असा खेळाडू होणे नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2020
Total Views |


CHUNI goswamy_1 &nbs



फुटबॉलच्या खेळामध्ये भारतीय संघाचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करणारे माजी कर्णधार चुनी गोस्वामी यांच्या आयुष्याची गौरवगाथा सांगणारा हा लेख...

 



फुटबॉल... जगातील सर्वाधिक पसंतीस उतरलेला खेळ. जगातील अनेक देशांमध्ये फुटबॉललाच राष्ट्रीय खेळाचे स्थान मिळालेले आहे. भारतातही हा जगप्रसिद्ध खेळ तितकाच प्रसिद्ध. फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाला सहभागी होता आले नसले, तरी लीग स्पर्धांचे आयोजन करत भारताने फुटबॉल जगतात आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. भारताकडून आयोजित केल्या जाणार्‍या ‘इंडियन सुपर लीग’ (आयएसएल) स्पर्धांमधून मिळणारी मिळकत मोठी असल्याने अनेक परदेशी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक असतात. आजच भारतात फुटबॉलला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते आहे, असे म्हणणे कदाचित चुकीचे ठरेल. कारण, आजच नव्हे, तर याआधी जवळपास ६० वर्षांपूर्वीही भारतात फुटबॉलला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी असल्याचा इतिहास असून, भारताने या खेळात सुवर्णपदकावर आपले नाव कोरण्यात यश मिळविल्याचीही नोंद आहे. १९६२ साली इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बलाढ्य दक्षिण कोरियाच्या संघाला धूळ चारत भारताने सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. सुबीमल ऊर्फ चुनी गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या संघाने फुटबॉलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देत इतिहासाला गवसणी घातली. फुटबॉलच्या खेळामध्ये भारताचे अस्तित्व निर्माण करणार्‍या चुनी गोस्वामी यांचे नुकतेच वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. केवळ फुटबॉलच नाही, तर क्रिकेट, हॉकी, टेनिस, कॅरम अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये लक्षणीय कामगिरी करणार्‍या चुनी यांच्या निधनांनंतर क्रीडाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक क्रीडा प्रकारांत लक्षवेधी कामगिरी करणार्‍या चुनी गोस्वामींसारखा खेळाडू पुन्हा होणे नाही, अशी भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.
 

चुनी यांचा जन्म १५ जानेवरी १९३८ रोजी पश्मिम बंगालमधील किशोरगंज येथे झाला. आता हे गाव बांगलादेशमध्ये आहे. कालांतराने गोस्वामी कुटुंब किशोरगंज येथून दक्षिण कोलकात्यातील जोधपूर पार्क येथे स्थलांतरित झाले. उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले चुनी यांना लहानपणापासूनच विविध क्रीडा प्रकारांत रस होता. आधीपासूनच ते मुलांसोबत अनेक विविध खेळ खेळण्यास मैदानावर जात असे. विविध प्रकारचे खेळ खेळणे, हीच आवड त्यांच्या आयुष्याचा भाग बनली आणि फुटबॉलमध्ये करिअर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १९४६ साली ते वयाच्या आठव्या वर्षी मोहन बागानच्या कनिष्ठ फुटबॉल संघात दाखल झाले. येथे जवळपास २२ वर्षे ते खेळत राहिले. चुनी यांनी १९५६ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. या सामन्यात भारताने चीनच्या ऑलिम्पिक संघाला ‘१-०’ असे नामोहरम केले. १९६० ते १९६४ या पाच हंगामांमध्ये त्यांनी फुटबॉल संघाचे नेतृत्वही केले. मोहन बागानच्या सुवर्णकाळात ३१ जेतेपदे संघाने जिंकली होती. यात चुनी यांचा मोलाचा वाटा होता. कारण, या काळात त्यांच्या नावावर तब्बल २०० गोलची नोंद झाली होती. एका खेळाडूच्या नावावर इतक्या मोठ्या प्रमाणात गोलची असणारी नोंद पाहून त्यावेळी ‘इंग्लिश प्रिमीअर लीग’मधील अनेक नामांकित क्लब्सनी त्यांच्यापुढे खेळण्याचे प्रस्ताव ठेवले; परंतु चुनी यांनी ते नाकारले. लीगमधून खेळण्याऐवजी भारतीय संघाकडूनच खेळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. परदेशी लीग स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यास त्यांना सहज पैसेही कमावता आले असते. मात्र, स्वतःचे आर्थिक हित साधण्याऐवजी त्यांनी देशासाठी खेळण्याला प्राधान्य दिले. त्यांनी ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, आशिया चषक आदी स्पर्धांमधील ५० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. १९६२च्या यशानंतर १९६४च्या आशिया चषक आणि मेर्डेका चषक स्पर्धेत भारताला त्यांनी रुपेरी यश मिळवून दिले.
 
 
चुनी फुटबॉलप्रमाणेच क्रिकेट, टेनिस, कॅरम आणि हॉकीसुद्धा खेळायचे. दक्षिण क्लब कोर्टकडून त्यांनी टेनिसमध्येही लक्षवेधी कामगिरी केली, परंतु, फुटबॉलमधील कारकिर्द निवृत्तीकडे वाटचाल करीत असतानाच क्रिकेटमध्ये त्यांनी पाय घट्ट रोवले. १९६२-६३च्या हंगामात पदार्पणानंतर पश्चिम बंगालकडून ४६ प्रथम श्रेणी सामने खेळताना १५९२ धावा आणि मध्यमगती गोलंदाजीच्या बळावर ४७ बळी त्यांच्या नावावर आहेत. निवृत्तीनंतर फुटबॉलपटू घडवण्याच्या प्रेरणेने चुनी यांनी टाटा अकादमीचे संचालकपद सांभाळले. ‘अर्जुन’, ‘पद्मश्री’ अशा देशातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसह टपाल खात्यानेही एक तिकीट प्रकाशित करुन त्यांचा गौरव केला. अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये लक्षवेधी कामगिरी करणारा खेळाडू कोणत्याही देशाला मिळणे, हे त्या देशाचे सौभाग्यच! भारतीय फुटबॉलला जागतिक नकाशावर मानाचे स्थान प्राप्त करून देण्यात चुनी यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने क्रीडाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वांकडून व्यक्त केली जात आहे.
 
 

 

 

- रामचंद्र नाईक

 

@@AUTHORINFO_V1@@