मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर भेसळयुक्त दुधाच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. शुक्रवार, ११ जुलै रोजी विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी चूना, तेल आणि विविध केमिकल मिसळून कशा प्रकारे दूध तयार केले जाते, याबद्दलचे प्रात्यक्षिकच दाखवले.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "आमचा शेतकरी रात्रंदिवस जनावरांच्या पाठीमागे राबतो आणि दूध उत्पादन करतो. परंतू, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत आहे. दुधात वेगवेगळ्या प्रकारची रसायने वापरून एका टँकरचे तीन टँकर करतात. शेतकऱ्यांना दुधाला दर मिळाला पाहिजे, म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. यामुळे लोक मरायला लागली आहे. मुंबई, पुणे, नागपुरात राहणारी लोक दिवसभर कष्ट करतात, मेहनत करतात. लहान मुलांना हे दूध पाजतात. यामुळेच कॅन्सर आणि इतर रोग वाढले आहेत. सरकारने या विषयावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा," अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "हे मटेरियल इस्लामपुरातून मिळाले आहे. तिथे एक मोठी दूध डेअरी आहे. हे डेअरी शेतकऱ्यांशी आणि ग्राहकांशी खेळत आहेत.त्यामुळे भेसळीच्या बाबतीत कडक कायदा आणावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.
"गोपीचंद पडळकर यांनी अतिशय गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. या दुधाच्या माध्यमातून लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचे कारण नाही. यासंदर्भात मी स्वतः अन्न आणि औषधे विभाग आरोग्य विभाग यासह सगळ्या संबंधित विभागांची बैठक घेणार असून यासंदर्भात एक धडक कारवाई करणार आहोत. आवश्यकता असल्यास कडक कायदा केला जाईल."