नागपूर : उद्धवजींच्या डोक्यावरचा ताबा सुटला असून ते अत्यंत नैराश्यात आहेत, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. शनिवारी पुण्यात उबाठा गटाकडून ‘शिवसंकल्प’ मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "उद्धवजींच्या डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे. ते अत्यंत नैराश्यात आहेत. यातून ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत यावर काय उत्तर देणार? त्यामुळे अशा प्रकारे नैराश्यात असलेला व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलतो. त्याला उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करून आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं आहे," असे ते म्हणाले.
सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. मी माध्यमांमध्ये या बातम्या पाहिल्या असून गेले दोन दिवस नागपूरमध्ये असल्याने मला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण जे काही समोर येत आहे, त्याबाबत आम्ही योग्य ती चौकशी करू, असेही ते म्हणाले.