आर्यप्रश्न आणि भाषाशास्त्र : एक व्यर्थ उठाठेव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2020
Total Views |

arya_1  H x W:



मागच्या चार लेखांमध्ये आपण "Linguistics' अर्थात भाषाशास्त्र या ज्ञानशाखेची ओळख करून घेतली. एक ज्ञानशाखा म्हणून हे शास्त्र जरी आपल्या जागी ठीक असले, तरी इतिहासाच्या पुनर्रचनेचे साधन म्हणून ते कितपत उपयुक्त आहे, याची शंकाच वाटत राहते. तसे पाहिले तर अशा इतरही अनेक ज्ञानशाखा इतिहासाच्या पुनर्रचनेला उपयुक्त ठरल्या आहेत. पण खास करून भाषाशास्त्राच्या बाबतीत मात्र याची शाश्वती निर्मळ मनाच्या अभ्यासकांना वाटत नाही. त्याला कारण युरोपीय भाषाशास्त्रज्ञ (Philologists) त्यातून जे निष्कर्ष काढतात, त्याच्यात आहे. पुरावे व तर्क यांच्याशी दूरदूरचा संबंध नसलेले आणि अगदी बळेबळेच ताणून इतिहासाशी जोडलेले असे निष्कर्ष पाहिले, की त्यातून दुसरे काय मनात येणार?



कपोलकल्पित पुरावे
मागच्या एका लेखात आपण युरोपीय विद्वानांनी उभे केलेले कल्पनांचे मनोरे पाहिले. त्यांच्या भाषाशास्त्रीय अभ्यासानुसार त्यांनी युरोप आणि आशियातल्या बहुसंख्य भाषांना ‘इंडो-युरोपीय’ नावाच्या एका विशाल कुटुंबात ठेवले. या झाल्या एकमेकींच्या ‘भाषा भगिनी’. त्यातून त्यांची आई झाली 'Proto-Indo-European (PIE)' Language अर्थात ‘इंडो-युरोपीय-पूर्व’ भाषा. तिचे ‘माहेरघर’ (Homeland of PIE Language) ठरले 'Steppes' अर्थात मध्य आशियातला गवताळ मैदानी प्रदेश. तिथे राहणारे आणि ती भाषा बोलणारे असे जे लोक होते, त्यांना मात्र ‘इंडो-युरोपीय-पूर्व’ लोक किंवा ‘मध्य आशियन’ लोक अशी भाषिक अथवा प्रादेशिक नावे न देता त्यांनी त्यासाठी शब्द वापरला ‘आर्य’ लोक! आता हे सगळे फक्त अंदाजच असल्यामुळे त्यांच्यासाठी कसलेही पुरावे देण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही. एकूणच अशा प्रकारे जगातल्या बहुसंख्य भाषांचा तुलनात्मक अभ्यास (Comparative Linguistics), भाषांचा समकालिक अभ्यास (Synchronic Linguistics), एखाद्या लोकसमूहाच्या भाषांचा उच्चारण आणि शब्दातल्या फरकांच्या आधारे वस्तुनिष्ठ अभ्यास (Descriptive Linguistics), असा विविध अंगांनी अभ्यास करूनही आर्य स्थलांतराच्या सिद्धांताला दुजोरा मिळत नाही तो नाहीच!


भाषाशास्त्रीय अभ्यासातले दोष

विविध भाषांमध्ये जे समान शब्द दिसतात, ते शब्दांची देवाणघेवाण झाल्यामुळे नैसर्गिकपणे घडते. विविध कालखंडात विविध देशांच्या लोकांमध्ये व्यापार, शिक्षण, विवाह, लढाया अशा कारणांनी जे सामाजिक अभिसरण होते, त्याचा तो स्वाभाविक परिणाम असतो. ही देवाणघेवाण फक्त प्राचीन काळातच नव्हे, तर पुढे मध्ययुगीन आणि नंतर आधुनिक काळातही घडलेली दिसून आलेली आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करून भाषांची एक काल्पनिक जननी मानणे, हे वैचारिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. भाषांचे पुढचे वर्गीकरण, ’PIE' भाषा बोलणार्‍या लोकांचे मूलस्थान, त्यातून आर्यांच्या स्थलांतराची संकल्पना, या सगळ्या एकातून एक अशा जन्माला आलेल्या कपोलकल्पित कहाण्याच ठरतात. जगभरातल्या बहुसंख्य भाषांचे असे विविध कसोट्यांवर खरे ठरणारे वर्गीकरण करायचे असेल, तर त्यासाठी या सगळ्या भाषांवर प्रभुत्व असणारा अभ्यासक मिळायला हवा! त्याऐवजी तुकड्यातुकड्यांनी आणि निवडक भाषांमधल्या निवडक शब्दांपुरता तोकडा अभ्यास करून हे संशोधन जगद्व्यापी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न या युरोपीय अभ्यासकांनी केला. असे आपल्या आवाक्याच्या बाहेरचे काम अंगीकारून तर्काच्या आधारावर न टिकणारे संशोधन प्रसिद्ध करणार्‍या या युरोपीय विद्वानांना पाहिले की, शिवधनुष्य उचलण्याच्या नादात ते आपल्या उरावर पाडून घेऊन भर वीरांच्या सभेत स्वत:चे हसे करून घेणार्‍या रावणाचीच आठवण येते.


प्रतिपक्षाचे संशोधन

मागच्या पिढीतले डॉ. एन. आर. वराडपांडे हे भारतीय विद्वान, तर आजच्या पिढीतले श्रीकांत तलगेरी हे भारतीय, किंवा कोनराड एल्स्ट (Koenraad Elst) हे युरोपीय विद्वान भाषाशास्त्राचा सखोल अभ्यास करून आधीच्या युरोपीय संशोधकांच्या बरोबर उलट निष्कर्ष काढतात. डॉ. वराडपांडे यांच्या मते, विविध भाषांमधल्या अनेक शब्दांमधला सारखेपणा हे दाखवतो की, ज्या ज्या प्रदेशात एखाद्या वस्तूचा प्रत्यक्ष वापर होतो, तिथे तिथे तो शब्द मूळ धातूपासून तयार होतो. या दृष्टीने पाहिल्यास असे धातू आणि धातुसाधित नामे-विशेषणे यांचे सर्वाधिक प्रमाण संस्कृत भाषेतच दिसते. त्यामुळे संस्कृतलाच इतर भाषांमधल्या धातूंची जननी मानले पाहिजे. अवेस्त्यात सप्त-सिंधू प्रदेशाचे उल्लेख सापडतात, पण वेदांमध्ये इराण, पर्शिया, सीथिया वगैरे प्रदेशांचे उल्लेख मिळत नाहीत. त्यामुळे काळाच्या दृष्टीने वैदिक संस्कृत आधी, तर इराणी ‘अवेस्ता’ची झेंद भाषा त्याच्या नंतरची, असेच सिद्ध होते. हे सांगून श्रीकांत तलगेरी तर आपल्या संशोधनात ऋग्वेदाच्या विविध मंडलांचा काळही देतात. कोनराड एल्स्ट यांच्या संशोधनानुसार देखील अशी एखादी ’PIE' भाषा प्राचीन काळात अस्तित्वात असूही शकेल. पण, ती मुळात भारतातच उगम पावलेली असली पाहिजे आणि भारतातल्या तत्कालीन लोकांच्या माध्यमातून ती बाहेर जगभरात पोहोचली असली पाहिजे. भाषांच्या प्रसाराच्या आधारे भारतीय पूर्वजांचे भारताबाहेर जगात कोणत्या काळात कशा प्रकारे स्थलांतर होत गेले असावे, हे त्यांनी पुढील नकाशात दाखवले आहे. या संशोधनाच्या आधारे तर ‘भारतातून बाहेर सिद्धांत’ (Out of India Theory - OIT) अजूनच बळकट होतो.


संशोधन की कारस्थान?

भाषेच्या सखोल अभ्यासासाठी भाषाशास्त्रीय शिक्षण गरजेचे असेलही. परंतु, त्याची मानवी इतिहासाशी सांगड घालण्याआधी इतरही ज्ञानशाखांच्या द्वारे त्याची पुष्टी करणे (Corroboration) गरजेचे ठरते. ते न करता काही विशिष्ट राजकीय इराद्याने प्रेरित होऊन आणि काही गृहीतके आधीपासूनच मनात ठेवून जर असा अभ्यास घडत असेल, तर त्याला अभ्यास नव्हे ‘कारस्थान’ म्हणतात. दुर्दैवाने भारतीय इतिहासाच्या रचनेत अशा कारस्थानांचाच मोठा सहभाग राहिल्याचे आर्यप्रश्नाच्या निमित्ताने लक्षात येते. भारतीय इतिहासातील अनेक गोष्टी आर्यांच्या स्थलांतराच्या किंवा आक्रमणाच्या सिद्धांताला खरे मानूनच लिहिण्यात आल्याचे हळूहळू लक्षात येऊ लागते. जसे आर्यांचे भारतात आगमन इ. सनपूर्व १८०० ते इ. सनपूर्व १५०० या दरम्यान झाले, असे एकदा मानून टाकले की, पुढचा सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास, वाङ्मयीन विकास इत्यादी सर्व काही त्याच्या नंतरच घडल्याचे दाखविले गेले. वेदांची निर्मिती, रामायण-महाभारत वगैरे आर्ष महाकाव्यांची निर्मिती, पुराणांची निर्मिती, विविध देवतांचा विकास, विविध संप्रदायांचा विकास या सर्व गोष्टी अशाच भाषिक अभ्यासाच्या आधारे याच्या पुढच्या काळातच झाल्याचे दाखविले गेले. त्यातूनच मग अनेक तथ्ये आणि पुरावे कधी वाकवून, कधी डावलून, तर कधी त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष करून भगवान गौतम बुद्ध, भगवान वर्धमान महावीर, श्रीमद् आदिशंकराचार्य, इत्यादी ऐतिहासिक महापुरुष आणि सोबतच असंख्य राजे, राजवंश, साहित्यिकांना सुद्धा याच कालखंडात बसविणे भाग पडले. जेव्हा अशी संशोधने आणि निष्कर्ष कुणीतरी पुरावे आणि तर्काच्या आधारावर खोडून काढते, तेव्हा मात्र या सिद्धांतांचे पाठीराखे शहामृगासारखे वाळूत डोके खुपसून बसतात. बौद्धिक किंवा वैचारिक पातळीवर प्रतिवाद करत नाहीत. या आधारावर इतिहासाची पुनर्रचना करायला घेतल्यावर मात्र त्याला ‘इतिहासाचे भगवेकरण’, ‘मनुवाद’ वगैरे नावे देऊन आंदोलनाचे हत्यार उपसतात. पण, आपला वैचारिक पराभव मात्र कधी मान्य करत नाहीत. अशा पद्धतीने स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणवणारे समाजधुरिणच दीड-दोनशे वर्षांपूर्वीच्या कालबाह्य आणि गैरलागू निष्कर्षांना चिकटून राहतात आणि खर्‍या अर्थाने ‘प्रतिगामी’ ठरतात.



- वासुदेव बिडवे
(क्रमश:)
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@