परभणीत छत्रपती शाहु महाराज जयंती उत्साहात साजरी

    दिनांक  27-Jun-2018

छत्रपती शाहु महाराज यांची जयंतीनिमित्त समता दिंडी


 
 
परभणी : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त काल परभणीत समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, परभणी यांच्यामार्फत सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणापर्यंत समता दिंडींचे आयोजन करण्यात आले होते. या समता दिंडीची सुरुवात अतिरिक्त जिल्हधिकारी आण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती एस.के. भोजणे, समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके व बार्टीचे जिल्हा प्रकल्प संचालक दि. फ.लोंढे उपस्थित होते. 
 
 
समता दिंडीसाठी कांचन त्र्यंबकराव कत्रुवार कर्णबधीर विद्यालय, माध्यमिक आश्रमशाळा, दर्गापारवा येथील विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवन चरित्रावर सजीव देखावा सादर केला. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस, सैनिकी शाळा व स्वा. सै. कै. रामराव कान्हेकर विद्यालय, परभणी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र मुळीक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई राठोड, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त टि.एल. माळवदकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. प्रा.राजेंद्र गोणारकर हे उपस्थित होते.
 
  
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र मुळीक यांनी आपल्या मनोगतात राजर्षी शाहु महाराज हे दृष्टे राज्यकर्ते असून त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक जागरुकता निर्माण करण्याबाबत संदेश दिला. त्यानंतर बार्टीचे प्रकल्प संचालक लोंढे यांनी आपल्या मनोगतात राजर्षी शाहु महाराज यांनी वसतिगृहाची निर्मिती केली असून त्यांना वसतिगृहाचे जनक असे संबोधले जाते,असे सांगून शाहू महाराजांनी स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय याबाबत उल्लेखनीय कार्य केल्याचे सांगितले.
 
 
त्यांनतर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी आपल्या व्याख्यानामध्ये शाहु महाराज यांचे शैक्षणिक व सामाजिक धोरण यावर प्रकाश टाकतांना शाहु महाराज हे दुरदृष्टीचा लोकराजा, रयतेचा राजा असल्याचे सांगून खऱ्या अर्थाने राजर्षी शाहु महाराज यांनीच सामाजिक लोकशाहीचा पाया रचल्याचे सांगितले. राजर्षी शाहू महाराजांनी अल्प आयुष्य लाभ असून आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक क्रांतीकारक निर्णय घेवून संस्थानामधील बहुजनांच्या उध्दाराचे कार्य केल्याचे सांगितले. त्यामध्ये संस्थानातील मुलांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण, जात निहाय वसतिगृहाची निर्मिती, शेती व उद्योगासाठी भरीव योगदान केल्याचे सांगितले.
 
 
सामाजिक न्यायाचे राजर्षी शाहू महाराजांची संकल्पना स्पष्ट करतांना परंपरागत रुढी पध्दती नष्ट करुन सर्व जाती धर्माच्या लोकांना उद्योग मिळावा या हेतूने त्यांनी पगारी तलाठी, कुलकर्णी इत्यादी पदे निर्माण करुन सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. तसेच आपल्या संस्थांनामध्ये १९०२ साली ५० टक्के आरक्षण लागू करुन सर्वांना समान संधी देण्याचे धोरण अवलंबविल्याचे सांगितले. तसेच राजर्षी शाहु महाराज फक्त बोलके समाज सुधारक नसून कर्ते समाजसुधारक असल्याचे सांगताना आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या बहिणीचा विवाह होळकर घराण्यात करुन त्यास चालना दिल्याचे सांगितले.