डीजेवाला बाबू करोडपती!

    दिनांक  15-Sep-2020 20:05:23
|
aravind kumar _1 &nb

 
 
 
शून्यातून आपले उद्योगविश्व उभारत आज कोट्यधीश असलेल्या हरियाणातील उद्योगपती अरविंद कुमार यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
 
 
 
जगात आजघडीला अनेक प्रसिद्ध उद्योजक आहेत. आपल्या व्यापाराचा पसारा सातासमुद्रापार नेत अनेक उद्योजकांनी संपूर्ण विश्वात आपल्या नावाची मोहर उमटवली आहे. जगातील प्रत्येक देशात आपल्या व्यापाराचा विस्तार करत उद्योजकांनी संपूर्ण विक्ष्वात नावलौकिक मिळविला आहे. व्यापाराचा झपाट्याने विस्तार करत उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात धनलाभ कमावला आणि ते जगप्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
 
 
जगातील श्रीमंत व्यक्तींची भली मोठी यादीच दरवर्षी जाहीर करण्यात येते. या यादीत अनेकांची नावे असतात. यांपैकी सर्वांचीच नावे लक्षात राहतीलच असे नाही. मात्र, काही उद्योजक असेही आहेत, जे स्वतःच्या व्यापाराचा विस्तार तर यशस्वीरीत्या करतातच, परंतु आपल्या जगण्यातून समाजापुढेही एक वेगळा आदर्श निर्माण करतात. अगदी शून्यातून आपले नवे विश्व तयार करत आपल्यासोबतच अनेकांचे जीवन ते सत्कारणी लावतात. म्हणूनच, समाजात त्यांना नेहमी एक वेगळे आदराचे स्थान दिले जाते. समाजापुढे त्यांचे आदर्शही ठेवले जातात. यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात त्यांचे गोडवे गायले जातात. हरियाणातील अरविंद कुमार हे त्यापैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
अरविंद कुमार हे हरियाणातील तरुण उद्योजकांपैकी एक यशस्वी मोठे उद्योजक म्हणून ओळखले जातात. कोट्यवधींचे मालक असणारे अरविंद कुमार यांची सर्वत्र ख्याती असली तरी एकेकाळी मात्र ते दिवसाला ५० रुपयांच्या मजुरीवर काम करायचे. रोजंदारीवर काम करणार्‍या अरविंद कुमार यांनी अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे जीवन तर घडवलेच. मात्र, एक यशस्वी उद्योजक बनत जगापुढे एक वेगळा आदर्शही निर्माण केला.
 
 
अरविंद कुमार यांचा जन्म हरियाणातील रोहतक येथे झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले अरविंद मोठे होऊन कोट्यधीश होतील, असा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र, अरविंद यांनी अपार कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही करून दाखवले. अरविंद यांचे वडील ठेकेदार होते. अरविंद लहानपणी शाळेत जात असताना घरातील परिस्थिती तशी साधारण होती. मात्र, अरविंद यांचे मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांना ठेकेदारीमध्ये नुकसान सोसावे लागले.
 
 
नुकसानीतून सावरण्यासाठी कुटुंबीयांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, प्रयत्नांना काही यश येता दिसेना. अखेरीस घरातील सामान विकण्याची वेळ या कुटुंबीयांवर ओढवली. मात्र, तरीही नुकसानभरपाई होत नसल्याने अखेरीस घर विकायला लागले. अरविंद यांचे मॅट्रिकचे शिक्षण कसे-बसे पूर्ण झाले. मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी म्हणून त्यांनी पुढील शिक्षणाऐवजी काम करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या १६व्या वर्षी आपली दहावी पूर्ण करून ते कामासाठी बाहेर पडले. यावेळी पुढील शिक्षणाचा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मात्र, घरातील नाजूक परिस्थितीमुळे आपल्या शिक्षणाऐवजी कुटुंबीयांच्या मदतीसाठी ते कामानिमित्त घराबाहेर पडले. आपल्या एका मित्राच्याच ‘डीजे’ व्यवसायात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
 
 
 
५० रुपये रोजंदारीवर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. आपल्या आजूबाजूला असलेल्या वादक आणि संगीतकारांशी त्यांनी यानंतर संपर्क केला. त्यांच्यासोबत मैत्री करत विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होऊ लागले. गायक आणि संगीतकार, वादक मंडळींसोबत त्यांचे उठणे-बसणे सुरू झाले. त्याचे मित्र डीजे वाजवून चांगले पैसे मिळवत होते. हे पाहून अरविंद यांनीही डीजेचे काम शिकून घेतले. हळूहळू त्यांनाही प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली. पार्टी, लग्नसोहळ्यांसाठी डीजे वाजवण्यासाठी अरविंद यांना संपर्क करू लागले. यातून त्यांना बक्कळ पैसा मिळू लागला. यामुळे घरची परिस्थितीही सुधारण्यास मदत झाली.
 
 
 
२०१३ पर्यंत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यानंतर अरविंद यांनी या धंद्यासोबतच जोडधंदा म्हणून अ‍ॅल्युमिनियमचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी छोटेखानी हा व्यवसाय उभारत लहान-मोठ्या कंपन्यांसोबत व्यवहार सुरू केले. आपला व्यापार-विस्तार वाढविण्यासाठी त्यांनी मोठमोठ्या व्यापारी लोकांशी चर्चा सुरू केल्या. व्यापाराच्या विस्तारासाठी त्यांनी दहा लाख रुपये गुंतवले. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ क्षेत्रातील लोकांशी ओळखी असल्यामुळे या व्यवसायाचा अरविंद यांना फायदा झाला. मोठमोठ्या कार्यक्रमासाठी ते सामान पुरवू लागले आणि येथूनच ते सर्वत्र उद्योजक म्हणून प्रकाशझोतात आले.
 
 
 
अरविंद यांच्या कंपनीचे नाव ‘डेविल ट्रेस’ आहे. दरवर्षी जवळपास १५ कोटी रुपयांचा व्यापार केला जातो. २०१९ मध्ये ‘डेविल’ कंपनीला ‘सर्वश्रेष्ठ ट्रेसिंग’ कंपनीचा पुरस्कार मिळाला होता. एकेकाळी ५० रुपयांच्या रोजंदारीवर काम करणारे अरविंद आता कोट्यवधींचे उद्योजक म्हणून ओळखले जात असले तरी आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. गरिबीची जाणीव त्यांना आजही असून अनेकांचे जीवन घडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. शून्यातून आपले नवे विश्व साकारणार्‍या या उद्योजकाला ‘दै. मुंबई तरुण भारत’चा सलाम...!


- रामचंद्र नाईक 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.