इतरांना श्रीमंत बनविणारा उद्योजक

    दिनांक  26-Dec-2019 22:07:05   


santosh kamerkar_1 &डॉ. संतोष कामेरकर हे उद्योजकीय प्रशिक्षण क्षेत्रात गेली ३१ वर्षे कार्यरत आहेत. प्रशिक्षण देताना अनेकजण तुमचे पुस्तक आहे का, अशी विचारणा करायचे. यातूनच तीन पुस्तके साकारली. मला मोठ्ठे व्हायचे आहे- सात आवृत्त्यांचा खप, मला श्रीमंत व्हायचे आहे- तब्बल १ लाख, २० हजार प्रतींची विक्री, यशाची गुरुकिल्ली- ८० हजार प्रतींची विक्री, उद्योजक व्हा, श्रीमंत व्हा- २ हजार पुस्तकांची विक्री अशा विक्रमी पुस्तकांसह १४ पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत.“काय रे बाळा
, फणस कापा आहे की बरका...?” एका बाईंनी फणस विकणार्‍या सोळा वर्षांच्या संतोषला प्रश्न केला. “कापा/बरका म्हणजे तुम्हाला पिकलेला फणस पाहिजे का?” संतोषचा प्रतिप्रश्न. त्या बाईंनी दोन्हीतला फरक सांगितला. कापा फणस महागडा असतो हे त्याला उमगले. त्याने ताबडतोब कापा आणि बरका फणस वेगळे केले. वेगवेगळ्या किंमतीत विकले. पुढे दहा वर्षे हा व्यवसाय त्या-त्या मोसमात त्याने केला. पैसा कमावण्याचे तंत्र अवगत झाले. याच तंत्रामुळे संतोषचे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या उद्योगाचे उद्योजक डॉ. संतोष कामेरकर मध्ये रुपांतर झाले.संतोषचे बाबा वसंत सीताराम कामेरकर हे मुकुंद कंपनीत कामाला होते
. संतोष अवघा तीन वर्षांचा असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात संतोषचा आणि त्याच्या बहिणीचा सांभाळ संतोषच्या आईने, वनिता आक्काने मोठ्या हिंमतीने केला. त्याकाळच्या दहावी पास असलेल्या वनिता कामेरकर कुटुंबात मोठ्या म्हणून सगळेच त्यांना ‘आक्का’ म्हणत. आक्का, आपल्या दोन मुलांसह वांद्—याच्या भारत नगरमध्ये रहायला लागल्या. सोबत बहीण होती. पावसाळ्यात पावसाचं पाणी घरात घुसायचं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आक्काने दोन्ही मुलांना वाढवलं. संतोषचं चौथीपर्यंतचं शिक्षण गावी झालं. पुढे माध्यमिक शिक्षण वांद्र्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये झालं. दहावी झाल्यावर संतोषने सिद्धार्थ महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण त्याचवेळी आयटीआयमध्ये घड्याळ दुरुस्तीचा कोर्सदेखील केला. मित्रांचे, शेजार्‍यापाजार्‍यांचे घड्याळ तो दुरुस्त करू लागला. १९८७ मध्ये तो घड्याळ दुरुस्तीतून हजार-दीड हजार सहज कमावू लागला.१६ वर्षांचा असताना संतोषचा मामा कोकणातून आला
. सोबत ट्रकभरुन आंबे फणसाच्या पेट्या होत्या. वनिता आक्कासोबत त्याचं या पेट्या विकणारा कोणी भेटेल का, या अनुषंगाने चर्चा चालू होत्या. “मी विकू का आंबे-फणस?” हा काय विकणार आंबे-फणस, असा प्रश्न दोघांच्याही मनात आला. मात्र, संतोषचा कमालीचा आत्मविश्वास पाहून त्यांनी होकार दिला. संतोषने तीन दिवसांत ट्रकभरुन आंबे-फणस विकले. त्याचा आत्मविश्वास दुणावला. आता दर मोसमामध्ये कोकणात जाऊन आंबे-फणस मुंबईत आणून तो विकू लागला. निव्वळ तीन दिवसांत ५०-६० हजार रुपये कमावू लागला. दिवाळीत फटाके विकू लागला. सोबतच सकाळी गाड्या धुण्याची कामेसुद्धा तो करू लागला. हाताखाली त्याने त्यासाठी चार माणसे ठेवली. ती माणसे गाडी धुवायची. संतोष कोरड्या फडक्याने गाडी साफ करायचा. यानंतर दुधाची लाईन टाकायचा. त्यानंतर घरोघरी वर्तमानपत्रे टाकायचा. ५ वाजता गाडी धुणं, ६.३० वाजता घरोघरी दुधाची लाईन आणि ७.३० वाजता वर्तमानपत्राची लाईन आयुष्याचं हे असं रुटीन झालं होतं. याच कालावधीत शेजारच्या दाक्षिणात्य बाईने आपल्या मुलाला संतोषने गणित शिकवावं म्हणून विनंती केली. संतोषमुळे तो मुलगा पास झाला. पूर्ण वर्षभराचे शुल्क म्हणून बारा हजार रुपये त्यांनी दिले. त्यानंतर काही मुलांच्या संतोषने शिकवण्या घेतल्या. यातून त्याचा भिडस्तपणा गेला. शिकवण्याचा फायदा त्याला त्याच्या नोकरीत झाला.पदवी संपादन केल्यानंतर बहुस्तरीय विपणन कंपनीत त्यास नोकरी मिळाली
. तिथे कंपन्यातील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे काम त्याला मिळाले. लाख रुपये त्यातून तो कमवू लागला. १९९० मध्ये विपणन क्षेत्रातील १०० ते १५० नेतृत्व त्याने तयार केले. या आलेल्या पैशातून त्याने पनवेलला दोन एकर जागा घेतली. पुढे रेस्टॉरंट आणि मागे फार्म हाऊस सुरू केले. एक माळी काम करणारा माणूस ठेवला. खरंतर ही जागा म्हणजे २०-२५ फूट आकाराच्या प्रचंड मोठया खड्ड्यात होती. तब्बल एक हजार ट्रक भरून माती-दगडाचा भराव त्यात घालून जमीन समतल करून घेतली. कालांतराने चार एकर जागा घेतली. आज या ठिकाणी टुमदार रिसॉर्ट उभे आहे. सोशल मीडियाच्या पार्श्वभूमीवर खोल्यांची रचना केली आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, युट्यूब, पिंटरेस्ट या सोशल मीडियाच्या लोगोनुसार खोल्यांची सजावट मन मोहून घेते. इथले जेवण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे सुश्मिता सेन, अनुपम खेर ते अगदी मकरंद अनासपुरे, आदेश बांदेकर सारखे सेलिब्रिटी कलाकार येथे येऊन भोजनाचा आस्वाद घेऊन गेले आहेत.डॉ
. संतोष कामेरकर हे उद्योजकीय प्रशिक्षण क्षेत्रात गेली ३१ वर्षे कार्यरत आहेत. प्रशिक्षण देताना अनेकजण तुमचे पुस्तक आहे का, अशी विचारणा करायचे. यातूनच तीन पुस्तके साकारली. मला मोठ्ठे व्हायचे आहे- सात आवृत्त्यांचा खप, मला श्रीमंत व्हायचे आहे- तब्बल १ लाख, २० हजार प्रतींची विक्री, यशाची गुरुकिल्ली- ८० हजार प्रतींची विक्री, उद्योजक व्हा, श्रीमंत व्हा- २ हजार पुस्तकांची विक्री अशा विक्रमी पुस्तकांसह १४ पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. डॉ. शुभा अशोक चिटणीस यांनी कामेरकरांच्या जीवनप्रवासावर ‘लक्ष्यवेधी- अनुभवांचा प्रवास’ हे पुस्तक लिहिले आहे. पिनाक टिपणीस, किरण सोश्टे या तरुणांनी ‘संत्या’ नावाचा लघुपट तयार केला. कामेरकरांनी विविध विषयांवर ३,५०० हून अधिक व्याख्याने, मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन केलेले आहेत. प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्याच्या २२ बॅचेस त्यांनी पूर्ण केल्या आहेत. ‘ट्रेनर्स असोशिएशन ऑफ इंडिया’चे संस्थापक आहेत.या त्यांच्या प्रवासात त्यांच्या पत्नीने
, श्रद्धा कामेरकरांनी मोलाची साथ दिली. या दाम्पत्यांना साईली आणि सिद्धेश अशी दोन अपत्ये असून ‘साईली हॉटल मॅनेजमेंट’चा अभ्यासक्रम पूर्ण करून ‘हॉटेल लीला’मध्ये प्रशिक्षण घेत आहे. ‘सिद्धेश बिझनेस मॅनेजमेंट’ विषयामध्ये पदवीचा अभ्यास करत आहे. माणसे जोडण्याची कला, नम्रपणा, मनमिळाऊपणा या गुणांमुळेच डॉ. कामेरकर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोट्यवधी रुपयांचा उलाढाल असलेला व्यवसाय करू शकले. आपल्यासारखेच अनेक उद्योजक त्यांना घडवायचे आहेत. मातीत पैसा घालून त्यातून सोने उगविणारा असा हा उद्योजक आहे.