एकमेका साहाय्य करु...

    दिनांक  06-Mar-2019    

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांचं ’तुझं माझं जमेना, पण तुझ्यावाचून करमेना’ असचं काहीसं नातं. मुळात या दोघांचं ध्येय एकच, क्रिकेटचा प्रसार आणि या खेळातून कमाई. मात्र, बीसीसीआय हे आत्तापर्यंतचे जगातील सर्वात श्रीमंत मंडळ. त्यामुळे आयसीसी कोणत्या ना कोणत्या कारणाने, बीसीसीआयची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसते. म्हणजे अलीकडेच पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ बीसीसीआयने दहशतवाद पसरविणार्‍या देशांवर बहिष्कार टाका, या आशयाचे पत्र आयसीसीला लिहिले होते. मात्र, याचे खंडन करत पाकिस्तान विश्वचषकात खेळणारच, या मतावर आयसीसी ठाम राहिली. त्यातच सध्या या दोन्ही संस्थांमध्ये वाद आहे सुरू आहे, तो आगामी २०२१ मध्ये २० षटकांचे आणि २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या आयोजनावरून. बीसीसीआयने या दोन्ही विश्वचषक स्पर्धा भारतात व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले होते, त्यात त्यांना यशही आले. मात्र, या स्पर्धांसाठी भारत सरकारने करमाफी द्यावी, अशी मागणी आयसीसीने केली आणि ही करमाफी न दिल्यास बीसीसीआयला १५० कोटी रुपयांचा भुर्दंड भरावा लागेल, अशी धमकी दिली. मात्र, याला बीसीसीआय खतपाणी घालणार नाही, याची कल्पना आयसीसीला होती. त्यामुळे लागलीच त्यांनी करमाफी द्या, नाहीतर आम्ही या दोन्ही विश्वचषक स्पर्धा भारताबाहेर घेऊ, अशी अटही ठेवली. मात्र, याचाही काही विशेष परिणाम बीसीसीआयवर झाला नाही. कारण, करमाफीचा निर्णय हा सरकारचा असतो आणि भारत सरकारच्या कर नियमांमध्ये अशा क्रिकेट स्पर्धांना सवलत दिली जात नाही. एवढेच नाही तर, २०१६ ला भारतात झालेल्या विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठीही आयसीसीला सवलत मिळाली नव्हती. मात्र, आयसीसीने या स्पर्धेतून दुप्पट कमाई केली होती. त्यामुळे बीसीसीआयने,“स्पर्धा भारताबाहेर न्यायच्या असतील, तर खुशाल न्याव्यात. दोन्ही स्पर्धा भारतात झाल्यास आम्हाला आनंदच आहे. मात्र, आयसीसी दबाव टाकणार असेल तर बीसीसीआयही आयसीसीमधून आपला नफ्याचा हिस्सा मागे घेईल. मग कोणाला भुर्दंड सोसावा लागेल, ते कळेलच,” असे म्हणत आयसीसीची कोंडी केली. खरंतर, या दोघांच्या भांडणात लाभ तसं पाहायला गेलं तर कोणाचाच नाही. त्यामुळे सद्यस्थितीत एकमेकांना खरं तर साहाय्य करत, क्रिकेटचा विकास करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे या स्पर्धा भारताबाहेर झाल्या काय किंवा भारतात झाल्या काय, आयसीसी आणि बीसीसीआयने आपल्या मूळ ध्येयापासून हटू नये.


क्रिकेटचे पुनरागमन

 

साहेबांचा खेळम्हणून सर्वज्ञात असलेल्या क्रिकेटच्या निर्मितीचा विचार केला तर, गोल्फ खेळून कंटाळलेल्या काही ’साहेबांनी’ त्याच चेंडूंनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि या साहेबांच्या खेळाचा उदय झाला. या खेळाचा प्रसार सतराव्या दशकातच हळूहळू व्हायला सुरुवात झाली आणि भारतात हा खेळा पोहोचला तो अठराव्या दशकात. आणि आता हा खेळ भारताच्या अगदी गल्लीबोळातही खेळला जातो. अशा या क्रिकेटला आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. कारण, हँगझोऊ (चीन) येथे २०२२ मध्ये होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. ही क्रिकेटच्या प्रसारासाठी मोठी घोषणा होती. कारण, सन १९०० मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक सामन्यात क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या खेळाला जागतिक खेळाचा दर्जा मिळाला नाही. आशियाई स्पर्धा ही जगातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक मानली जाते. आतापर्यंत २०१०च्या ग्वांगझोऊ आणि २०१४च्या इन्चॉन ‘एशियाड’मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, भारताचा विचार केला, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबतीत नेहमीच अनुत्सुकता दर्शवली आहे. म्हणजे १९९८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी भारताने आपला दुय्यम संघ क्वालालंपूर येथे पाठवला होता. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सर्वात पहिले सुवर्णपदक शॉन पोलॅकच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. त्यानंतर २०१० आणि २०१४ मध्ये बीसीसीआयने आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाठविलेच नाही. त्यामुळे आशियाई ऑलिम्पिक परिषदेने बीसीसीआयवर ‘क्रिकेटचा व्यवसाय करणारे मंडळ’ असा ठपका बसवला. त्यामुळे केवळ आयपीएल आणि इतर सामने खेळून केवळ पैसा कमावण्यापेक्षा बीसीसीआयने आपला सर्वोत्तम संघ आशियाई सामन्यांसाठी पाठवावा, जेणेकरून विश्वचषकासोबत क्रिकेटमध्ये भारताला सुवर्णपदकही जिंकता येईल. क्रिकेटविश्वात दबदबा निर्माण करणारा संघ म्हणून भारतीय संघाची ओळख असली तरी, क्रिकेटच्या प्रसाराकरिता बीसीसीआय नेहमीच उदासीन राहिला आहे. त्यामुळे भारताने २०२२च्या आशियाई सामन्यात खेळावे कारण, विराटसेनेने भारतासाठी केलेली सुवर्णपदकाची कमाई ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat