'तो' अजून संपलेला नाही...

    दिनांक  16-Jan-2019   

 

 
 
 
खेळाडूने निवृत्ती घ्यावी, त्याचा काळ संपला, आता नव्या पिढीला संधी द्यावी, हे असले फुकटचे सल्ले क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी अजिबात नवीन नाही. त्यात साहेबांचा खेळ म्हणजे क्रिकेट म्हटला की, यात मुळात प्रत्येक खेळाडूला वयाची एक आपसुक मर्यादा येतेच आणि एखाद्या खेळाडूने तिशी ओलांडली की त्याच्या कारकिर्दीला कधी पूर्णविराम लागतोय, याकडेच सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात. यातून ना सचिन सुटला ना गावस्कर. अशाच जाळ्यात सध्या अडकला होता तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. या आधी कसोटी सामन्यातून आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर, धोनीने एकदिवसीय आणि टी-२० खेळातले कर्णधारपदही सोडले आणि कर्णधारपदाची धुरा विरोट कोहलीने आपल्या समर्थ खांद्यावर घेतली. मात्र, त्यानंतरही धोनीने भारताला फलंदाज म्हणून अनेक सामने जिंकून दिले आणि यष्टीरक्षक म्हणून धोनीची जादू आजही कायम आहे. असं सगळं असताना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि टीकेचा धनी ठरला तो धोनी आणि दुसऱ्या सामन्यात हाच धोनी भारताच्या विजयाचा शिल्पकारही ठरला. या सामन्यात विराट कोहलीने शतकी तडाखा लावला, तर धोनीने अर्धशतक करत फिनिशरची भूमिका चोख बजावली. धोनी-कोहली जोडीने चौथ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. त्यामुळे धोनीने निवृत्ती घ्यावी, असं म्हणणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लागले असले, तरी धोनीचा मंदावलेला वेग हे चिंतेचे कारण नक्कीच आहे. यासंबंधी कर्णधार कोहलीने “धोनी अजून संपलेला नाही,” असं म्हणत काही दिवसांपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि लगेच त्याच्याकडून आक्रमक खेळीची अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे म्हणत त्याची पाठराखणही केली. दरम्यान, धोनीचा काहीसा मंदावलेला वेग हा एक विषय असला, तरी सध्या भारताची स्थिती पाहता धोनीची गरज भारतीय संघाला सर्वाधिक आहे, हेही नाकारुन चालणार नाही. कारण, २०१९ विश्वचषकापर्यंत भारत एकदिवसीय, टी-२० असे मिळून तब्बल २०-२५ सामने तरी खेळणार आहे. त्यामुळे एवढे सामने खेळण्यासाठी सशक्त खेळाडूंची तयार आणि अनुभवी फळी असणे कधीही सोयीस्कर. त्यातच यष्टीरक्षक म्हणून धोनीशिवाय दुसरा पर्याय आज तरी भारताकडे नाही आणि धोनीच्या अनुभवाची गरज विराट कोहलीला सर्वाधिक कामी येईल, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे धोनीचा स्ट्राईक रेट जास्त नसला तरी, धोनीची जागा घेणे कोणत्याही युवा खेळाडूला सध्या शक्य नाही. त्यामुळे धोनी अजून संपलेला नाही, याची छोटी झलक धोनीने टीकाकारांना नक्कीच दाखवली.
 

पराभव आणि राजीनामा सत्र

 

राजकारणानंतर क्रीडा क्षेत्रच अनपेक्षित निकालाचे क्षेत्र असावे आणि त्यानंतर सुरू होणारे राजीनामा सत्र, हे ना राजकारणातल्या लोकांसाठी नवखे आहे, ना क्रीडाक्षेत्रासाठी आणि त्यात नैतिक जबाबदारी वगैरे प्रकार आलेत. सध्या भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेल्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेला एक वेगळेच वळण आले. अगदी अनपेक्षितरित्या शेवटच्या मिनिटात भारताचा साखळी सामन्यात पराभव झाला आणि साखळी फेरीतच भारतीय संघाला आपला गाशा गुंडाळावा लागला. मात्र, त्यानंतर अपेक्षितरित्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि हा राजीनामा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) त्वरित स्वीकारलाही. खरंतर एका चांगल्या सुरुवातीनंतर भारताला पूर्व उपांत्य फेरीत पोहोचण्याची खूप चांगली संधी होती. मात्र, स्पर्धेतील अखेरच्या साखळी फेरीत बहारीनकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्याच्या शेवटच्या मिनिटात पेनल्टीवर गोल स्वीकारत १-० असा पराभव झाल्याने भारताला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागले. मात्र, भारत हा चषक जिंकेल, अशी अपेक्षा कोणाचीच नव्हती, पण भारताची सुरुवात पाहता, जिंकण्याच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या पराभवानंतर तब्बल चार वर्षे भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारलेल्या कॉन्स्टन्टाइन यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याची गरजही नव्हती. कारणस, कॉन्स्टन्टाइन यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) क्रमवारीत १७३ व्या क्रमांकावरून ९६ व्या स्थानी झेप घेतली होती. यापूर्वी २००२ ते २००५ दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या कॉन्स्टन्टाइन यांचा हा प्रशिक्षकपदाचा दुसरा कार्यकाळ होता. खरंतर भारतीय फुटबॉल महासंघाने कॉन्स्टन्टाइन यांची समजूत घालणे गरजेचे होते. कारण, कॉन्स्टन्टाइन यांच्या प्रशिक्षणामुळे भारत येत्या २०२० ऑलिम्पिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करू शकला असता. मात्र, कर्णधार सुनील छेत्री आणि संघातील काही वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीबद्दल व्यक्त केलेली नाराजी यामुळे कॉन्स्टन्टाइन यांची उचलबांगडी होणार, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, आता नवीन प्रशिक्षकाबद्दलची उत्सुकता जास्त वाढली आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/