शेवटी ईमान उतारला...

    दिनांक  12-Sep-2018   

 

 
 
 
 
कोकण आणि गणेशोत्सव यांच्यातलं नातं सांगायची तशी विशेष गरज नाहीच. पण, बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाप्पासह १२ आसनी विमानाचं आगमन झालं आणि कोकणवासीयांची परशुरामभूमीवर विमानदर्शनाची प्रतीक्षा एकदाची संपली. तब्बल नऊ वर्ष लागली, हा दिवस उजाडायला. कोकणाचं शांघाय करायचं, या स्वप्नात २००९ साली तत्कालीन पालकमंत्री व मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचा संकल्प सोडला आणि कोकणवासी नेहमीप्रमाणे या भोळ्या आशेनेच भारावून गेले. या विमानतळासाठी चिपी परुळे गावातील २७१ हेक्टर जमीन २००९ सालीच संपादित केली गेली. मात्र, कामाची संथ गती आणि वेळेसोबत या प्रकल्पाचा खर्चही वाढत गेला. ‘आयआरबी’ या बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीला ‘बांधा वापरा व हस्तांतरण करा’ या ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यासाठी करारही केले गेले. एमआयडीसीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प त्यावेळी १७५ कोटींचा होता. तो नंतर पोहोचला तब्बल 380 कोटींच्या घरात. पण, अखेर कोकणात ईमान उतारला. चेन्नईहून उड्डाण घेतलेल्या या विमानाने यशस्वी लँडिंग केले आणि कोकणवासीयांना जणू गणपतीचा प्रसादच मिळाला. आता गणेशोत्सवातच ही विमानाची चाचणी केसरकरांना का बरे करावीशी वाटली? अर्थातच श्रेयाचं राजकारण. २००९ साली नारायण राणेंनी या प्रकल्पासाठी जमीन संपादित करून दिली, पण विद्यमान गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला, म्हणजे पुन्हा केसरकर विरुद्ध राणे अशी स्पर्धा. म्हणूनच हा सगळा खटाटोप. मग, ही चाचणीच अनधिकृत आहे, असा कांगावा राणेंनी केला. पण, गेली नऊ वर्षे ज्या ‘ईमाना’ची कोकणवासीय गणपतीप्रमाणेच आतुरतेने वाट पाहत होती, त्यांना या श्रेयवादापेक्षा, या ‘ईमाना’चे जास्त कौतुक. सिंधुदुर्ग चिपी विमानतळ पर्यटनदृष्ट्या एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. कारण, कोकणाला पर्यटनासाठी पूरक बनविण्यासाठी गोवा राज्याच्या सातार्डा हद्दीपर्यंत रस्ता रुंदीकरण करून प्रवासी वाहतुकीस योग्य बनविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोवा फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी कोकण आता महत्त्वाचं ठिकाण बनणार आहे. म्हणजे, येणाऱ्या काही वर्षात या विमानतळामुळे कोकणच्या पर्यटनात तर वाढ होईलच, पण कोकण परिसरातल्या उद्योगधंद्यांनाही याचा फायदा होईल. मात्र, ही फक्त चाचणी असून सर्व परवानग्या मिळेपर्यंत २०१९ उजाडणार, हे नक्की. त्यामुळे किती वर्षात कोकणाचं शांघाय होतंय, हे येणारा काळच ठरवेल.
 

आता बाप्पाही अपडेटेड!

 

आपल्याला गरज होती, म्हणून तंत्रज्ञान आलं. याचा जेवढा उपयोग झाला, तेवढाच दुरुपयोगही झाला. पण, आता या तंत्रज्ञानाच्या छायेत बाप्पाही आले आहेत. गणेशोत्सव म्हटला की बऱ्याच गोष्टींची लगबग सुरू होते आणि त्यासाठी महिनाभर आधीच तयारीला सुरुवात होते. मग बाप्पांच्या मूर्तीचे बुकींग असो किंवा सजावटीच्या साहित्याची खरेदी. मात्र, सध्या हे सगळं मागे पडून बाप्पाही अपडेटेड झाला आहे. म्हणजे, मूर्तीच्या नोंदणीपासून सजावटीच्या साहित्याच्या खरेदीपर्यंत आणि मोदकांपासून भटजींपर्यंत साऱ्या गोष्टींची तयारी करायची धावपळ आता करावी लागत नाही. कारण, आता घरबसल्या गणेशाच्या आगमनाची तयारी करता येते. यासाठी विविध संकेतस्थळंही आहेत. बाजारात फुलांची खरेदी करायला जायची गरज नाही, आता घरपोच सजावटीचं सामान, मखर सगळं मिळतं. पण, याचा फटका बसला तो फुलविक्रेत्यांना. आता शासनाने प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर पैसे वाचवण्यासाठी लोकांनी यावर नवीन तोडगा काढला आणि कागदी म्हणजे ओरिगामी केलेली फुलं मागवली. यामुळे पैसा आणि वेळ दोघांची बचत झाली. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी फुलांचा खप कमी झालामात्र, तंत्रज्ञानाच्या जाळ्यात बाप्पाही अडकला आणि लोकांनी गणेशमूर्तीपासून पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यापर्यंत आणि भटजींपासून नैवेद्य तयार करणाऱ्यांपर्यंत सारेच संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिले.गणपतीत पूजेसाठी चार दुकानांत फिरण्यापेक्षा ‘माय पूजा बॉक्स’, ‘शुभकर्ता’ यांसारख्या संकेतस्थळांमुळे हे कामही सोप्पे झाले. गणपतीत सगळ्यात जात त्रास होतो, ते पूजेसाठी भटजी शोधणे. मग त्यासाठी ‘माय पंडित, घर का पंडित’ अशी संकेतस्थळही मदतीसाठी आली आणि आरत्या पाठ नसतील तर त्यासाठी युट्युब आहेच. या सगळ्यांमुळे गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी, यामुळे बऱ्याच लोकांच्या पोटावर पाय आला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी अख्ख कुटुंब जसं जबाबदाऱ्या वाटून अगदी झटून कामाला लागतं, ती मज्जा काही या ऑनलाईन बाप्पांच्या तयारीत नाहीच. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारपेठातील गर्दी काहीशी कमी झालेली दिसत असली तरी त्याचा फटका बसतो तो, छोट्या विक्रेत्यांना. त्यामुळे बाप्पा अपडेटेड झाला असला तरी त्यामागील भक्तांची भावना डिजिटल होऊन, त्यातील भक्तिभावच नाहीसा होत असेल, तर बाप्पा पावणार तरी कसा?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/