कलासाधक स्वाती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

swati pasari_1  


आपल्या कलेच्या माध्यमातून इतरांच्या जीवनात आपल्या कुंचल्यातून हास्य फुलविणार्‍या स्वाती पसारीच्या कलाप्रवासाबाबत...कोलकात्तास्थित मारवाडी कुटुंबात वाढलेली स्वाती पसारी ही तरुणी. कोलकात्तामधील मॉडर्न हायस्कूलमध्ये स्वातीचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले व उच्चशिक्षणासाठी ती ऑस्ट्रेलियाला गेली. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियातील बॉण्ड युनिव्हर्सिटीमध्ये ‘वाणिज्य व व्यवसाय’ या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती भारतात परतली. भारतात परत येताच पिढीजात मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात ती हातभार लावू लागली. ती म्हणते, या कामात माझे मन तर लागत होते. परंतु, सारखे काहीतरी राहते आहे. या व्यापात आपण कुठेतरी चुकतो आहोत, असे मला वाटायला लागले. व्यावसायिकदृष्ट्या मी कलाक्षेत्रात उतरेल, असे मला कधीही वाटले नव्हते. स्वातीने आपल्या कौटुंबिक व्यवसायातून माघार घेत स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि तिने ‘स्पिरीच्युल स्कूल ऑफ प्रॅनिक हीलिंग’ (pranic healing)मध्ये प्रवेश घेतला. इथेच ती आपल्या चित्रकलेच्या छंदाकडे वळली आणि कला जोपासण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला. मागील १२वर्षांपासून स्वाती कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. ती सेमी अ‍ॅबस्ट्रॅक्ट आणि शिल्पकलेत पारंगत आहे. स्वातीने चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतले नाही, ती स्वतः घडलेली एक कलाकार आहे. ‘प्रॅनिक हीलिंग’ आणि ध्यानधारणा करून मला समजले की, ही कला माझ्या अंतर्मनातील आवाज आहे आणि हेच माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे.लहानपणापासूनच स्वातीला कलेची आवड होती. कोणाचाही वाढदिवस असो, वर्धापनदिवस असो किंवा काही कार्यक्रम, स्वाती स्वतः ग्रीटिंग कार्ड बनवत, काही वस्तू बनवून भेट देत असत. शाळेतील प्रकल्पदेखील आवडीने उत्कृष्टरित्या बनवून जमा करत. २००८मध्ये ती व्यावसायिकदृष्ट्या या क्षेत्राकडे वळली. याची ती दोन प्रमुख कारणे सांगते, ते म्हणजे - पहिलं की, ही कला जोपासणे हा तिचा आंतरिक आवाज होता आणि दुसरे म्हणजे तिच्या चित्रांना लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. ऑगस्ट २००८ मध्ये, जेनिस आर्ट गॅलरी येथे स्वातीने स्वतः काढलेल्या काही चित्रांचे प्रदर्शन भरविले. यावेळी १५ चित्रे तिच्याकडे होती. या चित्रांना लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तिच्या सर्वच चित्रांची विक्री झाली. तिचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला हे तिच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरले. हाच आपल्यासाठी योग्य मार्ग असल्याचे तिला कळले. कॅनव्हासवरील चित्रे तसेच शिल्पे या तिच्या कलाकृती आता एक लाख ते साडेतीन लाख रुपयांच्या दरम्यान विकल्या जातात. २०१७मध्ये तिचे एक शिल्प पाच लाख रुपयांना विकले गेले. चित्रांच्या थीमविषयी बोलताना ती म्हणते, माझी चित्रे ही दोलायमान आहेत आणि प्रसन्नता दर्शविणारी असतात. कारण आनंद, जीवनाचा प्रवाह दर्शविण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्या कलेतून सकारात्मकता पसरविण्याचा हेतू असतो. विशेष म्हणजे, स्वाती तिच्या बहुतेक कलाकृतींसाठी ध्यानस्थानापासून प्रेरणा घेते, जी तिला आतील चांगुलपणा आणि संदेशांवर लक्ष केंद्रित करण्यास शिकवते. स्वातीची चित्रे आणि तिची शिल्पकला जगभरातील कलाप्रेमींना साद घालणारी असतात.ती वैश्विक चिंतनातून आपल्या चित्रांसाठी प्रेरणा घेते. अमेरिकेतील जॅक रॅबिट आणि लस्या आर्ट आणि सलाईम आर्ट गॅलरी, धूमिमल सिटी आर्ट गॅलरी, ऑरा आर्ट आणि इमामी आर्ट गॅलरी यासारख्या भारताबाहेरील कला दालनामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तिचे कार्य प्रदर्शित झाले आहे. तिच्या अनेक कलाकृतींना जकार्ता, सिंगापूर, लंडन, दुबई आणि हाँगकाँगमधून मागणी आहे. यातील सर्वात परिपूर्ण भाग सांगताना स्वाती म्हणते की, तिची चित्रे केवळ शोभेची वस्तू नाही तर ती समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा भाग बनतात. ती टोकियोमधील तिच्या एका ग्राहकाबद्दल सांगताना म्हणते, माझ्या एका क्लाएंटने म्हटले की प्रत्येक वेळी जेव्हा तिला आयुष्यात काही कमी जाणवते तेव्हा ती चित्रांसमोर बसते. जेव्हा ती या चित्रांकडे पाहते तेव्हा तिला आनंदी वाटते. ही प्रतिक्रिया माझ्यासाठी एक आशीर्वाद होता.
स्वाती म्हणते, अनेक दशकांपासून मागे पडलेल्या या कला क्षेत्राकडे वळताच मी मोठे यश मिळवले आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. हा मार्ग तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. लोक आपणास गांभीर्याने घेत नाहीत, ते एक कलाकार म्हणून तुमच्याकडे संशयित दृष्टीने पाहतात. आपल्या कुटुंबातील सदस्यदेखील आपले समर्थन करीत नाहीत आणि त्यांच्यावर आपल्यामुळे बरीच टीका होते. हे तिने निःसंकोचपणे स्पष्ट केले. त्याचबरोबर तिने एक उदयोन्मुख कलाकार म्हणून अनेक आव्हानांचा सामना केला. या दरम्यान स्वातीला आठवते की, तिच्या आजोबांच्या ठाम पाठिंब्याने आणि विश्वासाने तिला तिच्या निर्णयावर ठाम राहण्याचे सामर्थ्य दिले. शिवउपासक स्वाती सांगते की, ती वर्षातून एकदा किंवा दोनदा वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात जाते. सुरुवातीला तीर्थयात्रेच्या वेळीच ती आपल्या आजोबांसोबत काशी विश्वनाथ मंदिराला भेट देई, तसेच हिंदू सेवा रुग्णालयातही जात असे. २०१७ मध्ये तिच्या आजोबांच्या निधनानंतर, स्वाती रुग्णालयाची विश्वस्त म्हणून कार्यरत झाली. ती सांगते, जेव्हा आपण इतरांचे दु:ख समजून घेतो तेव्हाच त्याची आपणास जाणीव होते. मी रूग्णांसमवेत काही वेळ घालवते, त्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील याचा विचार मी करते. ज्यांना उपचार घेणे परवडत नाही त्यांच्यावर नि:शुल्क उपचार केले जातात. अशा कलाकार असण्यासोबतच आपल्या कलेच्या माध्यमातून इतरांच्या जीवनात आनंद भरणार्‍या स्वातीच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@