"मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्यांचा..."; मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला

    26-Jun-2025
Total Views | 30


मुंबई : मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकारांचा उपयोग करा, असा खोचक सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. गुरुवार, २६ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक झाली असून विविध आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच उद्धव ठाकरेंनीही यावरून टीका केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकारांचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगले होईल. पेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही. कारण हिंदी सक्ती नाहीच. मराठी सक्ती आहे आणि हिंदी पर्यायी आहे," असे ते म्हणाले.


...तर आतातरी ते निवडणूकीवर बोलणार नाहीत!

"राहुल गांधींचा देशाच्या संविधानावर, लोकशाहीवर आणि न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आतातरी ते महाराष्ट्राच्या निवडणूकीच्या विषयात बोलणार नाहीत. कारण काल उच्च न्यायालयाने अतिशय विस्तृत निकाल दिला असून पुराव्यांसहित या निवडणूकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचे काम केले आहे. त्यामुळे यानंतरही जर झोपेचं सोंग घेऊन झोपल्यासारखे करतील तर ये पब्लिक है, ये सब जानती है," अशी टीकाही त्यांनी राहुल गांधींवर केली.

बबनराव लोणीकरांचे विधान चुकीचे!

"बबनराव लोणीकरांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी काही लोकांना उद्देशून हे विधान केले असले तरी असे विधान करण्याचा कुणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान मी प्रधान सेवक आहे, असे सांगतात. आम्ही सगळे जनतेचे सेवक असताना आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे असून असे वक्तव्य करणे योग्य नाही अशी समज त्यांना देण्यात येईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121