सापांची माहिती आता एका क्लिकवर; 'हे' अॅप करणार सांपांविषयीचे अज्ञान दूर

    02-Apr-2021   
Total Views | 550
snake _1  H x W




मुंबई (विशेष प्रतिनिधी):
भारतातील सापांविषयीचे समज-गैरसमज दूर करणारे आणि एका क्लिकवर त्यांच्याविषयीची इत्थंभूत माहिती देणारे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ‘स्नेकहब’ नावाचे हे अ‍ॅप ‘डाऊनलोड’ करून आपल्याला सापांच्या 183 प्रजातींची माहिती, त्यांच्याभोवती असलेल्या अंधश्रद्धा, सर्पदंश आणि उपचार याची माहिती मिळवता येणार आहे.
 
 
 
 
आजही भारतात दरवर्षी हजारो व्यक्तींचा सर्पदंशामुळे आणि त्यानंतर न मिळालेल्या उपचारामुळे मृत्यू होतो. मात्र, आता सापांविषयी जनजागृती करण्यासाठी एक ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात आले आहे. ‘स्नेकहब’ नावाचे हे अ‍ॅप मराठी भाषेत उपलब्ध असून, सापांचे शरीरशास्त्र, विविध राज्यांत असणारे सापांविषयीचे समज-गैरसमज, सर्पदंश आणि त्यावरील उपचार याची माहिती देणारे हे एकमेव भारतीय अ‍ॅप आहे. यामध्ये महाराष्ट्रात आढळणार्‍या 72 सर्प प्रजातींची माहिती, त्यांची शरीरवैशिष्ट्ये आणि श्रद्धा-अंधश्रद्धा विस्तृतपणे मांडण्यात आली आहे. ‘स्नेकहब’ अ‍ॅप वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे. त्याची रचना करताना शास्त्रीय सिद्धान्त काटेकोरपणे पाळले गेले आहेत. सापांचा नैसर्गिक इतिहास, शरीररचना, विस्तार, रंजक माहिती अशी अनेक सदरे त्यामध्ये दिलेली आहेत. अगदी आठ वर्षांच्या मुलापासून ते सर्पसंशोधक, शास्त्रज्ञ, शिक्षक इ. सर्वांना कळेल, अशा भाषेत ही माहिती अ‍ॅपमध्ये शब्दांकित करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
सर्प प्रजाती या शरीर वैशिष्ट्यांपासून, खवल्यांच्या रचनेवरून, भौगोलिक विस्तारावरून कशा ओळखाव्यात याची सामान्य आणि शास्त्रीय माहिती ‘स्नेकहब’मध्ये पुरवली आहे. ती उलगडण्यासाठी रेखांकने आणि छायाचित्रेही दिली आहेत. ‘स्नेकहब’मध्ये सापांविषयी विचारले गेलेले नेहमीचे प्रश्न, अंधश्रद्धा, प्रत्येक जिल्ह्यातील सर्पमित्रांचे दूरध्वनी क्रमांक आणि सर्पदंशावर उपचार करणार्‍या रुग्णालयांचे दूरध्वनी क्रमांकही दिले आहेत. ही माहिती सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. ‘स्नेकहब’ची निर्मिती डॉ. दिलीपकुमार आणि विवेक शर्मा यांनी केरळ आणि महाराष्ट्रातील सहकार्‍यांच्या साहाय्याने केली आहे. अमोल लोपेझ हे तांत्रिक सल्लागार असून, त्यांनी अ‍ॅपची तांत्रिक रचना आणि निर्मिती केली आहे. प्राची तानवडे यांनी मराठी भाषांतर केले असून, त्यास साहाय्य लक्ष्मीकांत देशपांडे यांनी पुरवले आहे. हे अ‍ॅप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून ‘डाऊनलोड’ करता येईल.
 
 
 
 
साप म्हणजे सर्पदंश आणि तत्काळ मृत्यू, या आपल्या मनावर अनादिकालापासून बिंबविलेल्या गैरसमजुतीमुळे या निष्पाप प्राण्यावर अन्याय होत आलेला आहे. सापांविषयी सर्वसामान्यांना वाटणारी ही भीती आणखी वाढविण्यासाठी चित्रपट, कादंबर्‍या आणि मालिकांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे. ही भीती दूर करायची असेल तर त्यासाठी योग्य माहितीची गरज आहे. ‘स्नेकहब’ अ‍ॅप सापांविषयी असणारे गैरसमज दूर करण्यास नक्कीच मदत करेल, यात शंका नाही - डॉ. वरद गिरी, ज्येष्ठ सर्प संशोधक

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121