समाधान शिबीरातून जिल्ह्यातील १ लाख लोकांना लाभ मिळणार

    दिनांक  15-Feb-2018
 
 
 
 
 
 
परभणी: परभणी जिल्ह्यातील १ लाख लोकांना योजनांचा लाभ देण्याचे उद्दीष्ट समाधान शिबीराच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणेबरोबरच पदाधिकारी व नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
 
 
विस्तारीत समाधान शिबिराच्या पूर्व तयारीचा आढावा लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली पाथरी येथील नगरपरिषदेच्या महात्मा ज्योतीबा फुले मंगल कार्यालयात घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समाधान शिबिराच्या तयारीची माहिती देवून लोणीकर पुढे म्हणाले की, गोरगरीबांच्या जीवनमान उंचावण्याच्या शासनाच्या धोरणानूसार योजनांचा लाभ जनतेला देण्यासाठी शिबिर महत्वाचे आहे. सर्वसामान्य जनता समाधानी झाली पाहिजे यासाठी शासन पुढाकार घेत आहे. एक लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्धार असून गरीब कुटुंबाच्या घरात मोफत गॅस सिलेंडर व शेगडी देण्याची उज्वला योजना प्रभावी ठरली आहे. बचतगटाच्या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. बेघरांना घरकुल मिळत असल्यामुळे २०२२ पर्यंत एकही गरीब स्वत:च्या घराशिवाय राहणार नाही.
 
 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची व नैसर्गिक संकटाच्या काळात दिलेल्या सहाय्याची माहिती दिली. पिक विम्याची योजना सुधारीत करुन शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जात असल्याचे सांगून विविध योजनांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.