बेळगाव ते अमेरिका व्हाया मुंबई...

    दिनांक  11-Nov-2020 20:14:48
|
 
shri thanedar_1 &nbs
नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिशीगन येथे आमदार म्हणून निवडून आलेले मराठमोळे व्यक्तिमत्त्व श्री ठाणेदार यांच्या आयुष्याविषयी...
 
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. डेमोक्रेटिक पक्षाने या निवडणुकीत विजय मिळवला. डेमोक्रेटिक पक्षाने मिळविलेल्या या विजयात भारतीय वंशाच्या काही विजयी उमेदवारांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. अमेरिकेच्या मिशीगन प्रांतातील डेमोक्रेटिक पक्षाचे विजयी उमेदवार आणि नवनिर्वाचित आमदार श्री ठाणेदार हे त्यांपैकीच एक. मराठमोळे व्यक्तिमत्त्व असणारे श्री ठाणेदार यांनी अमेरिकेमधील निवडणूक जिंकत भारतीयांच्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा रोवला आहे.
 
 
श्री ठाणेदार हे आजच्या घडीला अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींपैकी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचा इतिहास भारताशी संबंधित आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही त्यांनी आपण मूळचे भारतीय असल्याचे अभिमानाने सांगत मराठी असल्याचा आपणाला गर्व असल्याचे सांगितले आहे. श्री ठाणेदार हे मूळचे कर्नाटकमधील. कर्नाटकातील बेळगावमध्ये दि. २२ फेब्रुवारी १९५५ साली त्यांचा जन्म झाला. कर्नाटकमध्ये जन्म झालेला असला तरी या ठाणेदार कुटुंबीयांची मराठीसोबतची नाळ कायम जुळलेली होती. श्री ठाणेदार हे लहानपणापासूनच शिक्षणात अगदी हुशार. उच्चशिक्षित होऊन परदेशी जाण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणीच उराशी बाळगले होते. यासाठी त्यांनी कसून तयारी करण्यास सुरुवात केली.
 
 
दैनंदिन शालेय शिक्षणाकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये त्यांनी उत्तम गुण मिळवले. परिस्थितीअभावी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयामध्ये त्यांना प्रवेश घेता आला नाही. परंतु, त्यांनी पदवीधर होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी उत्तम गुणांसह मिळवली. यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी धारवाडच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.एससीचे शिक्षण घेत असतानाच विजापूर स्टेट बँकेत त्यांना नोकरीची संधीही चालून आली.
 
 
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला. बँकेत नोकरी करत असतानाच मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातूनही त्यांना नोकरीची ऑफर मिळाली. आपल्याच शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित ही नोकरी असल्याने त्यांनी यासाठी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते साहाय्यक म्हणून रुजू झाले. यादरम्यान त्यांनी आपली राहून गेलेली एम.एस्सी. देखील मुंबई विद्यापीठातून पूर्ण केली.
 
 
पुढे १९७९ साली अमेरिकेच्या अ‍ॅक्रॉन विद्यापीठात रसायनशास्त्रातील पीएच.डीसाठी त्यांनी प्रवेश घेतला अन् ते अमेरिकावासी झाले ते कायमचेच. दशकभरात त्यांना अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले. त्यांनी व्यवसाय-प्रशासन या विषयातले उच्चशिक्षणही घेतले. ‘केमिर’ या रासायनिक कंपनीत ते नोकरीला लागले आणि अखंड अभ्यास व कष्टाच्या जोरावर अल्पावधीत तिचे मालकही झाले.
 
 
त्यांच्या यशाची वाटचाल व्यवस्थितरित्या सुरु होती. पण का कुणास ठाऊक नियतीच्या मनात काय होते ते. ठाणेदार यांच्यावर २००८ सालीच्या मंदीमुळे मालमत्ता जप्त होण्याचे संकट ओढवले. मात्र, याही वेळी खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्या इनिंगची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मंदीमुळे गमावलेले आपले सर्व वैभव त्यांनी पुन्हा नव्याने कमावले. नव्याने आर्थिक भरभराटीचे शिखर चढणार्‍या श्री ठाणेदार यांची पावले त्यानंतर राजकारणाकडे वळाली. २०१८ साली झालेल्या मिशिगन प्रांताच्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीसाठी ते डेमोक्रेटिक पक्षाकडून लढले. त्यात त्यांना यश मिळाले नाही.
 
 
यातून खचून न जाता त्यांनी पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला. यंदा त्याच प्रांतातील आमदार म्हणून ते निवडून आले. वयाच्या २४व्या वर्षी अमेरिकेत गेलेले ठाणेदार आता पासष्टीत आहेत. म्हणजे तब्बल चार दशके ते अमेरिकेत आहेत. पण, म्हणून मराठीशी असलेली त्यांची नाळ तुटलेली नाही. अमेरिकेत मराठी संस्कृती जपणार्‍या मंडळींमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांची दोन आत्मकथने मराठीत वाचकप्रिय ठरली आहेत; आता या निवडणूक अनुभवांवर आधारित पुस्तक ते लिहिणार असल्याची माहिती आहे.
 
 
मिशीगन हा मतदारसंघ गौरवर्णीय, कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक, आशियाई अशी विविधता असणारा आहे, पण येथे बहुसंख्या आहे ती कृष्णवर्णीयांची. एकूण मतदानापैकी ९३ टक्के मते मिळवून ठाणेदार विजयी झाले. ठाणेदार यांच्या रुपाने एक भारतीय लोकप्रतिनिधी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांना मिळाला आहे. आमदार म्हणून मिशीगनमधील भारतीयांच्या हक्कासाठीची अनेक कामे मार्गी लावण्याचा त्यांचा निर्धार आहे. आगामी गव्हर्नरपदाच्या निवडणुकांमध्येही सहभागी होण्याचा त्यांचा निर्धार असून श्री ठाणेदार यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...!
 
- रामचंद्र नाईक
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.