राज ठाकरेंनी स्पष्ट केली मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका म्हणाले, "आरक्षण हे फक्त..."
10-Aug-2024
Total Views | 77
छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर राज ठाकरेंविरोधात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, आता त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच या सगळ्यातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज ठाकरे म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसांपासून मराठावाड्यातील वातावरण आणि राजकारण पाहात आणि ऐकत होतो. आता त्याची प्रचितीही आली. सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मी जे बोललो ते सर्वांनी ऐकलं. पण त्यानंतर जाणीवपूर्वक केलेल्या बातम्या धक्कादायक होत्या. २००६ पासून आजपर्यंत आमची एकच भूमिका राहिली आहे ती म्हणजे आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषांवर द्यावं."
"महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, हीसुद्धा माझी भूमिका आहे. महाराष्ट्रात शिक्षणापासून तर उद्योगधंद्यांपर्यंत इतक्या गोष्टी उपलब्ध असताना बाहेरच्या मुलांना त्या गोष्टी मिळतात. पण आमच्या मुलामुलींना त्या मिळत नाहीत. महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या गोष्टी नीट वापरल्या तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाही. आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांना आरक्षण देण्याऐवजी आपल्याकडे फक्त जातीचं राजकारण केलं जातं आणि त्यातून माथी भडकवली जातात," असेही ते म्हणाले.