शक्तीपीठ महामार्गाने दुष्काळी पट्ट्याचे चित्र बदलणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
26-Jun-2025
Total Views | 14
मुंबई : मराठवाडा आणि दुष्काळी पट्ट्याचे चित्र बदलायचे असल्यास शक्तीपीठ महामार्ग हे त्याचे उत्तर आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गुरुवार, २६ जून रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काही लोकांना प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सवय आहे. त्यांनी समृद्धी महामार्गालासुद्धा असाच विरोध केला होता. पण आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचे चित्र बदलले आहे. विशेषत: मराठवाडा आणि दुष्काळी पट्ट्याचे चित्र बदलायचे असल्यास शक्तीपीठ महामार्ग हे त्याचे उत्तर आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या संपूर्ण भागात प्रत्येक १०० किलोमीटमध्ये ५०० ते १००० शेततळी आम्ही तयार करणार आहोत. या महामार्गावरून जेवढे नाले क्रॉस होतात तिथे बंधारे बांधून पाणी अडवणार आहोत. त्यामुळे दुष्काळी भागात जलसंवर्धनसाठी आणि जलपुर्नभरणासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. यासोबतच आम्ही मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी तयार करणार आहोत. मराठवाड्याचे आणि दुष्काळी भागाचे चित्र पूर्णपणे बदलणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "वित्त विभागाने कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. ज्यावेळी एक महामार्ग बनतो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेची दालने उघडतो. आपण जेव्हा पायाभूत सुविधेत १२ हजार कोटींची गुंतवणूक करतो तेव्हा त्यातील परतावा १२ हजार कोटींपेक्षा कितीतरी जास्त असतो. आपल्या अर्थव्यवस्थेला तो विस्तारित करतो आणि ते कर्ज परत करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमता तो निर्माण करतो. म्हणूनच जगातील सगळे देश कर्जातूनच पायाभूत सुविधा तयार करतात. कारण अर्थव्यवस्थेचा हा नियम आहे की, पायाभूत सुविधेवर कर्ज घेतले तर ते उत्तम कर्ज मानले जाते. त्यातून अर्थव्यवस्था बळकट होऊन रोजगार निर्माण होतात."
लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो!
"कुठल्याही प्रकल्पाला काही लोक विरोध करतात. पण बहुतांश लोक शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात आहेत. वाढवण बंदराची जनसुनावणी झाली तेव्हा ५० हजार लोकांनी सह्या देऊन या बंदराला मान्यता दिली. मीसुद्धा विरोध करणाऱ्यांची संख्या पाहिली. फार कमी लोक आहेत. कुणाच्या संख्येवरून आम्ही मुल्यमापन करत नाही. पण याला कुणाचा विरोध असल्यास तो का आहे ते आम्ही समजून घेऊ आणि त्यांचे समाधान करू. लोकशाहीमध्ये सगळ्यांचे समाधान करायचे असते. पण लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो आणि बहुमत हे वाढवण बंदराच्या आणि शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.