पेण-पनवेलमधून खवले मांजराचे १२ किलो खवले जप्त

    दिनांक  13-Oct-2020 22:10:04
|
pangolin_1  H x

खवले मांजर तस्करीचे 'कोकण कनेक्शन' पुन्हा उघड 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पेण आणि पनवेलमधून खवले मांजराच्या १२ किलो खवल्यांची तस्करी उघडकीस आली आहे. वन विभागाने केलेल्या कारवाईत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी कोकणातील आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या प्राण्याच्या तस्करीचे कोकण कनेक्शन उजेडात आले आहे. 
 
जगामध्ये खवले मांजराच्या एकूण आठ प्रजाती आहेत. त्यामध्ये भारतीय उपखंडात चायनीज आणि भारतीय खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात. या प्राण्याच्या अंगावरील खवल्यांना वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय तस्करी बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे या प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातील कोकणपट्ट्यामध्ये भारतीय खवले मांजराचा अधिवास आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोकणातून सातत्याने या प्राण्याच्या तस्करीची प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशीच एक तस्करी ११ आॅक्टोबर रोजी अलिबाग वन विभागातील अधिकाऱ्यांनी उघडकीस आणली. या प्रकरणात पनवेल येथून ९ किलो आणि पेणमध्ये टाकलेल्या धाडीत ३ किलो खवल मांजराचे खवले जप्त करण्यात आले. 
 
 
 
११ आॅक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनकर्मचाऱ्यांनी पनवेल तालुक्यातील चिंचवण गावाजवळ महामार्गावर क्षणभर विश्रांती हाॅटेलजवळ सापळा रचला. याठिकाणी मोटारसायकल वरुन आलेल्या तीन इसमांकडील पिशव्यांची तपासणी केल्यानंतर आम्हाला ९ किलो खवले मिळाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी.मरले यांनी दिली. आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन आरोपींची नावे सांगितली. या दोन्ही आरोपींना त्यांचा पेणमधील राहत्या घरत्यातून अटक करण्यात आली. त्यामधील एका आरोपीने पेणमधील जे.एस.डब्लू कंपनीजवळ असलेल्या शालीमार हाॅटेलच्या परिसरात खवले मांजराच्या खवल्यांनी भरलेली बॅग टाकली होती. ही बॅग ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये आम्हाला ३ किलो खवले सापडल्याचे, मरले यांनी सांगितले. आरोपींमध्ये ज्ञानेश्वर शिवकर (रा. खारपाले), प्रविण जाधव (रा. दापोली), प्रतिश भोस्तेकर (माणगाव), सौरभ पाटील (खारपाले) आणि किरण पवार (रा. कळद) यांचा समावेश आहे. आरोपी कोकणातील असल्याने खवले मांजरांचे कोकण कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. १२ किलो खवले ताब्यात घेतल्याने आरोपींनी किमान चार खवले मांजरांना मारल्याचा अंदाज आहे. ही कारवाई अलिबागचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डी.एस.सोनावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी मरले आणि कर्मचाऱ्यांनी केली. 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.