हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा! राज ठाकरेंची घोषणा; सर्व पक्षांना आवाहन करणार

    26-Jun-2025
Total Views |


मुंबई : हिंदी सक्तीच्या विरोधात येत्या ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. शनिवार ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा काढण्यात येणार असून सर्व पक्षांना यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, "पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही. त्याविरोधात येत्या ५ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती होऊ देणार नाही म्हणजे नाही," असे ते म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, "सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. यानिमित्ताने कोण कोण मोर्चात सहभागी होतो आणि कोण नाही हे मला बघायचे आहे. मराठी माणसाच्या दृष्टीकोणातून ही अत्यंत महत्वाची लढाई असून या लढाईत संपूर्ण महाराष्ट्राने उतरावे," असे आवाहन त्यांनी केले.

तसेच या मोर्चात शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.