तालिबानी आणि कोरोनाच्या कात्रीत अफगाण

    दिनांक  19-Apr-2020 20:13:09   
|
Army in Afgan_1 &nbs

जगात सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. अशा वेळी जगातील राष्ट्रे हे कोरोना नावाच्या गनिमाशी दोन हात करण्यात व्यस्त आहेत. मात्र, आशिया खंडातील आणि भारताचा शेजारी अफगाणिस्तान मात्र कोरोना आणि तालिबानींच्या कारवाया यांच्या संघर्षाच्या कात्रीत सापडला आहे.

मुळातच अफगाणिस्तान हे विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत येणारे नाही. त्यातच तेथील सरकार व प्रशासन हे कोरोनासंबंधी उपाययोजना करण्यासाठी आपल्या पातळीवर आणि उपलब्ध साधनांच्या आधारे नागरिकांवर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अज्ञानात सुख म्हणतात तसे, जास्त तपासणी केल्यास आणि कोरोनाबाधितांचे आकडे वाढल्यास कराव्या लागणार्‍या सर्व उपाययोजनांसाठी उपलब्ध संसाधनांची तोकडी साधने ही खर्‍या अर्थाने अफगाणची डोकेदुखी आहे. त्यातच सध्याच्या काळात वाढणारे तालिबानी हल्ले ही एक वेगळी डोकेदुखी. त्यामुळे असेही लोक कोरोनामुळे मृत पावत आहेत. तेव्हा आता तरी आपण हल्ले करू नये, अशी विणवणीच अफगाण सरकारच्यावतीने तालिबानींना करण्यात आली आहे. त्यामुळे अफगाण सरकारने तालिबानसमोर जवळपास गुडघे टेकले, असे म्हटले तरी आता वावगे ठरणार नाही.

अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सुविधांची मोठी वानवा आहे. त्यामुळे तेथील अनेक नागरिकांची तपासणी झालेली नाही किंवा होऊ शकणार नाही. सरकार म्हणून लोकाभिमुख सुविधा प्रदान करण्यात येणारे अपयश ही मोठी वेदनादायी बाब आहे. अशातच तालिबानींकडून होणारे हल्ले म्हणजे मानवतेच्या सर्व सीमा लंघून होणारे निर्दयी कृत्यच म्हणावे लागेल. तेथील काही आरोग्याधिकारांच्या मते काबूलच्या गल्लीबोळातदेखील कोरोनाचे हजारो रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचणे आम्हाला शक्य नाही. अशी समोर असणारी स्थिती ही प्रशासन म्हणून आणि शासन म्हणून निश्चितच त्रासदायकच!

अफगाणिस्तानमधील सध्या असणारी व्यवस्थादेखील या तालिबानींच्या हल्ल्यामुळे कोलमडण्याची शक्यता काही अधिकारी व्यक्त करत असल्याचे वृत्त आहे.अशा वेळी जर कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली तर त्याची पहिली शिकार ही अफगाणमधील आरोग्य यंत्रणा ठरेल, यात दुमत नाहीच. केवळ चमत्कार आणि ईश्वरी आशीर्वाद यावरच आता अफगाणिस्तानचे भविष्य (अस्तित्व म्हटले तरी चालेल) अवलंबून आहे, असे म्हणण्याची आता वेळ आली आहे. ज्या मातीत ओसामा बिन लादेनच्या रूपाने दहशतवाद उभा राहिला आणि तो पोसला गेला. दहशतवादाचे आगार पाकिस्तानची असलेली जवळीक, महासत्तेच्या नको इतके जवळ जात स्वतःच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची आजवर घडून गेलेली कृती या सर्व बाबींची परिणती म्हणजे आजची दुहेरी कात्रीत सापडलेली स्थिती आहे का? अस प्रश्न यामुळे आता पुढे येत आहे.

आजवर केवळ धर्म आणि धर्माच्या नावाने जारी करण्यात येणारे फतवे हेच जीवनाचे सार आहे, अशी स्थिती अफगाणमध्ये होती. त्यामुळे तेथील काही नागरिकांमध्ये कमालीची धर्मांध वृत्तीची जोपासना झाली. त्यातूनच तालिबानसारख्या कट्टरतावादी समूहाचा जन्म झाला. पाहता पाहता या समूहाचे गारुड अवघ्या अफगाणवर पसरले. काही बाबतीत काही नागरिक पुढे येऊन तालिबानचा विरोध आजही करत असल्याची उदाहरणे समोर आली. मात्र, या सर्वात शिक्षण अफगाणमध्ये मागे पडले. परिणामस्वरूप सारासार विचार करणे, सदसद्विवेक जागृत ठेवणे हे येथील काही नागरिकांमध्ये दिसून न येणे स्वाभाविक होते. त्यामुळे कोरोनासारखी महामारी आणखी वाढणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात नागरिकांची साथ असणे आवश्यक असताना आज तेथील नागरिक काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळे सामाजिक जागृतीचे आव्हानदेखील अफगाणसमोर उभे ठाकले आहे.


येथे ‘लॉकडाऊन’च्या काळातही लोकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ची पार ‘ऐशीतैशी’ करून ठेवली आहे. यावर अफगाणिस्तानचे आरोग्यमंत्री फिरोजुद्दीन फिरोज यांनीही हात टेकले आहेत. ते म्हणतात, “लोकांनी जर गांभीर्याने विचार केला नाही , आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही, तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये जगात आमचा देश अग्रस्थानी असू शकेल! ” एकीकडे आरोग्यव्यवस्थेकडे लक्ष देणे, वाढत्या रुग्णसंख्येची काळजी करणे आणि तालिबानचे हल्ले थांबविणे अशा तीन आघाड्यांवर द्राविडी प्राणायाम अफगाणला सध्या करावा लागत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.