एवढेच नाही, तर ‘मी आमदारांना नव्हे, तर शिवसेनेचे आमदाराच मला सोबत घेऊन बाहेर पडले,’ असे सांगत शिंदे यांनी ठाकरेंविरोधातील नाराजी त्यांच्या एकट्याची नव्हे, तर बहुतांश आमदारांची असल्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे नानांच्या सगळ्या गुगली टाकणार्‍या प्रश्नांवर शिंदे आणि फडणवीसांनी षट्कारच ठोकले.
 
 
 
फडणवीस आणि शिंदे यांच्या दरम्यानचं जबदरस्त ‘ट्युनिंग’ही या मुलाखतीत प्रकर्षाने दिसून आलं. नानांनीही शिंदेंना म्हणूनच ‘गुण नाही पण वाण लागला’ अशी कोपरखळीही लगावली. नानांचे हे निरीक्षणही अगदी अचूक. कारण, शिंदे आणि फडणवीस यांच्या जोडगोळीने अगदी सत्तास्थापनेपासून ते आजवर ‘हम साथ साथ हैं’चा पावलोपावली परिचय करून दिला. मुख्यमंत्री राहिलेल्या, अनुभवाने उजवे असलेल्या फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आणि मुख्यमंत्रिपदाच्या गरिमेचाही त्यांनी वेळोवेळी सन्मानच केला. त्यामुळे राज्यशकट हाकण्यासाठी प्रमुख पदांवर असलेल्या दोन नेत्यांची केवळ मने जुळणेच पुरेसे नसून त्यांच्यातील उत्तम समन्वय, संवाद, संपर्कही महत्त्वाचा आणि तो फडणवीस-शिंदेंच्या बाबतीत प्रकर्षाने दिसूनही येतो, हे विशेष.
 
 
 
एकंदरच नानांनी घेतलेली ही मुलाखत स्वरुपातील चर्चा, फडणवीस आणि शिंदेंच्या उत्तम ‘केमिस्ट्री’ बरोबरच राज्याचा कारभार योग्य व्यक्तींच्या हाती पुन्हा आला आहे, याचा पुनश्च दिलासा देणारी ठरली. मागील अडीच वर्षांतील राजकीय, सांस्कृतिक मरगळ झटकून फडणवीस-शिंदे सरकार महाराष्ट्रहितासाठी जोरदार कामाला लागलेे आहे. कोर्टकचेर्‍या, विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप हे तर राजकारणात न संपणारे. पण, त्या सगळ्याचा परिणाम कुठेही राज्यकारभारावर होऊ न देता, जनतेच्या सर्व वर्गांतील समस्या, प्रकल्प, विकासकामे मार्गी लावण्याचे शिवधनुष्य या दोघांनी सक्षमपणे पेलले आहे. त्यात या दोघांना यश येईलच, हेच महाराष्ट्राचे शुभ वर्तमान!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची