ठाणेकरांच्या हक्काची टीएमटी बंद करण्याचा डाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2021
Total Views |

TMT _1  H x W:



ठाणे : ठाणे परिवहन सेवेने मे. सिटी लाईफ लाईन प्रा. लि. या कंपनीला मुंब्रा- कौसा भागात बसगाड्या चालविण्याचा ठेका दिला आहे.मात्र, या मार्गावर असलेल्या बसथांब्यांवर संबधित ठेकेदाराच्या बसगाड्या जाणीवपूर्वक थांबविल्या जात नाहीत. बस न थांबविल्याने प्रवाशांची संख्या कमी होत आहे, असे दाखवून या मार्गावरील बससेवा बंद करण्याचा घाट मे. सिटी लाईफ लाईन प्रा. लि. या कंपनीचे प्रवर्तक अनिल शर्मा यांनी आखला आहे.

परिवहन उपव्यवस्थापकांनी बोलावलेल्या बैठकीलाही शर्मा हे उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे त्यांचा ठेका रद्द करावा, अशी मागणी परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी केली आहे. मुंब्रा-कौसा भागातील अनेक नागरिक हे ठाणे शहरात नोकरी अथवा इतर कामांसाठी जा- ये करत असतात. या नागरिकांना टीएमटीची बससेवा हा चांगला पर्याय आहे. मात्र, या मार्गावर धावणार्‍या मे. सिटी लाईफ लाईन प्रा. लि. या कंपनीच्या बसगाड्या अनेक बसथांब्यांवर थांबविल्याच जात नसल्याचे शमीम खान यांच्या निदर्शनास आले होते.

त्यानंतर त्यांनी परिवहन व्यवस्थापकांना पत्र लिहून संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने परिवहन उपव्यवस्थापक शशिकांत धात्रक यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मे. सिटी लाईफ लाईन प्रा. लि. चे प्रवर्तक अनिल शर्मा यांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, शर्मा यांनी आपल्या प्रतिनिधीला पाठवून दिले. त्यामुळे कार्यवाही करण्यात अडचण आली. यामुळे संतापलेल्या शमीम खान यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. संबधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी केली. त्यावर अधिकार्‍यांनी संबधितावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, “अनिल शर्मा हे बैठकीला येत नाहीत. याचा अर्थ ते परिवहन समितीला आणि अधिकार्‍यांना गंभीरपणे घेत नाहीत. या ठेकेदाराने मुंब्रा येथून उत्पन्न कमी येत असल्याचे दाखवून देण्यासाठीच रिकाम्या बसगाड्या चालविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कागदोपत्री बसगाड्यांमधून उत्पन्न मिळत नसल्याने या मार्गावरील सेवा बंद करण्याचा निर्णय परिवहन खाते घेईल, असा कुटील डाव अनिल शर्मा या ठेकेदाराने आखला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी,” अशी मागणी खान यांनी केली आहे.





@@AUTHORINFO_V1@@