लोकसहभागाने वृक्षलागवड मोहिम यशस्वी होईल : पी. शिवशंकर

    दिनांक  02-Jul-2018

 
 
जिंतूर : वनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी वृक्षलागवड मोहिम राबविण्यात येत असून लोकसहभागामुळेच ही मोहिम यशस्वी होईल. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याची वाढ करावी असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केले. जिंतूर येथील नेमगिरी वनक्षेत्रात जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोर घेरडीकर, तहसिलदार सुरेश शेजुळे, विभागीय वन अधिकारी व्ही.एन.सातपुते, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) प्रेमानंद डोंगरे, अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
 
 
जिल्हाधिकारी म्हणाले, वृक्षारोपणातून वनराजी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी जलसंधारण कामे, बांध बंधिस्ती, चर, नाला खोलीकरण आदि केले जात आहे. पाणी व वृक्षराजीमुळे भविष्यात पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होईल. शेतीसाठी याचा फायदा मिळेल असे त्यांनी सांगितले. नेमगिरी परीसरात शेकडो एकर जमीनीवर वृक्ष लागवड करुन येथे पर्यटणाच्या दृष्टीने येथील डोंगर भाग, व तीर्थक्षेत्र याचा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपयोग होईल असे शिवशंकर यांनी यावेळी सांगितले.
 
 
जिल्ह्यात वनक्षेत्र अतिशय कमी आहे. १ टक्क्यापेक्षा कमी वनक्षेत्रामध्ये जिंतूर व गंगाखेड तालुक्यातील वनक्षेत्राचा समावेश होत असून विभागाच्यावतीने येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यात वाढ केली जात आहे. याचा परिणाम स्वरुप येथे वृक्षराजी वाढीस लागलेली दिसते आहे असे विभागीय वन अधिकारी व्ही.एन.सातपुते म्हणाले. दि.१ ते ३१ जुलै २०१८ या वृक्ष लागवड मोहिमेच्या कालावधीत जिल्ह्यात ३४ लाख वृक्षांचे रोपण केले जाणार आहे.