नया है यह!

    दिनांक  01-Aug-2018   प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही व्हॉट्सअ‍ॅपने होते आणि दिवसाचा शेवटही. व्हॉट्सअ‍ॅप बनविणारेही फार हुशार आहेत. माणसाच्या भावनांचा वापर करत ते नवनवे फीचर आणत असतात. आधी त्यांनी माणसाच्या भावना इमोजीच्या रूपात आणल्या, फ्री फोन कॉलची सुविधा आणली पण, सध्या चर्चेचे विषय बनलेत ते व्हॉट्सअ‍ॅपने जाहीर केलेले दोन बदल. याआधी व्हॉट्सअ‍ॅपने फेकन्यूजला आळा घालण्यासाठी, पाचपेक्षा जास्त लोकांना एक मजकूर पाठवू शकत नाही, असं जाहीर केलं आणि आता त्यांनी ग्रुप व्हिडिओ कॉलिंग हे नवीन फीचर सुरू केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपने याआधी ऑडिओ कॉलिंग फीचर सुरू केलं होतं. आता ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फीचर सुरू करत व्हॉट्सअ‍ॅपने एक पाऊल पुढे टाकलं आहे. आपल्या यूजर्सना काय हवंय, हे पाहून व्हॉट्सअ‍ॅप सतत नवनवे प्रयोग करत आलाय. जगभरातील आयओएस आणि अँड्रॉईड युजर्स या नव्या सुविधेचा वापर करू शकतात. नेहमीप्रमाणे याचा वापर करणं फार काही कठीण नसल्यामुळे घरातील सगळी मंडळी याचा मनसोक्त वापर करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून एकाच वेळी चार व्हॉट्सअ‍ॅप युजर्स व्हिडिओ चॅट करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी हायस्पीड इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे अगदी तुम्ही कुठेही असाल तरी ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करू शकता. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला आधी एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून, त्यानंतर आणखी दोघांना यात सामील करू शकता. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही एकाचवेळी चार लोकांशी बोलू शकता. जगातील जवळजवळ 150 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात आणि भारत यात आघाडीवर आहे. या फीचरमुळे तुम्ही लांबच्या नातेवाईकांशी मनमोकळ्या गप्पा मारू शकता. भारतीयांना या नवीन फीचरचा नक्कीच फायदा होईल, परदेशी असलेल्या नातेवाईकांशी होणारा संवाद आता एकाचवेळी होऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून बाहेरगावी असणाऱ्यांना सगळे सण, कार्यक्रम आपल्या कुटुंबासोबत डिजिटली साजरे करणं शक्य होणार आहे. आपलं महत्त्वाचं मार्केट म्हणून व्हॉट्सअ‍ॅप भारताकडं पाहतं. त्यामुळे त्यांची मानसिकता ओळखूनच हा बदल करण्यात आला असावा. हे फीचर किती काळ टिकेल, याची जरी शाश्वती नसली तरी त्याचा गैरवापर होता कामा नये, एवढी मात्र इच्छा आहे.

 

अंगाशी येणारे ट्रेंड...

 

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर बघाल तिथे ‘किकी चॅलेंज’ दिसेल. हे चॅलेंज म्हणजे जीवाचा खेळच आहे. काय तर लोक आपल्या जीवाची बाजी लावतात, चालत्या गाडीतून उतरून रोडवर नाचतात. हे सगळं करण्यामागचं कारण काय तर ‘किकी चॅलेंज’. हे चॅलेंज म्हणजे सगळ्यात आधी चालत्या गाडीतून खाली उतरायचं. मग हळूहळू चालणाऱ्या गाडीच्या दाराजवळ नाचायचं आणि काही सेकंदात पुन्हा त्या चालत्या गाडीत येऊन बसायचं. बरं हे सगळं शूट कोण करणार? तर, जी व्यक्ती गाडी चालवत असते तीच, म्हणजे अपघातांना आमंत्रण. हे चॅलेंज फक्त परदेशातच पसरलंय असं नाही तर भारतातही काही थोर लोक आहेत, ज्यांनी हे आव्हान स्वीकारलं तेही मुंबईच्या रस्त्यांवर. म्हणजे दुष्काळात तेरावा महिना! आधीच खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे, त्यात हे असे ट्रेंड. नेटिझन्सचा या चॅलेंजकडे वाढता कल पाहता पोलिसांनी देखील या चॅलेंजबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचललं. ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी हे आव्हान घेणाऱ्यांना खडे बोल सुनावले. “हे चॅलेंज म्हणजे फक्त तुमच्या जीवाला धोका आहे, असं नाही तर तुमच्या अशा वागण्यामुळे इतरांच्या जीवालाही धोका पोहोचू शकतो. लोकांना अशा प्रकारच्या चॅलेंजच्या माध्यमातून त्रास द्यायचं थांबवा. नाहीतर कारवाईसाठी तयार राहा,” असं ट्विट मुंबई पोलिसांना करावं लागलं. समाजमाध्यमांवर विविध ट्रेंड सुरू झाल्यानंतर कोणताही विचार न करता काहीजण या ट्रेंडमध्ये वाहत गेल्याचे दिसून येते आणि अशा वागण्यामुळे ते स्वतःसह अन्य नागरिकांचे प्राणही धोक्यात घालत आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांसमोर सुरक्षा आणि अपघात रोखण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. याची सुरुवात झाली ती महिन्याभरापूर्वी. शॅगी नावाच्या एका कॉमेडियनने याला सुरुवात केली आणि मूर्खासारखं लोकांनी या ट्रेंडमध्ये उडी मारली. ट्विटर, फेसबुक यासारख्या समाजमाध्यमांमुळे जग जोडले गेले, हे जरी खरं असलं तरी त्याचे दुष्परिणामही आहेत. भररस्त्यात अशा कृत्यांमुळे नेटिझन्स आपले प्राण धोक्यात घालतात. शिवाय रस्त्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहत आहे. किकी चॅलेंजनुसार आतापर्यंत अनेक अपघात झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे केवळ देशभरात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पोलिसांनी यावर बंदी घालत, ही नसती आव्हाने स्वीकारू नयेत, असं आवाहन केलं. आता या अंगाशी येणाऱ्या ट्रेंडमुळे पोलिसांचाही ताप वाढलाय.