परभणीत आजपासून पाच दिवसीय कृषी महोत्सव

    दिनांक  21-Mar-2018
 

 
 
 
परभणी : महाराष्ट्र शासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा), परभणी या संस्थेमार्फत परभणी जिल्ह्यात दि.२१ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत ५ दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी व ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.
 
 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पी.जी. वसतिगृहाशेजारील मैदानावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा, शेतीमधील शेतकऱ्यांचे श्रम कमी करणारे कृषी यांत्रिकीकरणाचे दालन, शेतमाल प्रक्रिया यंत्र इत्यादीचा समावेश असून या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्यात येणार आहे. तसेच सद्य परिस्थितीत शेतीमध्ये उदभवलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
 
 
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित सेंद्रीय धान्य महोत्सव हा या कृषी महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकुण २४ सेंद्रीय गट, १२ शेतकरी उत्पादक कंपनी, इतर शेतकरी गट व वैयक्तिक शेतकऱ्यांचा ग्रेडींग व पॅकींग केलेला शेतमाल ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.
 
 
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार होण्यासाठी पाचही दिवस तज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने शेडनेट गृह तंत्रज्ञान व त्यामधील भाजीपाला, अन्न प्रक्रीया व उद्योग, किन्होवा लागवड, मधुमक्षिका पालन, काढणी पश्चात तंत्रज्ञान व हळद, हवामान बदलास अनुकूल शेती पध्दती, फळे, भाजीपाला निर्यांत संधी , पशुधन व्यवस्थापन, सेंद्रीय शेती व शाश्वत दुध व्यवसायाची दिशा या विषयावरील तज्ञांचे व्याख्याने परिसंवादामध्ये होणार आहेत.