राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होणार? काय म्हणाले शरद पवार?
26-Jun-2025
Total Views |
मुंबई : येत्या ५ जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व पक्षांना आवाहन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, "माझ्यामते प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करु नये. पाचवीनंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही. देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो. त्यामुळे हिंदीला एकदमच साईडचे समजण्याचे कारण नाही. पण लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये तो किती भाषा आत्मसात करू शकेल, त्याच्यावर किती भाषेचे लोड टाकावे, याचा विचार करावा लागेल. तो लोड टाकला आणि मातृभाषा बाजूला पडली तर हे योग्य नाही. त्यामुळे पाचवी पर्यंतच्या हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा. मातृभाषा हीच महत्वाची असली पाहिजे. त्यानंतर काय करायचे याबद्दल कुटुंबातील लोक निर्णय घेतील," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "ठाकरे बंधू जे बोलतात त्यांचे स्टेटमेंट काही चुकीचे नाही. कोणत्या स्टेजला हिंदी हवी आणि नको या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील मराठी भाषिक एकत्र येण्याची भूमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. मोर्चाबाबत मला कोणी सांगितलेले नाही. हा विषय कुणी एकटा राजकीय पक्ष सामुहिक निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही अन्य पक्षांशी बोलणार आहोत, असे त्यांनी सांगितले असल्याने त्यांना बोलू द्या. ते बोलल्यानंतर आम्ही चर्चा करू. पण आमचा दृष्टिकोन निगेटिव्ह नाही," असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.