पश्चिम आशियातील उद्रेक आणि अरबांची स्थिती

    02-Aug-2024
Total Views | 207
Israel, Lebanon On Brink Of All-Out War
इराणच्या या हल्ल्यात प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलला ज्या माहिती सर्वेक्षण-टेहळणी-सर्व्हेलन्स-रिकॉनायसन्स यंत्रणांचे सहकार्य मिळाले, त्यात शेजारी अरब देशांच्या वरील यंत्रणासुद्धा होत्या. लक्षात घ्या. शिया मुसलमान इराण इस्रायलला नष्ट करण्यासाठी सज्ज झालाय आणि एकेकाळचे इस्रायलचे हाडवैरी सुन्नी मुसलमान अरब देश इस्रायलला सहकार्य करतायत.
 
 
सोबतचा नकाशा पाहा. पटकन डोळ्यांत भरणारे देश आहेत सौदी अरेबिया, इराण, तुर्कस्तान आणि इराक. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा घसघशीत मोठा आकार. पण, नुसत्या आकारावर जाऊ नका. सौदी, इराक आणि इराण यांच्या तावडीत सापडल्यासारखे दिसणारे ते कुवेत, बहारीन, कतार आणि संयुक्त अरब अमिरानी हे देशही लक्षपूर्वक पाहा. संपूर्ण जगातला सर्वात मोठा तेलउपसा इथून होत असतो आणि तेल हे आधुनिक जगातले ‘काळे सोने’ म्हणून मान्यता पावलेले आहे. सौदी अरेबियाच्या वायव्येला आणि इराकच्या पश्चिमेला ते पाहा सीरिया आणि जॉर्डन हे देश. त्यांच्याही पश्चिमेला भूमध्य समुद्राच्या काठावर अगदी किरकोळ भूमी व्यापून राहिलेले दिसतायत लेबेनॉन आणि इस्रायल हे देश. यांच्या नैऋत्येला आहेत इजिप्त आणि सुदान.
 
परवा दि. ३० जुलैला इस्रायलने लेबेनॉनची राजधानी असलेल्या बैरुत शहरात एका हवाई हल्ल्यात फौद शुक्र या इसमाला ठार केले आहे. इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना ‘हेझबोल्लाने मर्यादा ओलांडली होती,’ असे भाष्य केले आहे. ‘हेझबोल्ला’चे अतिरेकी अजून बैरूतमधल्या इमारतींचा राडारोडा साफ करून फौद शुक्रसह आणखी किती माणसे ठार झाली, याचा हिशेब लावत आहेत. तोवर इस्रायलने बैरुतच्या भेट विरुद्ध दिशेला असलेल्या इराणी राजधानी तेहरानवर हवाई हल्ला करून ’हमास’चा कमांडर इस्माईल हानिया याला ठार केले आहे. हा मजकूर लिहिला जात असेतोपर्यंत इस्रायलने या दुसर्‍या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. आता हा मजकूर तुमच्या वाचनात येईपर्यंत आणखी काय घडलेले असेल, हे सांगता येत नाही. कारण, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे या घटनेमुळे भयंकर संतप्त झालेले असून ‘आमच्या पाहुण्याला आमच्या राजधानीत ठार मारण्यात आले आहे; याचा सूड घेणे हे आमचे कर्तव्यच आहे. इस्रायलने कठोर शिक्षा ओढवून घेतली आहे,’ असे भाष्य यांनी केले आहे.
 
 
हे सगळे प्रकरण नीट समजावून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा नकाशावर नजर टाकूया. इराण हा देश मुसलमान धर्मानुयायी असला, तरी तो शियापंथीय आहे. भाषा आणि संस्कृती या क्षेत्रांत आपण अरबांपेक्षा श्रेष्ठ आहोत, हे इराणी लोकांना पक्के माहित आहे. मानववंशशास्त्रीयदृष्ट्यादेखील आपण वेगळे आहोत किंवा आपण आर्यवंशीय आहोत, असा इराणी लोकांचा दावा आहे. पूर्वी इराणला ‘पर्शिया’ असे नाव होते. १९३५ साली इराणच्या शहाने ते बदलून ‘इराण’ असे केले. ‘इराण’ या शब्दाचा जुन्या पर्शियन-फारसी भाषेतला अर्थच मुळी ‘आर्यांची भूमी’ असा आहे. म्हणजेच धर्माने मुसलमान असले, तरी पंथ आणि वंश वेगळा असल्यामुळे इराणी लोक अरबांना हलके लेखतात. आता इराणच्या वायव्येला असलेला तुर्कस्तान किंवा टर्की देश पाहा. मुळात या देशात ग्रीक लोक राहत होते आणि देशाचे नाव होते अनातोलिया. इराणच्या ईशान्येला जे तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान इत्यादी देश दिसतायत, तिथल्या तुर्क वंशीय टोळ्या, अरबांचे सरदार, सुभेदार, सेनापती या नावाने अनातोलियात स्थलांतरित होत गेले. त्यांनी ग्रीकांना हाकलून दिले आणि अनातोलियाचे ‘टर्की’ करून टाकले. तुर्क हे तर अरबांपेक्षाही असंस्कृत आणि रांगडे होते. सबब इराणी लोक यांनाही मोजत नाहीत.
 
बरे, आता अरब हे सुन्नी मुसलमान आणि तुर्कही सुन्नी मुसलमान. मग त्यांचे तरी सख्य होते का? नाव नको! एवढेच कशाला, सौदी अरेबिया, इराक, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, यमन (येमेन), उमान (ओमान), सीरिया, जॉर्डन, लेबेनॉन, इजिप्त, सुदान आणि लीबिया हे तर सगळे अरब देश आहेत. त्यांचे तरी आपसात सख्य आहे का? नाव नको! हे सगळे देश म्हणजे वेगवेगळ्या अरब टोळीवालांची राज्ये किंवा अरब सुलतानांच्या सल्तनती होत्या. आधुनिक काळात त्यांची राष्ट्रे झाली. पण, मूळची सल्तनतींमधल्या वैराची मानसिकता कायमच आहे. आणि अशा अवस्थेत त्यांच्या अगदी कुशीतच इस्रायल हे ज्यूधर्मीय लोकांचे राष्ट्र पाश्चिमात्य देशांच्या आशीर्वादाने जन्माला आले. मे १९४८ मध्ये इस्रायल राष्ट्र निर्माण झाल्या झाल्याच ते नष्ट करण्याचा प्रयत्न सर्व अरब देशांनी मिळून केला. त्यात त्यांनी सणसणीत मार खाल्ला. अरबांच्या या एकीकरण प्रयत्नात इजिप्तचे राजे फारूक यांचा मोठाच पुढाकार होता.
 
 
१९४८ ते १९७८ अशी ३० वर्षे इजिप्तचे फारूक मोहम्मद नजीब, गमाल अब्दल नासर आणि अन्वर सादत असे सत्ताधीश अरबांचे एकत्रीकरण करून, पुढाकार घेउन इस्रायलला नष्ट करण्याचा प्रयत्न करत राहिले. दरवेळी मार खात राहिले. शेवटी अन्वर सादत यांनी शहाणपणा दाखवून इस्रायलशी शांतता करार केला आणि निष्फळ युद्धातून इजिप्तला बाजूला काढले.
समोरासमोर युद्ध करून इस्रायलचा नाश करता येत नाही, म्हटल्यावर १९७० सालापासून पुढच्या काळात अरबांच्या अनेक अतिरेकी संघटना निघाल्या. यासर अराफात या नेत्याची ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ - ‘पीएलओ’ ही त्यातली एक प्रमुख संघटना. असंख्य घातपाती घटना, विमान अपहरणे, १९७२ सालचा म्युनिक ऑलिम्पिक स्पर्धांवर अतिरेकी हल्ला इत्यादी कारवायांना त्यांनी जगभर खळबळ उडवून दिली. परंतु, यातून इस्रायल नष्ट करणे, हे उद्दिष्ट साध्य झाले नाही. उलट, जगभर सर्वत्र अरबांबद्दल नाराजीच निर्माण झाली. मात्र, उघडपणे कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. कारण, अरबांकडचे ‘काळे सोने’ सर्वांनाच हवे होते.
 
 
पॅलेस्टाईनी अरब जगभर अतिरेकी हैदोस घालत असताना सौदी अरेबिया हा सर्वात मोठा अरब देश आणि इस्लामची जन्मभूमी मात्र अमेरिकेच्या मित्रगटात होती. सौदी सत्ताधार्‍यांना इस्रायलला उखडून काढण्यापेक्षा आपल्या देशाचा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातला विकास जास्त पसंत होत आणि त्यासाठी अमेरिका हाच सर्वोत्कृष्ट मित्र होता. तुर्कस्तान हा या सगळ्या भांडणापासून सुरुवातीपासूनच दूर होता. अन्वर सादत आणि त्याच्या नेतृत्वाखालचे अरब देश हळूहळू इस्रायलशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच, पश्चिम आशियाच्या राजकीय क्षितिजावर एक नवाच राजकीय भिडू उदयाला आला. त्याचे नाव अयातुल्ला खोमेनी.
१९७८ साली इजिप्तचे अन्वर सादत आणि इस्रायलचे मेनाचिम बेगिन यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता करार झाला. आता पश्चिम आशियात शांतता नांदेल, अशी आशा वाटत असतानाच अचानक १९७९ साली इराणमध्ये राज्यक्रांती झाली. अमेरिकेने पाठिंबा दिलेली, पण अत्यंत भ्रष्ट असलेली शहा रेझा पेहलवी याची राजवट उलथून टाकून अयातुल्ला रुहुला मुसावी खोमेनी या ७७ वर्षे वयाच्या धर्मगुरुची राजवट सुरु झाली.
 
 
शियापंथीय मुसलमान हे सुन्नींइतके कडवे नसून थोडे सौम्य मानले जातात. सुरुवातीला खोमेनीने शहाच्या भ्रष्ट कारभाराची साफसफाई करण्याकडे लक्ष दिले. पण, हळूहळू त्याची धोरणे अरबांपेक्षाही कडवी धर्मांध, पर्यायाने आत्यंतिक पश्चिमी देश विरोधी दिसू लागली. १९८५ साली लेबेनॉन देशात ‘हिजबुल्ला’ किंवा ‘हेझबोल्ला’ ही कडवी शिया इस्लामी अतिरेकी संघटना स्थापन झाली. पाठोपाठ १९८७ साली गाझा पट्टीत ‘हमास’ ही सुन्नी इस्लामी, तर १९८८ साली साली सुदानमध्ये ‘अल् कायदा’ ही सुन्नी इस्लामी अतिरेकी संघटना स्थापन झाली. ‘हिजबुल्ला’ आणि ‘हमास’ यांनी आपले कार्यक्षेत्र पश्चिम आशियापुरतेच ठेवले. इस्रायलचा नाश करणे आणि पॅलेस्टाईन हा स्वतंत्र, सार्वभौम देश निर्माण करणे, हे त्यांचे मुख्यतः उद्दिष्ट राहिले, अल् कायद्याने मात्र इस्रायलसह सर्वच पश्चिमी देश आणि विशेषतः अमेरिका यांच्याविरुद्ध सर्वकष युद्ध पुकारले. लावून वर्ल्ड ट्रेड सेंटरचा विध्वंस, मग अफगाणिस्तान आणि इराक यांच्यावर लष्करी आक्रमण, अखेर २०११ साली ओसामा बिन लादेनचा खात्मा एवढा विनाशकारी घटनाक्रम उलगडत गेला. आज अरब ओसामाची ‘अल् कायदा’ जवळपास संपल्यासारखी भासते तरी आहे.
 
एक सीरिया सोडून उर्वरित सगळे अरब देश इस्रायलशी आणि अमेरिकेशी बर्‍यापैकी सहकार्य करत आहेत, असे एकंदर दृश्य आहे. पण, इराण आता ज्यू लोकांच्या विरोधात अधिकाधिक ताठर भूमिका घेतो आहे. २००५ ते २०१३ या कालखंडात इराणचे मैदान राष्ट्राध्यक्ष असलेल्या मोहम्मद अहमदीनजाद या माणसाने तर इस्रायलद्वेष आणि अमेरिकाद्वेष यांची कमालच करून सोडली होती. त्यांनी जाहीरपणे अमेरिकेला फटकारले की, ‘आमच्यावर हल्ला करण्याचा अविचार केलात, तर जन्मभर आठवणीत राहील’ असा प्रतिटोला लगावून देऊ. हिटलरने केलेल्या ज्यू जमातीच्या वांशिक कत्तलीच्या हकिकती, नाझींच्या धळ छावण्या इत्यादी गोष्टी या घटना खर्‍याखुर्‍या घडलेल्याच नाहीत. इस्रायलने आणि याची पाठराखण करणार्‍या अमेरिकेने या सगळ्या काल्पनिक गोष्टी रचून ठेवल्या आहेत,’ असे त्यांनी वारंवार जाहीरपणे सांगितले. त्यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदी आलेल्या हसन रूहानी, इब्राहिम रईसी यांनीसुद्धा इस्रायलद्वेषाचे हेच धोरण पुढे चालू ठेवले. या लोकांनी ‘हिजबुल्ला’ संघटनेला मदत केली, तर आश्चर्य नव्हे. कारण, ती शिया संघटना आहे. पण, अलीकडे यांनी ‘हमास’ या सुन्नी संघटनेलाही पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
 
आपल्या लक्षात असेलच की, दि. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी, ज्यू लोकांच्या ‘सिम्हथ तोराह’ या सणाच्या दिवशी ‘हमास’च्या अतिरेक्यांनी गाझा पट्टीत अनेक ठिकाणी हल्ले चढवले. किमान अडीच हजार इस्रायली नागरिक ठार झाले. बलात्कार, लहान मुलांवर अत्याचार आणि घायाळ यांची संख्या फारच मोठी आहे. आज दहा महिने उलटून गेल्यावरही ‘हमास’ आणि इस्रायली सुरक्षा पथके यांच्यातील चकमकी अधिकाधिक तीव्रच होत आहेत. यात इराणने उघडपणे हमासच्या बाजूने भाग घेतला. दि. १३ एप्रिलच्या रात्री इराणने इस्रायलच्या गोलन हाईटस् या प्रदेशावर जवळपास १७० ड्रोन्स आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. इस्रायलने हे सगळे ड्रोन्स पाडले आणि क्षेपणास्त्रे आकाशातच काटून टाकली. आता आश्चर्याचा भाग इथे येतो. इराणच्या या हल्ल्यात प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलला ज्या माहिती सर्वेक्षण-टेहळणी-सर्व्हेलन्स-रिकॉनायसन्स यंत्रणांचे सहकार्य मिळाले, त्यात शेजारी अरब देशांच्या वरील यंत्रणासुद्धा होत्या. लक्षात घ्या. शिया मुसलमान इराण इस्रायलला नष्ट करण्यासाठी सज्ज झालाय आणि एकेकाळचे इस्रायलचे हाडवैरी सुन्नी मुसलमान अरब देश इस्रायलला सहकार्य करतायत.
 
परवा दि. २८ जुलैला इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचा शपथविधी झाला. त्यासाठी ‘हमास’ या सुन्नी संघटनेचा कमांडर इस्माईल हानिया हा सन्माननीय निमंत्रित होता. दि. ३१ जुलैला इस्रायली विमानांनी त्याला अचूक टिपला. दि. ३० जुलैला बैरुतमध्ये हिजबुलाया फौद शुक्र आणि दि. ३१ जुलैला तेहरानमध्ये ‘हमाल’चा इस्माईल हानिया असे दोन खतरनाक अतिरेकी उडवून इस्रायलने या दोन्ही संघटनांसह इराणलाही दणका दिला आहे. भई, इस को कहते हैं जिगर!
 
मल्हार कृष्ण गोखले
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121