कासवांची ११ हजार पिल्ले समु्द्रात रवाना

    दिनांक  28-May-2019
सागरी कासव संवर्धन मोहिम ; वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश

 

मु्ंबई (अक्षय मांडवकर) : राज्याच्या कोकण किनारपट्टीवरून यंदा सागरी कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत ११ हजार २७३ कासवांची पिल्ले समुद्रात रवाना करण्यात आली आहेत. गेल्या दोन दशकापासून कोकणातील काही किनाऱ्यांवर वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने समुद्री कासवांची संवर्धन मोहिम राबविली जात आहे. यंदा सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात राज्यातील तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची १९६ घरटी आढळून आली असून त्यामध्ये १८ हजार ९७ अंडी सापडली आहेत. मात्र तापमानात झालेल्या चढ-उतारांमुळे त्यातील ३८ टक्के अंडी परिपक्व होऊ शकलेली नाहीत.
 

राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा किनाऱ्यांच्या समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. २००३ साली चिपळूणच्या 'सह्याद्री निसर्ग मित्र' या संस्थेने वन विभागाच्या सहकार्याने सागरी कासवांच्या संवर्धन मोहिमेला सुरूवात केली. आता संवधर्नाचे हे काम वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने पाहिले जाते. या अंतर्गत यंदा रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, मारळ आणि दिवेआगरचा किनारा मिळून एकूण १५ घरटी सापडल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. या तीन किनाऱ्यांप्रमाणे श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर देखील दरवर्षी सागरी कासवांची घरटी आढळतात. मात्र यंदा या किनाऱ्यावर एकही घरटे आढळले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात आढळेल्या १५ घरट्यांमध्ये एकूण १ हजार ५९० अंडी सापडली. त्यामधून बाहेर पडलेल्या १ हजार १३९ पिल्लांना सुखरूप समुद्रात सोडण्यात आले.

 

 
 

रत्नागिरी जिल्ह्यात कासवांची घरटी होणाऱ्या किनाऱ्यांची संख्या इतर दोन जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी कासवमित्रांना यंदा १४४ घरटी आढळून आली. त्यापैकी २१ घरट्यांचे 'इन-सेतू' म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने संवर्धन करण्यात आले. तर १२३ घरट्यांमधील अंडी हॅचरीत हलवून ती कृत्रिमरित्या संवर्धित करण्यात आली. या घरट्यांमध्ये १२ हजार ८९१ अंडी सापडली. त्यामधून बाहेर पडलेल्या ७ हजार २३० पिल्लांना समुद्राच्या दिशेने रवाना करण्यात आले. साधारण मार्च-एप्रिल महिन्यात तापमानात झालेल्या चढ-उताराचा सर्वाधिक फटका रत्नागिरीच्या किनाऱ्यांवरील अंड्यांच्या परिपक्वतेच्या प्रक्रियेला बसला आहे. येथील अंड्यांमधील केवळ ५० टक्के अंडी परिपक्व झाल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. यंदा तापमानातील चढ-उतरांमुळे अंडी उबण्याची प्रक्रिया त्यांच्या विहीत वेळेपेक्षा सहा ते सात दिवस पुढे गेल्याचे आंजर्लेचे कासवमित्र अभिनय केळस्कर यांनी सांगितले.


 
 

तापमान वाढल्यानंतर घरट्यामधील वाळूत आर्द्रता वाढते. महाराष्ट्रातील किनारे हे खाडीक्षेत्राजवळ असल्याने तेथील वाळूमध्ये आर्द्रता निर्माण होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे अभ्यासिका सुमेधा कोरगांवकर यांनी सांगितले. परिणामी घरट्यामधील वाळू कडक होते आणि त्यामध्ये पिल्ले अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण यंदा रत्नागिरीतील काही किनाऱ्यांवर नोंदिवल्याचे त्यांनी सांगितले. तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर, मोचेमाड, सागरतीर्थ, वायंगणी, मुणगे आणि तांबळडेग या किनाऱ्यांवर सागरी कासवांची घरटी आढळतात.यंदाच्या हंगामात या किनाऱ्यांवर मिळून ३७ घरटी आढळल्याची माहिती सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली. या घरट्यांमध्ये ३ हजार ६१६ अंडी सापडली. त्यामधून बाहेर पडलेल्या २,९०४ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.


यंदा समुद्राच्या दिशेने रवाना करण्यात आलेली पिल्ले ही, वन विभाग आणि स्थानिकांच्या वतीने सुरू असलेल्या संवर्धन मोहिमेचे यश आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असलेल्या या प्रजातींचे संवर्धन करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत. आता यावर संशोधन करण्याची गरज आहे. 'डब्लूआयआय' संस्थेच्या वतीने कांदळवन संरक्षण विभागाकडून समुद्री कासवांना सॅटलाईट टॅग लावून संशोधन करण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत. - एम.के.राव, अप्पर प्रधान मु्ख्य वनसंरक्षक, पश्चिम (वन्यजीव)

 

कासव विणीची प्रक्रिया

* किनाऱ्यावर वाळूत खड्डा तयार करून त्यामध्ये मादी आपली अंडी घालते.

* एक मादी कासव १०० ते १५० अंडी घालते.

* भरतीच्या पाण्यापासून अंडी सुरक्षित राहावी म्हणून हॅचरी बांधली जाते.

* हॅचरीमध्ये कृत्रिम घरटे तयार करून त्यामध्ये अंडी हलविली जातात.

* ४५ ते ५५ दिवसांमध्ये अंडी उबवून त्यामधून पिल्ले बाहेर पडतात.

 
 
 
 
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat