अ‍ॅबे-किम भेटीची चर्चा

    दिनांक  03-May-2019   

कोरियन द्वीपकल्पापासून जवळपास एक हजार किमीच्या अंतरावर असणार्‍या जपानबरोबर द. कोरियाचे उत्तम संबंध आहेत, पण एकाधिकार, हुकूमशाहीने कायम बंदिस्त राहिलेल्या उ. कोरियाशी जपानचे संबंध कायमच तणावयुक्त राहिले. हेच संबंध आगामी काळात सुधारण्यासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे इच्छुक असल्याचे समजते.


आपल्या देशाचा बरावाईट इतिहास सहजासहजी विसरता येत नाही आणि तो तसा नेत्यांकडून, नागरिकांकडून विस्मरणातही जात नाही. कारण, एक राष्ट्रभावना सदैव त्या इतिहासातील चांगल्या घडामोडींतून प्रेरणा घेत वाटचाल करायचे बळ देते, तर इतिहासातील वाईट घडामोडींची पुनरावृत्ती भविष्यात होणार नाही, म्हणूनही इतिहासातील जुनी पाने चाळावीच लागतात. दोन राष्ट्रांच्या वर्तमान संबंधातही त्यांचे १८-१९व्या शतकातील युद्धकालीन समीकरण कसे राहिले, याचा आजही परिणाम पाहायला मिळतो. एकीकडे जपानसारखा देश, जो त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकणार्‍या अमेरिकेशी नजर लागावेत, इतपत संबंध सुधारतो आणि दुसरीकडे कोरियन द्वीपकल्पातील उत्तर कोरिया-द. कोरिया, ज्यांचे संबंध अद्याप पूर्ववत झालेले नाही. काहीशी तशीच स्थिती जपान आणि उ. कोरियाचीही पाहायला मिळते. दोन्ही देशांत आजही विस्तव जात नाही. कारण, उ. कोरिया आजही जपानी जखमा विसरलेला नाही.


१९१०
-१९४५ असा प्रदीर्घ काळ जपानने कोरियन द्वीपकल्पावर हुकूमत गाजवली. साहजिकच त्यावेळी उत्तर आणि दक्षिण असे कोरियाचे दोन तुकडेही झाले नव्हते. पण, अमेरिकेकडून झालेल्या जपानच्या पाडावानंतर कोरियाचा उत्तर भाग रशियाच्या अधिपत्याखाली आणि दक्षिण भाग अमेरिकेच्या वर्चस्वाखाली राहिला. त्यानंतरही उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या एकीकरणाचे आंतरराष्ट्रीय प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही. तसेच आगामी काळातही दोन्ही कोरिया आपापले सार्वभौमत्व, सामाजिक, राजकीय हेवेदावे बाजूला सारून एकत्र येतील, याची सुतराम शक्यता नाही. कोरियन द्वीपकल्पापासून जवळपास एक हजार किमीच्या अंतरावर असणार्‍या जपानबरोबर द. कोरियाचे उत्तम संबंध आहेत, पण एकाधिकार, हुकूमशाहीने कायम बंदिस्त राहिलेल्या उ. कोरियाशी जपानचे संबंध कायमच तणावयुक्त राहिले. हेच संबंध आगामी काळात सुधारण्यासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे इच्छुक असल्याचे समजते.

उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जाँग ऊनशी बिनशर्त चर्चा करण्याची तयारी अ‍ॅबे यांनी दर्शविली आहे
. पण, यावर अद्याप उ. कोरियाकडून जपानला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. किम जाँग ऊन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चेच्या दोन फेर्‍याही पार पडल्या. पण, त्याची परिणती उ. कोरियाच्या अण्वस्त्र प्रसारबंदी प्रक्रियेत झालेली नाहीच. त्याचबरोबर किम यांची नुकतीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेली भेटही चर्चेचा विषय ठरली. थोडक्यात, जो नेता आपल्या देशाबाहेर साधं पाऊलही ठेवत नव्हता, तो आता चर्चेसाठी आपल्या कोषातून बाहेर पडताना दिसतो. कारण, मार्शल मेकलुहान म्हणतो तसे, “हे जग आता वैश्विक खेड्यामध्ये रुपांतरित झाले आहे.” त्यामुळे कोणताही देश स्वयंपूर्ण नसून त्याला कोणत्या ना कोणत्या गरजांसाठी इतर देशावर अवलंबून राहण्याशिवाय तसा पर्यायही नाही. खासकरून उ. कोरिया, जिथे गरिबीने कळस गाठला आहे, नागरिकांना वीज, पाणी, इंटरनेटसारख्या सुविधाही सहज उपलब्ध नाहीत. म्हणूनच, जपानने उ. कोरियाकडे मदतीचा हात पुढे केला आहे. पण, हेकेखोर किमचा पूर्वानुभव पाहता, ही भेट कितपत जुळून येईल, याबाबत साशंकताच आहे.

१९व्या शतकाच्या पूर्वार्धात जेव्हा जपानने कोरियावर हुकूमत गाजवली, त्याबद्दल जपानने माफी मागावी आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी उ. कोरियाने केली. जपानने माफी मागितली खरी, पण नुकसानभरपाईच्या बदल्यात उ. कोरियाने आपल्या अण्वस्त्रांना लगाम घालावा, ही मागणी केली, जी साहजिकच उ. कोरियाने धुडकावून लावली. शिवाय, १९७७ ते १९८३ या काळात उ. कोरियाने जपानी नागरिकांचे अपहरण केले. उ. कोरियाच्या सैन्याला, गुप्तचरांना जपानी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी हा प्रकार केल्याचे नंतर उघडकीस आले. उ. कोरियाने आधी जपानचे हे दावे नाकारले आणि कालांतराने १३ पैकी ५ जपानी नागरिकांना सरकारच्या हवाली केले. उर्वरित जपानी नागरिकांनी चक्क आत्महत्या केल्याचे उ. कोरियाने सांगितले. यावरून दोन्ही देशांत अजूनही वाद आहेत. शिवाय, उ. कोरियाने दोनदा चाचणीसाठी वापरलेली मिसाईल्स जपानच्या भूमीवरून थेट प्रशांत महासागरात डागण्यात आली, ज्यावर जपानने तीव्र आक्षेप नोंदवला. जपानी व्यापार्‍यांचे जवळपास ५० दशलक्ष डॉलरचे कर्ज उ. कोरियाने बुडवल्याचेही प्रकरण आहेच. त्यामुळे दोन्ही देशांचे व्यापारी संबंधही फारसे चांगले नाहीत. त्यामुळे आगामी काळात किम-अ‍ॅबे भेट झाल्यास, पूर्व आशियामध्ये शांततेचे एक नवीन पर्व सुरू होऊ शकते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat