मुंबई : पालघर जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ९१७ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४१ हजार २५८ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळाले असून, उर्वरित १९ हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेले नाहीत. या विलंबाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी विधान परिषदेत केली.
आ. भाई जगताप आणि प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर बोलत होते. त्यांनी सांगितले की, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात गणवेश वाटपाची पद्धत वेगळी होती. एक गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत शिवला गेला, तर दुसरा गणवेश (स्काऊट-गाईड) शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आला. यामुळे अनेक ठिकाणी विलंब झाला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी सुधारित योजना राबवली जात असून, सर्व शाळांच्या व्यवस्थापन समित्यांना गणवेशासाठी निधी थेट हस्तांतरित करण्यात आला आहे. या समित्या स्थानिक स्तरावर कापड खरेदी करून गणवेश तयार करतील, असे भोयर यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना राज्यमंत्र्यांना दिली.