फेसबुकच्या 'जगात' डोकावताना

    दिनांक  08-May-2019   


 

आजघडीला ‘फेसबुक’ ही जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट आहे. जगाचं जरा बाजूला ठेवू, फक्त भारताचा जरी विचार केल्यास, आज तब्बल ३० कोटी भारतीय फेसबुक वापरतात. आपल्या लोकसंख्येच्या मानाने, हा आकडा कमी वाटत असला, तरी या भारतातील या फेसबुक वापरकर्त्यांचा एक स्वतंत्र देश बनविल्यास, तो देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकाचा देश होऊ शकतो. याशिवाय फेसबुकच्या मार्च २०१९च्या आकडेवारीनुसार, जगभरातून १६ कोटी लोक फेसबुकचा दररोज वापर करतात. यामुळे फेसबुक आपल्या वापरकर्त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी नवनवीन बदल घडवत असतो. असेच काही बदल फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी ‘एफ-८’ या फेसबुकच्या वार्षिक तंत्रज्ञान परिषदेत नुकतेच जाहीर केले आहेत. याचवेळी त्यांनी फेसबुकची डिझाईन ‘एफबी-५’ प्रसिद्ध केली. या परिषदेमध्ये झालेल्या संवादानुसार, गोपनीयता, सुरक्षा आणि विश्वासार्हता या तीन मुद्द्यांवर फेसबुकने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर संभाषण आणि डेटाच्या गोपनीयतेसाठी व सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे झुकेरबर्ग यांनी सांगितले.

 

‘एफ-8’ या फेसबुकच्या वार्षिक परिषेदमध्ये ‘मेसेंजर’ या अ‍ॅपच्या रचनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मेसेंजरच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यावरदेखील थेट मेसेज करणे शक्य होणार आहे. इन्स्टाग्राम व फेसबुकप्रमाणे मेसेंजरवरही तुम्ही स्टोरीज शेअर करू शकता. महत्त्वाचा बदल म्हणजे, हे अ‍ॅप तुम्ही कॉम्प्युटरवरही वापरू शकणार आहात. या बदलामुळे फेसबुकचे मेसेंजर अ‍ॅप अधिक जलद व वापरण्यास सोपे होणार असल्याचा दावा फेसबुकने केला आहे. फेसबुकच्या या नव्या डिझाईनमध्ये इतर गोष्टींप्रमाणेच ‘न्यूज फीड’मध्येही आकर्षक बदल करण्यात येणार आहेत. या नव्या बदलात ग्रुप आणि इव्हेंट या दोन्ही फीचर्समध्येही मूलभूत बदल झालेले दिसतील. एखादा युझर ग्रुपमध्ये सहभागी झाल्यास त्याला ग्रुपच्या संदर्भातील सर्व ‘नोटिफिकेशन्स’ मिळणार आहेत. यासोबतच फेसबुक वापरकर्त्याला ग्रुप इंटरॅक्शनचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रुपमधील सदस्यांना विविध विषयांवर अधिकाधिक चर्चा करण्यास वाव मिळणार आहे, तर ‘इव्हेंट’ ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणवरील वापरकर्त्यांना अधिकाधिक केंद्रित करता येणे शक्य होणार आहे.

 

इतर ऑनलाईन डेटिंग अॅपप्रमाणे आता फेसबुकवरही डेटिंग करता येणे शक्य आहे. फेसबुकने या फीचरला ‘सिक्रेट क्रश’ असे नाव दिले आहे. सध्या या फीचरची चाचणी काही देशांमध्ये चालू असून आता १४ पेक्षा जास्त देशांमध्ये हे फीचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फीचरमध्ये तुम्हाला आवडणाऱ्या नऊ जणांची यादी करण्याची सोय करून देण्यात आली आहे. यानुसार तुम्ही तुमचे नऊ ‘सिक्रेट क्रश’ अ‍ॅड करू शकता. यानंतर नऊ जणांपैकी कोणी एकाने त्यांच्या ‘सिक्रेट क्रश’मध्ये तुमचे नाव टाकले, तर तुमचे ‘सिक्रेट क्रश’ मॅच होणार आहे; अन्यथा नऊ जणांच्या यादीपैकी जर कोणीच तुम्हाला ‘सिक्रेट क्रश’मध्ये अ‍ॅड केले नाही, तर तुमची यादी कोणालाच दिसणार नाही. यासोबतच ‘मीट न्यू फ्रेंड्स’ नावाचे फीचर फेसबुकने प्रसिद्ध केले आहे. यामुळे तुम्हाला नवीन मित्रांना किंवा अनोळखी व्यक्तींना शोधणे अधिक सोपे होणार आहे. हे फीचर फक्त ग्रुपसाठी असणार आहे. फेसबुकसोबतच इन्स्टाग्रामवरही फोटो शेअर करणे, त्यामुळे अधिक सोपे होणार आहे.

 

फेसबुक वापरकर्त्यांना फेसबुकवरील व्हिडिओ शोधणे आणि पाहणे अधिक सोपे होणार असल्याचा दावा फेसबुकच्या नवीन बदलांमध्ये करण्यात आला आहे. प्रामाणिकपणा, कन्टेन्ट आणि व्हिडिओ पाहण्याची वेळ या गोष्टींना समोर ठेऊन व्हिडिओ रँकिंग सिस्टिममध्ये बदल करण्यात आला आहे. वापरकर्त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच ही रँकिंग सिस्टिम काम करणार आहे. यासोबतच फेसबुक सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या व्हिडिओला बक्षीस देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी काही नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता हे बदल फेसबुकची लोकप्रियता व विश्वासार्हता वाढविण्यास कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat