पित्तशमन आणि निसर्गोपचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2020
Total Views |

acidity _1  H x



आपल्याला होणार्‍या आजारांमध्ये ९९ टक्के सहभाग हा मनाचा असतो. मनामध्ये जे विचारांचे तरंग उमटतात, त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. अशाप्रकारे मनात उत्पन्न होणार्‍या प्रत्येक सूक्ष्म तरंगांचे पडसाद शरीरावर कळत-नकळत होत असतात. ‘जे पेरणार, ते उगवणार.’ कारण, आपण सुरुवातीला बघितलं. जे बाहेर आहे तेच आत आहे. आपल्या वागण्या-बोलण्याचा परिणाम जसा बाहेर होत असतो, तसाच तो शरीरातही होणार आहे. आता हा परिणाम नेमका कसा होतो, ते जाणून घेऊया.
 

एखाद्याचं पित्त खवळलं आहे, म्हणजेच त्या व्यक्तीला राग आला आहे. याचाच अर्थ राग हा शरीरासाठी हानिकारक आहे. त्याचा परिणाम प्रत्येक कोशिका, पेशी, नसा, त्वचा आणि महत्त्वाचे म्हणजे मेंदूवर होत असतो. आपल्या शरीरात दोन मेंदू आहेत. आता तुम्ही म्हणाल की, यात काय नवीन? एक लहान आणि मोठा मेंदू. पण, अजून एक महत्त्वाचा मेंदू आहे. तुमचं यकृत. होय, कारण यकृतामध्ये पाच हजार वर्षांपासूनचा डेटा स्टोअर आहे. यामध्ये ५०० हून अधिक रसायने तयार होत असतात आणि त्याचे परिणाम, पडसाद शरीरावर उमटताना दिसून येतात. म्हणूनच यकृताला नंबर दोनचा म्हणजे ‘दुसरा मेंदू’ असं म्हटलं जातं. यामध्ये जेवढ्या नकारात्मक आठवणी, गोष्टी आपण साठवून, सर्व रस्ते हळूहळू ब्लॉक करत असतो आणि मग कालांतराने प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम दिसायला लागतो.
 
 
'unwanted growth of cells is tumors.' म्हणजे, गाठी झाल्या की आपल्याला कर्करोग आहे, असं समजण्याची अजिबात गरज नाही. कारण, प्रत्येक गाठ ही कर्करोगाची असतेच असे नाही. थोडक्यात, तुम्ही जे पेरुन मशागत करणार ते आणि तसेच उगवणार. मनाच्या श्लोकात रामदास स्वामींनी लिहिलेच आहे - ‘मना त्याची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले.’ म्हणून पित्त खवळू द्यायचे नाही, राग गिळायला शिका, तरच प्रगती होईल. मग असा प्रश्न पडतो की, राग तर आम्हाला अगदी पावलोपावली येतो. मग त्यावर इलाज काय? यावर एकच छान उपाय म्हणजे ग्लासभर पाणी पिणे. बरेच जण हा उपाय सांगतात, पण अनेकांना हा प्रश्न पडतो की, नुसते पाणी प्यायल्याने काय होणार? आपण आधीच बघितलं आहे की, शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आहे आणि ते संतुलित राहिलं, तरच रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहणार आहे. पर्यायाने, शरीरातील प्राणवायूच्या वहनाचे काम पाण्यामार्फतच होते आणि मग जिथे जिथे अडथळे निर्माण होतात, तिथे तिथे प्राणवायू पोहोचू शकत नाही आणि दुखणे वाढत जाते. हा आहे पाणी पिण्याचा फायदा आणि मनही शांत होते. म्हणून म्हणतात ना, ‘पहा मन चंगा तो...’ तात्पर्य - शांत, निरोगी मन हे निरोगी, संतुलित जीवनाची गुरुकिल्ली आहे.




मग यासाठी दीर्घश्वसन, प्राणायाम हे सगळं देखील तितकचं महत्त्वाचं ! ध्यानधारणा महत्त्वाची! आपल्या आवडत्या विषयात आपण एकरुप होऊन काम करतो आणि १०० टक्के परिणाम मिळतो. म्हणजेच चित्त स्थिर आणि एकाग्र असेल, तर आपण समस्यांवर, अडीअडचणींवर सहजच मात करु शकतो; मग ती शारीरिक व्याधी असेल किंवा भोवतालची परिस्थिती. हे पित्त खवळतं कशाने, तर त्याची अनेक कारणे असू शकतात. जसं आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट किंवा घटना घडली तरी पटकन खूप राग येतो. कधी कधी गैरसमजातूनही राग अनावर होतो. दुसरे कारण म्हणजे, आपला चुकीचा आहार आणि जीवनशैली. यातून मार्ग हा आपल्यालाच काढायचा आहे. आज बहुतेक सगळ्या कार्यालयात एसी आहेत. आपण असं पकडू की, दहा ते बारा जण तिथे एकत्र काम करतात. खोली सगळीकडून बंद असते. मग आतमध्ये ऑक्सिजन येणार कुठून? आठ-दहा तास सगळ्यांचे उच्छवास तिथेच फिरत असतात! बरं तेथून बाहेर आल्यानंतर तापमान एकदम बदलते आणि चटके बसतात. शरीरात कशाची वाढ होते? शांतपणे विचार करा. म्हणजे संसर्गजन्य आजार सहज होणं शक्य आहे. ऑक्सिजनची ही कमतरता कापूर भरून काढू शकतो. आपल्या टेबलावर समोरच एक कापराची पुरचुंडी करून ठेवावी, ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहील आणि प्राणवायूही मिळेल. हाच उपाय आपण कारमध्येही करु शकतो, स्टेअरिंगच्या बाजूला कापूर ठेवून.



दुसरं म्हणजे मैद्याचा वापर आज आहारात जास्त प्रमाणात होताना दिसतो. त्यामुळे पोट साफ न होण्याचं प्रमाण वाढतं. सकाळी सकाळी सोपा नाश्ता, सामान्य माणसाचा म्हणजे चहा-पोळी. हा पदार्थ अत्यंत घातक आहे. पित्त वाढवणारा आहे. मग काय खावं, हा प्रश्न. आपण तूप, गूळ लावून, भाजीसोबत किंवा भाजीचा पराठा, तेल मसाला लावून खाऊ शकतो. चहा हा उपाशीपोटी घेऊच नये. आता पावसाळा उंबरठ्यावर आला असला तरी वातावरणात उष्णता कायम आहे. पूर्वी बाहेरून आलेल्या व्यक्तीला आधी गूळ दिला जाई आणि नंतर पाणी. म्हणजे ऊन बाधत नाही आणि पित्त खवळत नाही. सकाळी सकाळी मोरावळा खायची पद्धत होती, ती पित्त शमनासाठीच. कोहाळ्याची वडी किंवा पेठा हाही पित्त शांत करण्यासाठी उत्तम उपाय आहे. दुपारच्या जेवणात गूळ किंवा इतर काही गोड आवर्जून असायचेच. बडीशेप, शोपा, जिरे, ओवा आणि खडीसाखर याची पावडर दिवसातून सात-आठ वेळा घेतली तरी बरे वाटते. असे अनेक सोपे घरगुती उपाय आहेत, जे औषधांपेक्षा नक्कीच चांगले आहेत. कारण, त्याने शरीराला कुठलाही अपाय होत नाही, तर फायदाच होतो.


आपल्या स्वयंपाकघरातील औषधांचा खजिना कितीही लुटला तरी कमीच आहे. अजून एक त्रास पित्त किंवा शरीरात उष्णता वाढल्याने होतो, तो म्हणजे तोंड येणे. अशावेळी आपण लेगच ‘बीकॉम्पलेक्स’च्या गोळ्या घेऊन मोकळे होतो. पण, आपल्याला हे माहीत आहे का छोटी वेलची (हिरवी) किंचित चावून सालासकट जर तोंडात चघळली किंवा धरुन ठेवली आणि लाळ गिळत गेलो, तरी पाचव्या मिनिटाला बराच फरक पडतो. तसंच पोटावर गार पाण्याची घडी ठेवली, तरी पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. पूर्वी लग्नात काशाची वाटी देण्याची पद्धत होती. कशासाठी होती ती? तूप किंवा एरंडेल तेल लावून पाय या वाटीने घासले तरी पित्तशमन होण्यास मदत होते. किती लिहू! खूप आहे, पण मर्यादा आहे. बघा विचार करा आणि प्रतिक्रिया कळवा.


- सीता भिडे
@@AUTHORINFO_V1@@