पोलिसांनी दत्ता गाडेच्या मुसक्या कश्या आवळल्या? सर्च ॲापरेशन ते आरोपीच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम

    28-Feb-2025
Total Views | 34
 
datta gade arrest
 
 
पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानक. या गजबजलेल्या बस स्थानकात मंगळवारी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने महाराष्ट्राला हादरा बसला. घटना घडल्यानंतर जवळपास २४ तासानंतर ती उघडकीस आली. गेले ३ दिवस या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांना गुंगारा देत होता. घटनेनंतर जवळपास ६० तासानंतर पोलिसांना मिळालेले क्लूज, त्यानंतर आरोपीच्या मागावर असलेली अडीचशेहून अधिक पोलिसांची फौज, ५० हुन अधिक सीसीटिव्ही कॅमेरे, रात्रभर केलेला तपास, डॉग स्क्वाड, शिरुरच्या गुणाट गावातल्या नागरिकांचे शोधमोहिमेतील सहकार्य या सगळ्यामुळे पुणे पोलिसांच्या शोधकार्याला अखेर यश आलं. स्वारगेट बसस्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार होता. त्याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचे सर्च ॲापरेशन सुरु होतं. ड्रोनपासून ते डॉग स्क्वाड पर्यंत शक्य असलेल्या सगळ्या मार्गांचा अवलंब करून आरोपीला त्याच्या गुणाट गावाशेजारी असलेल्या शेतात एका खड्ड्यात लपलेल्या अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेतलं. मागच्या तीन दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी कशी अटक केली ? तो इतके दिवस पोलिसांपासून कसा पळत होता ? तपासाला कशी सुरुवात झाली? पोलिसांना कोणते महत्त्वाचे क्लूज मिळाले? त्यानंतर तपासाची चक्रं कशी फिरली? मध्यरात्री गुणाट गावात सुरु झालेलं सर्च ॲापरेशन ते आरोपीच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम कसा होता? याचाच आढावा घेऊया...
 
 
असा सुरु झाला तपास...
 
स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणाची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर दीड ते दोन तासाच्या आत वेगवेगळ्या पथकांद्वारे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्याचबरोबर घटनास्थळी उभी असलेल्या बसमधील पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून तिथून हलवण्यात आली. त्या बसमध्ये सापडलेल्या सगळ्या साहित्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पीडित तरुणीवर अतिप्रसंग केल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी १३ पथकं तैनात केली. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं. आरोपीची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरी चौकशी करण्यात आली. मात्र, तो घरी नसल्याचं दिसून आलं. त्याच्या मोबाईल लोकेशनचा तपास सुरू करण्यात आला. आरोपीने गेल्या काही दिवसांमध्ये फोन केलेल्या व्यक्तींकडेही चौकशी केली जात होती. आरोपीचा मोबाइल बंद झाल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या.
 
 
पोलिसांनी आरोपीच्या गावातच तळ ठोकला! 
 
पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी थेट शिरूरमधील त्याचे गाव गाठलं. आरोपी हा मुळचा शिरूरमधील गुणाट या गावचा. त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी या गावात लक्ष केंद्रीत केलं होतं. पोलिसांची ८ ते १० पथकं या गावात शोधमोहिमेसाठी तैनात करण्यात आली होती. पोलिसांना आरोपी दत्तात्रय गाडे हा उसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने कित्येक एकरांची उसाची शेती पिंजून काढली. गुरुवारी दिवसभर पोलीस दत्तात्रय गाडेचा शोध घेत होते.
 
 
आरोपीच्या नातेवाईकाकडून पोलिसांना मिळाली टीप
 
दरम्यान गुरुवारी रात्री साडे दहा वाजता पोलिसांना एक टीप मिळाली. महेश बहीरट या गावात राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरी आरोपी दत्तात्रय गाडे गेला होता. दोन दिवसांपासून पोलीसापासून पळत असल्याने तो तहानभूकेने व्याकूळ झाल्याने तो महेश यांच्या घरी गेला. तिथे त्याने जेवण मिळेल का अशी विचारणी केली, त्यावेळी आपल्याला या सगळ्याचा पश्चाताप होतोय. आपल्याकडून मोठी चूक घडलीय. आपल्याला सरेंडर व्हायचं आहे, त्यानंतर पाण्याची बाटली घेऊन तिथून निघून गेला. यानंतर लगेचच बहिरट कुटुंबियांनी पोलिसांना फोन करुन आरोपी दत्तात्रय गाडे त्यांच्या घरी येऊन गेल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरली. पोलिसांनी बहिरट यांच्या घराच्या आसपासच्या परिसराला वेढा देत तपास सुरु केला. या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने तसेच बिबट्यांचेही प्रमाण जास्त असल्याने तपासात अडचणी येत होत्या. अशातच पोलिसांना आरोपीने बदलेला शर्ट सापडला. डॉग स्क्वाडच्या साहाय्याने पोलिसांनी त्याचा माग काढायचा प्रयत्न केला. रात्री १ वाजण्याच्या सुमारास हे शोधकार्य सुरु होतं. त्याच्या शर्टवरुन डॉग स्क्वाडमधील श्वानाने घेतलेला शोधामुळे तपासाला दिशा मिळाली. मध्यरात्रीनंतरही पोलिसांचा ड्रोन संबंधित उसाच्या शेतावर फिरून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेताना दिसत होता. “ड्रोनने तुझ्यावर लक्ष ठेवलं आहे. तू ताबडतोब जिथे आहेस तिथून बाहेर येऊन पोलिसांना शरण ये. पोलीस तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत”, अशी घोषणा पोलिसांकडून सातत्याने ड्रोनच्या माध्यमातून केली जात होती. अखेर रात्री दिडच्या सुमारास पोलिसांना दत्ता गाडे एका कॅनॅालमध्ये लपलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांसह डॉग स्क्वाड आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं. तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपून राहिला. याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं.⁠
 
 
गावातील ग्रामस्थाचा आपण आरोपीला पकडून दिल्याचा दावा
 
गुणाट गावातील ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांनी आपण आरोपीला पकडून दिल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, "गेले तीन दिवस आरोपी गाडे याचा शोध पोलीस आणि गुणाट गावातले ग्रामस्थ घेत होते. रात्री १० वाजता आरोपीची चाहूल लागली होती. आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. आरोपीला ताब्यात घेतलं तेव्हा पोलिसांना फोन केला आणि पोलीस यंत्रणा तात्काळ आली. गावातले सर्वजण पोलिसांना मदत करत होतो. पोलिसांनी प्रत्येकाची विचारपूस केली होती. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये भीतीदायक वातावरण होतं. पोलिसांनी माझ्या भावाला मारलं, त्यामुळे आम्ही त्या रागातून आरोपीला शोधण्याच्या प्रयत्नात होतो. गुणाट गावात जीपीएल क्रिकेट सामने भरवले जातात, त्या चंदनवस्तीच्या भागात आरोपी फिरत होता. आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना मी त्याला पकडलं. त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं."
 
 
शोधमोहिमेचे नेतृत्व  करणाऱ्या डीसीपी निखिल पिंगळेंनी गावकऱ्यांचं केलं कौतुक
 
 
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार डीसीपी निखिल पिंगळे यांनीच या शोधमोहिमेचे नेतृत्व केले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “खरंतर गुणाट गावकऱ्यांना पोलिसांचा सॅल्यूट आहे. त्यांनी शोधमोहिमेत प्रचंड सहकार्य केले. त्यांच्या मदतीमुळे आरोपी हाताला लागला. मागचे २४ तास आरोपीला शोधत होतो, त्याच्यासाठी शोधमोहीम राबवली. अखेर रात्री आरोपी दत्ताला ताब्यात घेण्यात आम्हाला यश आले”.
 
 
पुणे पोलिस आयुक्तांकडून आरोपीसंदर्भात धक्कादायक खुलासा! 
 
 
दरम्यान यानंतर आरोपी दत्तात्रय गाडेसंदर्भात काही धक्कादायक खुलासे झालेयत. आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. दत्तात्रय गाडेच्या अटकेनंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत या घटनेच्या तपासाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, “प्राथमिक वैद्यकीय तपासणीनुसार, आरोपीच्या गळ्यावर काही वळ आहेत. यावरून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. पण दोरी तुटल्यामुळे आणि तिथे लोक पोहोचल्यामुळे ते होऊ शकले नाही. याबाबत तपास करण्यात येईल. परंतू, प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या गळ्यावर काही वळ दिसतायत," अशी माहिती त्यांनी दिली.
 
फास्ट ट्रॅकवर खटला चालवणार!
  
आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक, स्वारगेट पोलिस स्टेशन आणि झोन २ चे वेगवेगळे पथक असे मिळून अंदाजे ५०० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मागच्या तीन दिवसांपासून आरोपीच्या मागावर होते. विशेषत: या ऑपरेशनमध्ये गुनाट गावातील ४०० ते ५०० लोकांचे आम्हाला भरपूर सहकार्य मिळाले. तसेच डॉग स्पॉट आणि ड्रोन कॅमेऱ्याचीसुद्धा यात मदत झाली. या सर्व प्रयत्नानंतर काल रात्री १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून सर्व दिशेने पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निर्जन स्थळे, एसटी स्थानके, रेल्वे स्टेशन बाहेरील परिसर, हॉट स्पॉट, टेकडीची ठिकाणे या सर्व परिसरांचे सुरक्षा ऑडिट करणे सुरु आहे, तसेच आरोपी दत्तात्रय गाडेला अटकेनंतर पुण्याच्या लष्कर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले असून लवकरच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याचे पुणे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे." असे त्यांनी सांगितले.
 
 
आरोपीकडून बलात्काराच्या आरोपांचे खंडन
 
 
मात्र, अटकेनंतर आरोपीने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. आरोपीने बलात्काराच्या आरोपांचे खंडन करत संबंध सहमतीने झाले असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. अटक झाल्यानंतर आरोपी दत्ता गाडे याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान “माझं चुकलंय, असं म्हणत त्याने पश्चात्ताप व्यक्त केला. यावेळी त्याने आपण गुन्हेगार असल्याचं कबूल केलं, मात्र, त्याने तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप फेटाळून लावत आपण अत्याचार केलेला नाही, आमचे संबंध सहमतीने झाले होते, असा दावा केला आहे. यामुळे या प्रकरणाला नवे  वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पुढे या प्रकरणात काय होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121