"हिंदूंना हिंसक म्हणणारे राहुल गांधी ठाकरेंना चालतात, पण..."; बावनकुळेंचा हल्लाबोल
03-Aug-2024
Total Views |
मुंबई : उद्धव ठाकरेंना हिंदूंना हिंसक म्हणणारे राहुल गांधी चालतात, पण ३७० कलम रद्द करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे मोदीजी चालत नाहीत, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांनी वर्धा येथे माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचे विचार आणि स्वरूप स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी ती भाषा आली असून त्यांनी राजकारणाची खालची पातळी गाठली आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांच्याबद्दल बोललेलं महाराष्ट्रातील जनता सहन करणार नसून उद्धव ठाकरे यांना चांगलाच धडा शिकवेल. उद्धव ठाकरेंसोबत बसणारे राहुल गांधी हिंदूंना हिसंक म्हणतात. या भूमिकेवर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यायला हवं," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण, वीज बिल माफी व इतर लोककल्याणाच्या योजना बंद पाडल्या जातील. २०४७ पर्यंत भारतात भाजपचे सरकार सत्तेत राहणार आहे. आम्ही विरोधकांचा खोटारडेपणा उघड पाडू," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच भाजपमध्ये उमेदवारीसाठी महिलांना प्राधान्य असून सर्वाधिक महिला लोकप्रतिनिधी भाजपामध्येच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले असून ते २०२९ पासून लागू होईल. परंतू, आम्ही आतापासूनच महिलांना प्राधान्य देत आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.