मुसळधार पावसाने अंबरनाथला झोडपले

    05-Jul-2018
Total Views | 29



शिधावाटप कार्यालय, शाळा परिसर पाणीमय

अंबरनाथ : बुधवार रात्रीपासून कोसळणार्‍या पावसाने अंबरनाथला अक्षरश: झोडपून काढले. दुसर्‍या दिवशी म्हणजेच गुरुवारी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले, तर शिधावाटप नियंत्रण कार्यालय आणि त्याशेजारी असलेल्या एका शाळेत पावसाचे पाणी घुसल्याने नुकसान या दोन्हीचे झाल्याची घटना घडली.

 

बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरल्याने अंबरनाथच्या बी केबिन, शिवाजी चौक, रिलायन्स रेसिडेन्सी आदी परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने सकाळी कामावर जाणार्‍यांचे हाल झाले. मुसळधार पावसाने नाल्यांना पुराचे पाणी आल्याने मोरिवली पाड्यानजीक नाल्याचे पाणी रेल्वे मार्गावर आल्याने सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. कल्याण-बदलापूर रस्त्यावरील शिधावाटप नियंत्रण कार्यालयात पावसाचे पाणी शिरल्याने कार्यालयातील कागदपत्रांचे नुकसान झाले आहे. तसेच कार्यालयात सर्वत्र चिखल निर्माण झाल्याने कार्यालयीन कर्मचार्‍यांना काम करणे त्रासाचे झाले आहे. तसेच नागरिकांनादेखील कार्यालयात प्रवेश करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शिधावाटप नियंत्रण कार्यालयात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी अंबरनाथ तहसीलदार यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती शिधावाटप अधिकारी पी. एस. राठोड यांनी दिली आहे.

 

शिधावाटप कार्यालयाशेजारी असलेल्या शास्त्रीनगर हिंदी विद्यालयात देखील पावसाचे पाणी शिरल्याने सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. पावसाच्या पाण्याबरोबरच घाणीचे पाणी शाळेच्या आवारात आले होते, विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी खबरदारी घेतल्याची शाळेचे मुख्याध्यापक सतिश कोल्हे म्हणाले. याबाबत नगरपालिकेचे आपत्ती यंत्रणेला पाचारण करण्यात आल्याचेही कोल्हे म्हणाले. कल्याण-बदलापूर महामार्गावरील रस्ते सिमेंटचे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांची उंची वाढली असून शास्त्री विद्यालय आणि शिधावाटप नियंत्रण कार्यालय सखल भागात आल्याने दर पावसाळ्यात याठिकाणी पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पावसाने अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या सोमेवरील वसत या गावी पहाटे चारच्या सुमारास याठिकाणी घर कोसळल्याची घटना घडली.यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121