सचिन वाझेला कुणाचा आशिर्वाद हे देशाला माहितीये! सर्वांची चौकशी करा
प्रसाद लाड यांची मागणी
03-Aug-2024
Total Views | 100
मुंबई : सचिन वाझेला पुन्हा नोकरीत कुणी घेतलं, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपानंतर सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे.
प्रसाद लाड म्हणाले की, "सचिन वाझेंनी केलेला आरोप हा अतिशय गंभीर आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता, ते आरोप आता सचिन वाझेने पुन्हा एकदा केले आहेत. १०० कोटींची वसूली, मनसुख हिरेनची हत्या अन् उद्योगपती अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्याचं काम सचिन वाझेने केलं होतं. त्याला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद होता."
"सचिन वाझेसारख्या गुन्हेगाराला जून २०२० मध्ये पुन्हा नोकरीत कोणी सामावून घेतलं? वाझेला कोणाचा आशीर्वाद होता? हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यामुळे आज सचिन वाझेने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. वेळप्रसंगी अनिल देशमुखांचा जामीन रद्द करून त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे.