तिमिरातून तेजाकडे...

    दिनांक  04-Jan-2019   
 
 
 
 

म्हणतात ना, आयुष्याला कलाटणी देण्यासाठी एक प्रसंगच पुरेसा असतो. असेच काहीसे घडले ते भारतीय आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलपटू डेबोराह हेरॉल्डसोबत...

 

तुफानों को चीर के

मंजिलों को छीन ले

आशाएं खिले दिल की

उम्मीदें हसें दिल की

अब मुश्किल नहीं कुछ भी!

या काव्यपंक्ती आपल्याला प्रेरणा देतात, त्या वाचून अगदी प्रेरित झाल्यासारखं वाटतं, आशा-आकांक्षा पुन्हा पल्लवित होतात, पण खरंच आपण कधी वादळात अडकून, निसर्गाशी दोन हात करत, फक्त जगण्यासाठी झगडू का? कदाचित असा बाका प्रसंग ओढवला तर प्रयत्न नक्कीच करू. पण, वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिचं घर पुरात उद्ध्वस्त झालं. होत-नव्हतं सगळं वाहून गेलं. पण, तिने हार मानली नाही. पाच दिवस काहीही न खाता-पिता एका झाडावर जगण्यासाठी तिचा श्वास सुरुच होता. ही खरंतर एका सिनेमाची कहाणी वाटते ना? पण, खर्‍या आयुष्यात हे संकट बेतलं ते भारतीय आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलपटू डेबोराह हेरॉल्डवर... डेबोराहचा जन्म १७ जानेवारी, १९९५ साली निसर्गसौंदर्याने विनटलेल्या अंदमान-निकोबार बेटांवर झाला. तिचे वडील वायुसेनेत असल्यामुळे सतत फिरतीवर असणार्‍या डेबोराहचं शिक्षणही पोर्ट ब्लेअरला झालं. अगदी सामान्य आयुष्य जगणार्‍या डेबोराहच्या कुटुंबावर जी आपत्ती आली, त्या आपत्तीचे चांगले-वाईट दोन्ही परिणाम झाले.

 
२००४ साली पोर्ट ब्लेअर येथे आलेल्या त्सुनामीत सार्‍या बेटाने निसर्गाचे एक विद्रूप रूप पाहिले आणि त्याचीच एक साक्षीदार म्हणजे डेबोराह हेरॉल्ड. शाळेतून घरी येताना अचानक सगळीकडे पाणी भरल्याने डेबोराहची आई मुलांना सुरक्षित स्थळी नेत असताना डेबोराहचा हात सुटला आणि ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली आणि अवघ्या काही संकेदात अगदी दिसेनाशी झाली. वय वर्ष नऊ असलेल्या डेबोराहला पोहताही येत नव्हतं. त्यामुळे हात, पाय मारत कसेबसे तिचे जगण्यासाठीची केविलवाणी धडपड सुरू होती. तिने प्रसंगावधान दाखवत एका झाडाची फांदी पकडली आणि ती झाडावर चढली. काय करायचं, आपण जगणार की आपल्याला जलसमाधी मिळणार, असा कुठलाच विचार डेबोराहच्या मनात त्यावेळी डोकावला नाही. तिला फक्त आईला पाहायचं होतं. पाच दिवस...तब्बल पाच दिवस काहीही न खातापिता, संवेदनाहीन शरीरासह ती झाडावर निपचित बसून होती. पाच दिवसांनी पुराचे पाणी ओसरल्यानंतर पोलिसांनी डेबोराहचा शोध घेतला आणि तिची सुटका केली. खरं तर पुनर्जन्म कसा असतो, त्याचा साक्षात अनुभवच डेबोराहने घेतला आणि मनाशी पक्क ठरवलं की, मिळालेलं हे अनमोल आयुष्य सार्थकी लावायचं. शाळेत सर्व खेळात अव्वल असल्यामुळे डेबोराहलास्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया’कडून (एसएआय) मदत मिळाली. त्सुनामीत सारंच वाहून गेल्यामुळे घरची परिस्थितीही बेताची होती. त्यामुळे एसएआयच्या मदतीने डेबोराह दिल्लीला पोहोचली आणि तिचा खरा प्रवास सायकलच्या वेगाने सुरू झाला

अंदमानमधील बहुतांश रहिवासी बंगाली भाषिक असल्यामुळे डेबोराहला संभाषणात खूप अडथळे येऊ लागले. त्यामुळे तिच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली ती हिंदी शिकण्यापासून आणि नंतर डेबोराहने पेडलवर पाय ठेवले आणि ती थांबलीच नाही. तिच्या मते, ”त्सुनामीच्या वेळेस माझ्यासोबत जे घडलं त्या सगळ्या घटनेला मी सकारात्मकरित्या पाहिलं. या सगळ्यामुळेच मी खूप निर्भीड बनले.” २०१३ पासून डेबोराहने भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली. २०१३ साली तिने एकाच स्पर्धेत भाग घेतला, परंतु त्या स्पर्धेत तिला कोणतेही पदक जिंकता आले नाही आणि २०१४ मध्ये एका वेगळ्याच जोषात डेबोराह दिसली. हेरॉल्ड ट्रॅक आशियाई कपमध्ये ५०० मीटर सायकलिंग विभागात तिने दोन सुवर्णपदके भारताला कमवून दिली आणि मग त्यानंतर ती कधी थांबलीच नाही. भारताने पहिल्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली होती. त्यानंतर २०१५ या वर्षात डेबोराहने भारतासाठी एकूण आठ पदके जिंकली. त्यातील पाच तैवान कप ट्रॅकमध्ये, तर तीन ट्रॅक इंडियामध्ये. याबाबत डेबोराह म्हणते, ”सायकलिंग ट्रॅक माझ्यासाठी सर्व काही आहे, वेग हा माझा सोबती झाला आहे. तरीही माझे लक्ष्य ऑलिम्पिककडे आहे.” डेबोराह पहिली भारतीय खेळाडू आहे, जी आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियनमध्ये ५०० मीटर सायकलिंगमध्ये पहिल्या पाचमध्ये आली. २०१६ वर्षात आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियनमध्ये डेबोराह चौथ्या क्रमांकावर होती.

 
याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डेबोराह म्हणते की, ”भारतासाठी काहीतरी अभिमानास्पद करावे, हे आमच्या जणू रक्तातच आहे. बाबा वायुसेनेत असल्यामुळे अर्थात समर्पणाची भावना असायची. त्यामुळे ही भावना खूप छान आहे. आज मी अंदमानात गेल्यानंतर लोक मला ओळखतात. माझ्यासोबत फोटो काढतात. या सगळ्याचाही आनंद होतो.” सध्या डेबोराह टोकियो येथे होणार्‍या २०२०च्या ऑलिम्पिकची तयारी करीत आहे. २०१८ च्या आशियाई स्पर्धेत डेबोराहला विशेष यश लाभले नाही. त्यामुळे २०२० साल हे डेबोराहसाठी खास असणार आहे. कारण, तिचं आयुष्य मोठ्या पडद्यावर साकारणार आहे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस. “आयुष्यात खूप काही करायचं होतं, मिळालेल्या नवीन आयुष्याचं सार्थक करायचं होतं. ते माझ्या हातून होतंय. त्यामुळे हाच माझ्यासाठी खरा सुवर्णक्षण आहे,” असं म्हणत आयुष्याकडे सकारात्मक नजरेने आणि ‘तिमिरातूनी तेजाकडे’ कसे जावे, याचे डेबोराह उत्तम एक उदाहरण आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/